लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते.
फिरून परत होता होता दिवस मावळायला आला.
परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला.
संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता.
त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली.
त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली.
म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे तुम्हाला मी आंबे स्वस्तात देईन. तुम्ही चार पैसे द्या, मी तुम्हाला शंभर आंबे देतो.”
दोघांनी आपले खिसे चापपले. बरोबर चार पैसेच निघाले.
म्हाताऱ्याने आंबे मोजायला सुरुवात केली.
एक दोन असे करत पन्नास वर आकडा पोचल्या पोचल्या लालबहादूरांनी त्यांना थांबवलं.
“बस करा आजोबा.”
“अहो घ्या कि, चार पैसे आहेत ना तुमच्याकडे, मग शंभर करतो की.”
“आजोबा, आम्ही चार पैसेच देऊ तुम्हाला. पण आंबे पन्नासच द्या. बस झाले आम्हाला. उरलेले तुम्ही विका उद्या परत.”
आजोबांना छान वाटलं. त्यांनी आंबे दिले आणि चार पैसे घेऊन समाधानाने घरी निघाले.
मामाने ५० आंबे घेऊन निघाल्यावर रस्त्यात लालबहादूरांना त्यांनी असं का केलं ते विचारलं.
लालबहादूर म्हणाले “ऐकलंस ना, ते आजोबा काय म्हणाले. दिवस संपला, बाजार संपला म्हणुन नाईलाजाने ते आंबे म्हणुन एवढ्या स्वस्तात विकायला तयार झाले. त्यांना आंबे विकुन पैसे मिळवण्याची गरज होती.”
“आपण दिवसा आलो असतो तर एवढ्या स्वस्त आंबे आपल्याला मिळाले नसते. मग संध्याकाळी त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन का म्हणुन इतके जास्त आंबे घ्यायचे?”
“आपल्यासाठी पन्नास आंबे खुप झाले. तेही स्वस्तच आहेत. उगाच शंभराची हाव कशाला. उलट त्या आजोबांना उरलेले आंबे उद्या विकुन थोडे जास्त पैसे मिळतील.”
लालबहादूरांची निर्मोही आणि दुसऱ्यांचा एवढा आपुलकीने विचार करण्याची वृत्ती पाहुन मामा प्रभावित झाला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take