हिरण्यकश्यप (हिरण्यकशिपू असेही म्हणतात) नावाचा एक असुरांचा राजा होता. तो हिरण्याक्ष या असुराचा लहान भाऊ होता. हिरण्याक्षचा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन वध केला होता. त्यामुळे हिरण्यकश्यप यास भगवान विष्णुवर प्रचंड राग होता.
त्याने ब्रह्मदेवाची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्यास प्रसन्न होऊन इच्छित वर मागण्यास सांगितले. त्याने अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले कि हे शक्य नाही.
तेव्हा त्याने आपली कल्पनाशक्ती लढवुन असा वर मागितला कि “मला असा वर द्या कि मला दिवसाही मृत्यु येऊ नये आणि रात्रीही, माणुस, देव, जनावरे यांच्या कोणाकडूनही मृत्यू येऊ नये, कुठल्याही शस्त्र किंवा अस्त्राने सुद्धा मृत्यू येऊ नये, जमिनीवरही मृत्यू येऊ नये आणि आकाशातही, घराच्या आत आणि घराच्या बाहेरही मृत्यू येऊ नये.”
ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि तो वर दिला. हिराण्यकश्यप आनंदित झाला. या वरामुळे त्याला आता कोणीही संपवु शकत नव्हते. त्यामुळे त्याने तिन्ही लोकात आपले राज्य स्थापित केले. या वराच्या अनेक अटींमुळे त्याला कोणीही कुठेही मारू किंवा हरवू शकत नव्हते. त्यामुळे त्याला लवकरच अहंकार झाला आणि तो स्वतःलाच देव समजु लागला.
त्याच्या राज्यात कोणीही भगवान विष्णुचे नाव काढलेले त्याला चालत नसे. त्यांना तो कठोर शिक्षा देई. पण त्याच्या स्वतःच्या घरी मात्र त्याचाच लहानसा मुलगा प्रल्हाद हा विष्णुचा परम भक्त होता. तो सदैव विष्णुचे स्मरण करत भक्तीत मग्न असे.
हिरण्यकश्यपने अनेक प्रकारे प्रल्हादाला हि भक्ती थांबवायला सांगितले परंतु तो ऐकत नव्हता. आपल्या वडिलांचा हा देवाचा द्वेष त्याला पटत नव्हता.
शेवटी हिरण्यकश्यपने क्रोधीत होऊन प्रल्हादला मृत्युदंड द्यायचे ठरवले. तरीही प्रल्हाद बधला नाही. राजाने त्याला मारण्याचे अनेकदा आपल्या वेगवेगळ्या सेवकांकरवी प्रयत्न केले, पण ते व्यर्थ जाऊ लागले. भगवान विष्णु आपल्या चमत्काराने प्रल्हादाला प्रत्येक संकटापासुन वाचवत असत. म्हणुनच म्हणतात “देव तारी त्याला कोण मारी”.
हिरण्यकश्यपची बहीण होलिका होती, तिला आगीपासुन अभय होते. तिने आपल्या शक्तीचा वापर करून प्रल्हादला मारायचे ठरवले. तिने प्रल्हादाला सोबत घेतले आणि लाकडाच्या चितेवर जाऊन बसली आणि तिथे आग पेटवली. आपल्या शक्तीचा गैरवापर करत तिने निष्पाप बालकाला मारायचा प्रयत्न केल्यामुळे त्याच शक्तीने प्रल्हादाचे रक्षण केले आणि ती स्वतः मात्र जळाली.
दर वर्षी होलिका दहन हे याचमुळे करतात. एक होळी पेटवुन सर्व वाईटाचा, वाईट विचार आणि वृत्तीचा नाश व्हावा या हेतूने ती प्रतीकात्मक होळी पेटवतात.
कुठल्याही उपायाने प्रल्हाद मारला जात नाही हे पाहुन हिरण्यकश्यप अत्यंत संतापला. त्याने प्रल्हादला रागावून विचारले “का पुजतोस तू त्या विष्णुला एवढा?”
