एकदा अकबर आणि बिरबल दोघे मिळुन शहरात फेरफटका मारत होते. अचानक त्यांना जवळुन गलका ऐकु यायला लागला. ते आवाजाच्या दिशेने गेले.
तो आवाज एका मोठ्या बंगल्यातुन येत होता. त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली. घरमालकाने त्यांना पाहुन आत बोलावले आणि सांगितले “हुजूर माझी एक गाय बेपत्ता आहे. कोणी तरी तिला चोरून घेऊन गेलं आहे. हुजूर कृपया माझी मदत करा.”
बिरबलाने विचारले “त्या गायीला कोण सांभाळते?”
घरमालक म्हणाला “मागे माझा मोठा गोठा आहे हुजूर, आणि बरीच जनावरे आहेत. माझे नोकर त्या सर्वांना सांभाळतात.”
“सर्व नोकर घरात आहेत कि कोणी नोकरीसुद्धा बेपत्ता आहे?”
“सर्व नोकर इथेच आहेत हुजूर.”
“बाहेरचं कोणी बंगल्यात येऊन गेलं का?”
“आमच्यासमोर तरी कोणीच आलं नाही.”
बिरबलाने सर्व नोकरांना घेऊन गोठ्याजवळ यायला सांगितले. बिरबल गोठ्यात एक फेरफटका मारून आला आणि म्हणाला “गायीला नेलं तेव्हा ती चाराच खात होती असं दिसतं. चोराला ओळखणं अगदी सोपं आहे, कारण त्याच्या दाढीत, अंगावर गवताच्या काड्या अजूनही असतील.”
हे ऐकताच नोकरांपैकी एकाने पटकन आपली दाढी आणि कपडे तपासले. बिरबलाचे सर्वांवर लक्ष होतेच. त्याने लगेच हि हालचाल टिपली आणि त्या नोकराला पुढे बोलावले आणि दरडावुन विचारले. “तुच गाय नेलीस ना? नाही तर तुला दाढी आणि कपडे तपासुन पाहायची काहीच गरज नव्हती. पटकन सांग नाही तर आत्ता शिपायांना सांगुन तुला चाबकाचे फटके देऊ.”
नोकराने घाबरून चोरी केल्याचे कबुल केले. तो काही अंतरावर गायीला बांधुन आला होता तिथुन परत घेऊन आला. शिपायांनी त्याला पकडून नेले. घरमालकाने त्यांचे आभार मानले.
इतक्या लवकर चोरी पकडल्यामुळे अकबराला नेहमीप्रमाणे बिरबलाचे कौतुक वाटले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take