गोपाळ गणेश आगरकर हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले भारतातले महत्वाचे विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी झाला.
आगरकर हे लोकमान्य टिळकांचे साथीदार होते. टिळकांनी सुरु केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये आगरकरांचा महत्वाचा सहभाग होता. ते केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते.
डेक्कन एजुकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कुल, फर्ग्युसन कॉलेज या संथांच्या उभारणीत त्यांचासुद्धा वाटा होता. तिथे ते शेवटपर्यंत मुख्याध्यापक होते.
आगरकरांनी भारतीय समाजात बदल घडावेत म्हणून फार प्रयत्न केले. त्यांचा जातीभेद, अस्पृश्यता अशा भारतीय समाजातल्या अनिष्ट प्रथांना विरोध होता. त्यामुळे याविरुद्ध जनजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला.
लोकमान्य टिळकांशी त्यांचे अशाच विषयांवरून मतभेद झाले. आगरकरांच्या तुलनेत टिळक पारंपरिक विचारसरणीचे होते. सरकारी पातळीवरून धार्मिक बाबींमध्ये लुडबुड केलेली त्यांना आवड नसे. त्यांचा मुख्य भर ब्रिटिशांना इथून घालवुन स्वातंत्र्य मिळवण्यावर होता. समाज सुधारणा आपल्या आपण नंतर करता येतील असं त्यांचं मत होतं.
या उलट आगरकरांना असं वाटत होतं कि समाजाला सुधारणेची जास्त गरज आहे. आपला समाज परिपक्व नाही. आधी समाज सुधारणा करून समाजाला प्रगल्भ करावं आणि मग स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा वापर चांगल्या प्रकारे होईल.
या मतभेदांमधून आगरकर टिळकांपासुन वेगळे झाले. त्यांनी सुधारक नावाने आपले स्वतःचे पत्रक सुरु केले.
दुर्दैवाने त्यांना आपले कार्य जास्त दिवस करता आले नाही. त्यांना लहानपणापासून दम्याचा त्रास होता. त्यातूनच त्यांचा १७ जून १८९५ रोजी वयाच्या अडतिसाव्या वर्षीच मृत्यू झाला. भारताचे हे महत्वाचे विचारवंत फार अल्पायुषी ठरले.
स्वातंत्र्य आधी कि सुधारणा आधी हा वाद तितका सोपा नाही. ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेले अत्याचार, जालियनवाला बाग हत्याकांड, दुसऱ्या महायुद्धात भारताकडे जाणून बुजून केलेल्या दुर्लक्षामुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ पाहिले तर वाटते स्वातंत्र्य असते तर असे प्रकार घडले नसते.
पण स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारांचा भ्रष्ट कारभार, सुधारणांबाबतची समाजाची उदासीनता, आजही होत असणारा जातीभेद किंवा लिंगभेद, जाती आणि धर्मावर आधारित राजकारण हे पाहिलं कि वाटतं कि आगरकरांच्या म्हणण्यातही तथ्य होतं. आपला समाज नागरी दृष्ट्या फार प्रगल्भ नव्हता आणि आजही नाही.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take