प्रल्हादाने सांगितले कि “हि सर्व सृष्टी भगवंतामुळे आहे, प्रत्येक ठिकाणी त्याचेच अस्तित्व आहे, सर्व गोष्टींचे कारण आणि करविता तोच असतो. आपला जन्म त्याच्या कृपेने होतो, मग त्याची पुजा करायलाच हवी.”
हिरण्यकश्यपला भगवंताची एवढी स्तुती सहन झाली नाही. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे कोणी आपले काही बिघडवु शकत नाही या समाजामुळे तो आता फार घमंडी झाला होता. तो हसायला लागला.
त्याने विचारले, “सगळीकडे भगवंत आहे?”
प्रल्हाद म्हणाला “हो आहे.”
“म्हणजे या महालात सुद्धा आहे?”
“हो आहे.”
“मला तर दिसत नाही कुठे. मग तो आहे कुठे?”
“ते डोळ्यांना दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व आहे, ते आत्ता याक्षणी सुद्धा इथे आहेत.”
“म्हणजे कुठे घाबरून लपून बसलाय का?”
“भगवंत कोणालाही घाबरत नाहीत.”
“मग त्याला सांग हिम्मत असेल तर इथे येऊन माझ्याशी लढ. बघुया कोण श्रेष्ठ आहे. तुझा देव नाही आला तर मी आता स्वतः तुला मारेन.”
प्रल्हादाने देवाचे नामस्मरण सुरु केले.
“पाहिलंस कोणी आलं का? बाकीच्या लोकांपासुन तर तु वाचलास. आता स्वतः मी मारायला आल्यावर तुझा देवही घाबरला असेल. म्हणे सगळीकडे आहे तो. या आसनामागे लपलाय का?” असे म्हणुन त्याने आसनाला लाथ मारली आणि दूर लोटले.
“का ह्या पडद्यामागे आहे?” असे म्हणुन त्याने पडदे ओढुन काढले. आणि खदाखदा हसायला लागला.
“कि ह्या खांबामध्ये आहे तुझा देव?” असे म्हणून आपल्या जोरदार प्रहाराने खांबाला तोडले आणि तो जागीच थबकला. त्या खांबातुन एक अतिशय भयंकर जीव बाहेर आला. कोणीही असे रूप याआधी पाहिले नव्हते.
त्या जीवाचे शरीर तर मानवी दिसत होते पण हात आणि तोंड मात्र सिंहाचे होते. भगवान विष्णु स्वतः नृसिंह (नरसिंह असेही म्हणतात) अवतार घेऊन प्रकट झाले होते. हिरण्यकश्यपला मिळालेल्या वरदानानुसार त्याला कोणी मनुष्य, देव किंवा प्राणी मारू शकणार नव्हता. त्यामुळे अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असे दिव्य रूप त्यांनी धारण केले होते.
त्यांनी जोरदार गर्जना केली आणि सगळे भयभीत झाले. त्यांनी आपल्या पंजाने हिरण्यकश्यपला धरले आणि ओढत ओढत दाराकडे नेले. दाराच्या उंबरठ्यावर त्यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले. आता ते घराच्या आतही नव्हते आणि बाहेरही नव्हते, मधोमध होते.
हिरण्य कश्यप जमिनीवरही नव्हता आणि आकाशातही, नृसिंहाच्या मांडीवर होता.
दिवस मावळत आला होता आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ना तो दिवस होता ना रात्र.
नृसिंहांनी कुठल्याही शस्त्र किंवा अस्त्राचा वापर न करता आपल्या पंजाने हिरण्यकश्यपचे पोट फाडले आणि त्याचा वध केला.
हा अवतार घेऊन भगवंतांनी हे दाखवुन दिले कि आपल्या सच्च्या भक्तांसाठी ते कुठुनही कुठल्याही रूपात मदत करू शकतात. आणि आपण सगळ्या जगाला बनवले तरी देवाला बनवु शकत नाही, आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा आहेत, पण त्यांच्या महिमेला कुठलेही बंधन नाही.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take