एकदा राजधानीमध्ये उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. सर्वांच्या घरी भरपुर उंदीर झाले होते आणि ते अन्न धान्याची नासाडी करायचे, कपडे कुरतडुन ठेवायचे. सर्वांना खुप त्रास होत होता.
नागरिकांचा त्रास दुर करण्यासाठी महाराजांनी सर्वांच्या घरी मांजर पुरवायचे ठरवले. आणि त्या मांजरीला सशक्त ठेवायला त्यांनी ज्यांच्या घरी दुधाची सोय नव्हती अशा लोकांना गायसुद्धा दिली.
तेनालीरामन आपल्या घरी गाय आणि मांजर दोन्ही घेऊन आला. त्याला स्वतःला दुध आणि दही, ताक, लोणी, तुप दुधाचे पदार्थ अत्यंत आवडत असत. त्यामुळे त्याची त्या गायीचे दुध मांजराला देण्याची इच्छाच नव्हती.
पण राजांनी विचारले तर काय सांगायचे असाही प्रश्न होता. त्यामुळे त्याने एक शक्कल लढवली. त्याने काही दिवस रोज मांजरासमोर तापवलेले आणि अत्यंत गरम असे दुध ठेवले. ते पिताच मांजराला खुप चटका बसे आणि ती पाळून जायची. काही दिवसातच हे देतात ते दूध अत्यंत गरम असते आणि आपल्याला त्याचा त्रास होतो हे तिला लक्षात आले आणि तिने दूध पिणेच सोडून दिले. ती दूध दिसताच दूर जायची.
मांजरीने दूध पिणे सोडल्यामुळे सर्व दूध तेनालीरामन आणि त्याच्या घरच्यांना मिळायला लागले आणि त्यांनी दूध आणि दुधाच्या सर्व पदार्थांचा खुप आस्वाद घेतला.
काही दिवसांनी उंदरांचा त्रास कमी झाला. पण तरीही लोक दिलेल्या मांजरांची काळजी घेत आहेत कि नाही हे बघायला राजाने सर्वांना आपापल्या मांजरी घेऊन दरबारात बोलावले.
राजाच्या आदेशानुसार सर्वांच्या मांजरांची नीट काळजी घेतलेली दिसत होती आणि त्या सुदृढही दिसत होत्या. पण तेनालीरामनची मांजर मात्र त्या मानाने एकदम अशक्त वाटत होती.
राजाने त्याबद्दल जाब विचारला. तेनालीरामन म्हणाला “महाराज, माझी मांजर फक्त उंदीर सापडला तरच खाते. दूध पितच नाही.”
राजाला हे खरे वाटले नाही. त्याने त्या मांजरीसमोर दूध ठेवण्याचा आदेश दिला. ते मांजर खरेच दूध पाहून लांब जायला लागले.
राजा तेनालीरामनला चांगला ओळखुन होता. ह्यात तेनालीरामनची काही तरी कुरापत असणार हे त्याला माहित होते. त्याने त्या मांजराला जवळ घेऊन यायला सांगितले. त्या मांजराच्या तोंडाजवळ पोळल्याचे व्रण दिसताच राजाला सर्व प्रकार लक्षात आला.
तेनालीरामनची मांजराचा मूळ स्वभाव बदलण्याची शक्कल भारी असली तरी स्वतः दूध पिण्याच्या स्वार्थासाठी त्या मांजराशी निर्दयपणे वागल्याबद्दल राजाला राग आला. त्याने तेनालीरामनला एक महिना फक्त दूधच पिण्याची शिक्षा दिली.
काही दिवसातच तेनालीरामनचे पोट बिघडले आणि त्यानेही त्या मांजरासारखेच दुध सोडुन दिले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take