छत्रपती शिवाजी महाराजांना आज सारा महाराष्ट्र देवासमान पुजतो. देशभरात त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. ह्या महापुरुषाला घडवणारी व्यक्ती म्हणजे त्यांची आई. राजमाता जिजाबाई. मातोश्री, राजमाता, मांसाहेब, जिजाऊ अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं.
जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजाच्या जाधव घराण्यात झाला. निजामशाहीचे मराठा सरदार लखुजी जाधव आणि त्यांची पत्नी म्हाळसाबाई हे जिजाबाईंचे आईवडील. देवगिरीच्या यादव घराण्याचे ते वंशज होते.
जिजाबाईंचे लग्न वेरूळचे सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे एक शूर आणि महत्वाकांक्षी लढवैये सरदार होते. ते निजामशाहीत सर-लष्कर अशा मोठ्या पदावर पोहोचले होते.
शहाजीराजे आणि जिजाबाई यांना संभाजी आणि शिवाजी असे दोन मुलगे झाले. (संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते. ते फार तरुण वयात लढाईत मारले गेले. त्यांचीच आठवण म्हणुन पुढे शिवाजी महाराजांना मुलगा झाला तेव्हा त्याचे नाव संभाजी ठेवले गेले.)
त्या काळात महाराष्ट्रात मोगलाई, निजामशाही आणि आदिलशाही अशा तीन राज्यसत्तांमध्ये सतत संघर्ष आणि लढाया चालु असत. त्या सुलतान आणि बादशाहांचा मनमानी पद्धतीने राज्यकारभार चालु असे. त्यांच्याच दरबारातले सरदार आपसातल्या स्पर्धेमुळे किंवा धार्मिक द्वेषामुळे एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असत.
अशाच राजकारणातुन निजामाच्या दरबारात जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव, त्यांची मुले आणि नातवंडांसकट हत्या करण्यात आली. तेव्हा जिजाबाई दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. शहाजी राजे यांनी यामुळे व्यथित होऊन निजामशाही सोडली.
पुढचा काळ फार धामधुमीचा गेला. शहाजी राजे सतत लढायांसाठी मोहिमांवर असत. जिजाबाईंना गर्भवती असल्यामुळे सुरक्षित ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. तिथले किल्लेदार हे शहाजी राजांचे व्याही होते. किल्लेदाराच्या मुलीचे लग्न शहाजी राजांचे पुत्र संभाजी राजे यांच्याशी झाले होते.
तिथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरची देवी शिवाईच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
शहाजी राजे पुढची काही वर्षे आदिलशाही, मोगलाई, निजामशाही अशा तिन्ही सत्तांमध्ये चाकरी बदलत फिरत होते. चाकरी बदलण्याच कारण म्हणजे तिन्ही ठिकाणी सतत राजकारण होत असल्यामुळे कधी पराक्रम गाजवल्यामुळे त्यांना जहागिरी मिळत असे, इनाम मिळत असे तर काही दिवसांनी त्यांच्याच विरुद्ध काही षडयंत्र होत असे.
त्यांनी निजामशहा वारल्यावर त्याचा अल्पवयीन मुलगा मुर्तझा याला नामधारी सुलतान करून सत्ता आपल्या हाती घेण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी मोगलाईमध्ये सुद्धा काम केले आणि नंतर आदिलशाही आणि निजामशाहीत असताना मोगलांना फार सतावले सुद्धा.
शेवटी मोगल बादशाह शहाजहान आणि आदिलशाह यांच्यात तह झाला. तहात त्यांनी शहाजी राजांना मोगल प्रांतापासुन लांब ठेवावे अशी आत घातली. त्यामुळे आदिलशाहने त्यांना बंगळुरूची जहागिरी दिली. ते तिथे स्थिरावले.
ह्या सर्व घडामोडींमध्ये पुणे प्रांताची जहागिरी शहाजीराजांकडे होती परंतु त्या भागात इतक्या लढाया सतत चालु होत्या आणि त्यात दुष्काळ पडून गेला होता. त्यामुळे तिथे दुर्दशा झाली होती. मुरार जगदेव या सरदाराने तर पुणे शहर बेचिराख करून तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता असे म्हणतात.
या जहागिरीची नीट व्यवस्था लागावी म्हणून शहाजीराजांनी आपली पत्नी जिजाबाई आणि लहान मुलगा शिवाजी यांना पुण्यास पाठवले. सोबत कारभार सांभाळण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना नेमले.
जिजाबाईंनी पुण्यात आल्यावर सर्वप्रथम ते शहर पुन्हा बसवण्यासाठी खूप प्रयत्न केले. गाव सोडून गेलेल्या लोकांना परत बोलावले. शेतीवाडी करण्यास घरे बसवण्यास मदत केली. लांडग्यासारख्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी बक्षीस ठेवले.
पुण्यात लालमहाल बांधुन तिथे राहायला गेल्या. त्यांच्या देखरेखीखाली शिवाजी राजे लहानाचे मोठे होऊ लागले. त्या शिवाजी राजांना शिवबा म्हणुन हाक मारत असत.
परकीय राजवटींचा अन्यायी आणि मनमानी कारभार आणि त्यात स्वकीयांची होणारी फरफट जिजाबाईंनी फार जवळुन पाहिली होती. त्याविषयी त्यांना तीव्र संताप होता. शहाजी राजांनीही आपल्यापरीने राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यावेळेसची परिस्थिती अनुकूल नव्हती.
आपल्या मनातली हा अग्नी जिजाबाईंनी विझु दिला नाही. शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले. त्यांना रामायण, महाभारत, पुराणे अशा प्रेरणादायी कथा सांगुन संस्कार केले. चांगल्याचा विजय होत असतो पण त्यासाठी लढावे लागते हे शिकवले.
त्यांचा आणि त्यांच्या शिकवणीचा शिवाजी महाराजांवर फार प्रभाव होता. त्यामुळेच समकालीन राजांपेक्षा शिवाजी महाराजांची नैतिक उंची किती तरी अधिक होती. त्यांच्या राज्यात स्त्रियांचा अनादर झालेला त्यांना अजिबात खपत नसे.
राज्यकारभार कसा करावा, न्याय निवाडे कसे करावेत हे ते आपल्या आईचा कारभार बघुन शिकत होते. त्यांनी तरुण वयात जेव्हा स्वराज्याचा निर्धार केला तेव्हा जिजाबाईंनी नेहमी त्यांना प्रोत्साहन दिले. वेळोवेळी मार्गदर्शन केले.
शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व सरदार आणि साथीदार यांसाठी मांसाहेब वंदनीय होत्या.
शहाजी राजे एका शिकारीला गेलेले असताना अपघाताने मृत्युमुखी पडले. त्याकाळी नवरा गेल्यावर बायकोनेही सती जाण्याची पद्धत पडली होती. सती जाण्याचा विचार जिजाबाईंच्या मनात आला होता पण शिवाजी महाराजांनी त्यांना तो विचार मागे घेण्यास भाग पाडले.
त्या राहिल्या त्यामुळे शिवरायांना दीर्घकाळ त्यांचा सहवास, प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले.
पुढे शिवाजी महाराज आणि त्यांची पत्नी सईबाई यांना संभाजी राजे झाले आणि अल्प काळात आजारपणामुळे सईबाईंचे निधन झाले. संभाजी राजांची आई फार लहान वयात गेली. शिवाजीराजांना आणखी सात बायका होत्या. पण तरी संभाजी राजांची देखरेख मुख्यतः जिजाबाईंनी पाहिली. आपल्या मुलासारखेच त्यांनी नातवावरही संस्कार केले.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी आपल्या हयातीत स्वराज्याची पताका उंचच उंच जाताना पाहिली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा पाहिला.
दुर्दैवाने शहाजी राजांना हा मंगल दिन पाहता आला नाही. मातोश्री जिजाबाई सुद्धा जणु एवढेच पाहायला थांबल्या असाव्यात असे वाटते कारण राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच १७ जून १६७४ रोजी त्यांचे निधन झाले.
एक आई आपल्या बालकाचे किती चांगल्या पद्धतीने पालन पोषण करून त्याला संस्कार करून महान बनवु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take