आपल्याला मराठा साम्राज्य म्हटले कि मुख्यतः रायगड, राजगड, सातारा, कोल्हापूर, पुणे अशी प्रामुख्याने महाराष्ट्रातलीच ठिकाणे डोळ्यासमोर येतात.
पण दक्षिणेतही भोसले घराण्याच्या एका शाखेचे अनेक वर्षे राज्य होते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीचे सरदार असताना त्यांना बँगलोरची जहागिरी मिळाली होती. त्यांची दुसरी पत्नी आणि पुत्र व्यंकोजी राजे (त्यांनाच एकोजी असेही म्हणतात) हे त्यांच्यासोबत तिथे राहत होते.
पुढे व्यंकोजी राजांनी तंजावुर काबीज केले आणि तिथूनच कारभार करण्यास करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वंशजांनी तिथे बरीच वर्षे राज्य केले. त्यांच्या राज्यात साहित्य आणि संस्कृतीचा बराच विकास झाला.
एकदा संभाजी महाराज तंजावूरला गेलेले असताना त्यांच्यासाठी मेजवानी ठेवण्यात आली होती.
तिथल्या आचाऱ्याने आमटीचा एक वेगळाच प्रकार करून सादर केला. त्याने मुगडाळी ऐवजी तूरडाळ वापरली आणि चिंचेऐवजी कोकम वापरले. दाक्षिणात्य पद्धतीने बनवलेल्या ह्या पदार्थाला एक छान वेगळीच चव होती.
संभाजी महाराज हे त्या दिवशीचे मुख्य अतिथी असल्यामुळे त्यांच्या नावावरून या पदार्थाचे नाव सांभार असे ठेवण्यात आले.
दक्षिण भारतात भातासोबतच सांभार, रस्सम असे वेगवेगळे प्रकार प्रचलित आहेत. त्यातल्या सांभाराचा हा इतिहासातला पहिलाच उल्लेख आढळतो.
याचेच पुढे सांबर, सांबार, सांभर असे वेगवेगळे उच्चारही रूढ झाले.
दाक्षिणात्य पदार्थ म्हणुनच माहित असलेल्या सांभारच्या ह्या मराठी ऐतिहासिक कनेक्शनबद्दल वाचले तेव्हा मलाही आश्चर्य आणि गंमत वाटली होती.
भारतात विविधतेत एकता आहे हे अति वापरून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण प्रथम दर्शनी इतक्या वेगळ्या वाटणाऱ्या संस्कृत्यांमध्येही अशा छोट्या छोट्या गोष्टींतुन परस्पर संबंधांचे धागे दिसतात तेव्हाच ते वाक्य खरे वाटायला लागते. आपल्यालाही माहित नसते एवढे आपले वेगवेगळ्या प्रांतांशी, त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीशी आपले संबंध असतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take