You are currently viewing गणेश जन्म

गणेश जन्म

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट: 

भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात. 

एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. 

तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. 

तिने स्वतः मातीपासुन एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. 

आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणुन मुलाला जिवंत केले. 

जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासुन नमस्कार केला. 

तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, “तु माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश.”

गणेश म्हणाला “आई, मला भुक लागली आहे. काहीतरी खायला दे ना.”

गणेशला खाण्यासाठी तिने लाडु, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. 

गणेशला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. 

पार्वतीने त्याला सांगितले “गणेश, मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबुन लक्ष ठेव.”

गणेश म्हणाला “हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही आत सोडणार नाही.” 

पार्वती आत गेली. 

काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले. 

ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले. 

“थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे, तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा.”

शंकर म्हणाले, “अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा. मला मनाई नसेल केली तिने. तु वाट सोड.”

गणेश म्हणाला, “तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडु शकत नाही.”

शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला “अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चुक करू नकोस.” 

गणेश म्हणाला, “तुम्ही कोण?”

नंदी म्हणाला “मी महादेवाचं सेवक, नंदी.”

गणेश म्हणाला “तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का?”

नंदी म्हणाला “असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही करू शकत नाही मी.” 

गणेश म्हणाला “मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा, मी कोणालाही आत जाऊ देणार नाही.” 

वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधीत झाले. 

महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात, सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे. 

त्वरेने सारे देव, ब्रह्मा, विष्णु स्वतः हजर झाले. त्यांनीसुद्धा गणेशाची समजुत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता. 

महादेवाचं क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशुल गणेशावर फेकले, एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडुन दिसेनासे झाले. 

शंकर त्याला ओलांडुन आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली. 

गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहुन तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधीत झाली. 

तिने शंकराला आणि उपस्थित सर्वाना जाब विचारला. “गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. आणि त्याने हे तुम्हा सर्वाना सांगुनही तुम्ही त्याला मारलंत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात? काय चुक होती त्याची?”

शंकर आता नरमले होते. “देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहित नव्हते. तो माझी वाट अडवुन बसला होता त्यामुळे मी क्रोधीत झालो.”

“माहित असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको?”

“तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे.”

“त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल? मला माझा मुलगा हवा आहे.” 

“ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशुळाने गेलेला जीव परत कसा येईल?”

“ते मला माहित नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते.”

शंकर विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला, कि त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शीर आणावे. 

त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बाल हत्ती. त्यांनी त्याचे शीर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शीर गणेशाच्या शरीरावर जोडुन गणेशला पुन्हा जिवंत केले. 

गणेशला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणुन त्याचे एक नाव प्रथमेश आहे. 

गजाचे आनन म्हणजे शीर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव आहे. 

गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती हि नावे आहेत. 

प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे. 

अशा या गणपतीची बाप्पाच्या जन्माची हि विलक्षण कथा आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा