एकदा स्वतः बादशहा अकबराच्या महालातुन एक मूल्यवान रत्न चोरीला गेले. एका राजाच्या स्वतःच्या महालात पुरेशी सुरक्षा नसणे हि अतिशय गंभीर बाब होती. अकबर अतिशय क्रोधीत झाला. त्याने सर्व नोकरांना फैलावर घेतले पण काही फायदा झाला नाही.
त्याने ताबडतोब बिरबलाला बोलावुन घेतले. बिरबलाने सर्व परिस्थिती समजुन घेतली. आणि तो कुठेतरी गेला आणि भरपुर काठ्या घेऊन आला.
अकबराने वैतागुन विचारले, “बिरबल इथे परिस्थती काय, तु चोरीचा तपास लावायचं सोडुन या काठ्या कशाला घेऊन आलास?”
बिरबल म्हणाला “खाविंद, ह्या काठ्या चोरीच्या तपासासाठीच आहेत. काळजी करू नका.”
बिरबलाने सर्व नोकरांना बोलावुन प्रत्येकाला एक काठी दिली. आणि सांगितले
“महालात एवढी सुरक्षा असताना इथे काम करणाऱ्या लोकांशिवाय अजुन दुसरा कोणी चोर इथे येऊन चोरी करूच शकत नाही. खाविंदांनी जाब विचारून सुद्धा चोर समजला नाही, त्यामुळे मी ह्या खास काठ्या आणल्या आहेत. ह्या मी एका मोठ्या शक्तिशाली साधूंकडून मंत्र म्हणुन आणल्या आहेत.”
“सर्व काठ्यांची लांबी सारखीच आहे. मी तुम्हा प्रत्येकाला हि काठी देतोय हि आज घरी घेऊन जा आणि उद्या काठी घेऊन परत या. ज्या कोणी चोरी केली आहे त्याची काठी उद्या एक वीत वाढलेली दिसेल. बाकी सर्वांच्या काठ्या आहे तशाच राहतील. आणि मग आपल्याला चोर समजेल.”
ज्या नोकराने चोरी केली होती तो घाबरला. उद्या आपली काठी मोठी होईल, आपण पकडले जाऊ आणि आपल्याला मोठी शिक्षा होईल या भीतीने त्याला झोप येत नव्हती. मग त्याला एक कल्पना सुचली. आपण जर काठी कापुन छोटी केली तर? एक वीत काठी कापली आणि ती पुन्हा एक वीत वाढली तर ती आधी सारखीच दिसेल आणि कोणाला कळणार पण नाही.
बिरबलावर वरकडी करणारी शक्कल सुचली म्हणुन तो खुश होऊन काठी कापुन झोपुन गेला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व नोकरांना एकत्र केलं तेव्हा ह्याची काठी छोटी असल्याचं लगेच कळुन आलं. काठी मोठी झालीच नव्हती, आणि बाकी कोणीही चोरी केली नसल्यामुळे घाबरून असला प्रकार केला नव्हता.
बिरबल म्हणाला “मला माहित होतं कि फक्त चोरच अशी काठी कापायचा विचार करेल. त्यामुळे मी काठीवरच्या जादूची गोष्ट तुमची दिशाभुल करायला सांगितली होती.”
तो चोर पकडला गेला, आणि त्याला कडक शिक्षा झाली. पुन्हा एकदा आपल्या चतुरतेने समस्या सोडवल्याबद्दल अकबराने ते मूल्यवान रत्न बिरबलाला बक्षीस म्हणुन दिले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take