सिंधी समाजात भगवान झुलेलाल यांना अत्यंत आदराने पुजले जाते. ते वरुण देवतेचे अवतार होते अशी श्रद्धा आहे.
भारतीय संस्कृती आणि इतिहासात सिंधु नदीचे खुप महत्व आहे. या सिंधु नदीच्या आसपासच्या प्रदेशात वास्तव्यास असलेल्या समाजास सिंधी समाज म्हटले जाते. तिथे राहणारे हिंदु आणि मुस्लिम दोघांना सिंधी म्हटले जाते.
फाळणीनंतर सिंध हा प्रांत पाकिस्तानात गेला. बरेच सिंधी हिंदू तेव्हा भारतात स्थलांतरित झाले. त्यामुळे आज ते सिंधु नदीजवळ वास्तव्यास नसले तरी मूळची सिंधी हि ओळख आणि तिकडची संस्कृती जपण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला.
सिंध प्रांत भारताच्या वायव्येस येतो. भारतात बहुतांश परकीय आक्रमणे हि याच दिशेने झाली. मुस्लिम धर्माची स्थापना झाल्यावर मध्यपूर्वेतल्या प्रांतातले बहुतांश लोक मुस्लिम धर्मात गेले आणि भारताच्या वायव्य दिशेला बरीच मुस्लिम साम्राज्ये अस्तित्वात आली.
त्यातल्या बऱ्याच सुलतान आणि बादशहांनी वेगवेगळ्या काळात भारतावर आक्रमण करून इथे राज्य मिळवुन इथल्या लोकांनाही मुस्लिम धर्मात आणण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम प्रांतांच्या अगदी जवळ असल्यामुळे सिंध प्रांतात त्यांच्याशी संपर्क जास्त येत असल्यामुळे धर्मांतराचे प्रमाण जास्त होते.
सिंध प्रांतात एक मिरकशाह नावाचा मुस्लिम राजा होता. तो आपल्या राज्यातील हिंदू जनतेचे बळजबरी धर्मांतर करत होता. सिंधी हिंदु लोक त्याच्या अन्यायाला कंटाळले होते.
सिंधी लोकांचा सिंधु नदीशी जवळचा संबंध होता. प्राचीन काळापासुन ते जहाज गलबतांद्वारे प्रवास करून व्यापार करत होते. त्यामुळे त्यांच्यात जल देवता म्हणजेच वरुण देवाचे महत्व खुप होते. व्यापारी दौऱ्यावर गेले कि घरी त्यांच्या बायका जलदेवतेला त्यांना सुखरूप परत येता यावे म्हणुन प्रार्थना करत असत.
राजाच्या अन्यायाला कंटाळुन त्यांनी नदीजवळ येऊन अनेक देवास प्रार्थना करत जलदेवतेलाच साकडे घातले. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर द्यायला स्वतः वरुण देव माशावर प्रकट झाले आणि त्यांना सांगितले कि त्यांना अन्यायापासुन वाचवायला ते लवकरच नसरपूर गावी जन्म घेतील.
काही दिवसातच नसरपूर येथे रतनचंद आणि देवकीच्या पोटी एका दिव्य बाळाने जन्म घेतला. त्याचे नाव ठेवले उदयचंद. बाळाने तोंड उघडले कि त्याच्या तोंडात सिंधु नदी आणि त्यात माशावर बसलेले वृद्ध माणसाच्या रूपात देवाचे दर्शन झाले. जलदेवतेचा अवतार म्हणुन उदेरोलाल असेही नाव पडले. संस्कृत मध्ये उदक म्हणजे पाणी.
बाळाला पाळण्यात टाकल्यावर तो आपोआप झुलायला लागला आणि बाळ झोपी गेले. त्यामुळे त्याचे अजुन एक नाव पडले झुलेलाल.
या चमत्कारी बाळाच्या जन्मामुळे लोकांमध्ये उत्साह संचारला. त्याची खबर राजापर्यंत जाऊन पोहोचली. त्याने त्या बाळाला मारण्याचे प्रयत्न केले पण ते सफल झाले नाहीत. त्याचा वजीर जेव्हा त्या बाळाला पाहायला आला, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या बाळाचे रूपांतर एका प्रौढ माणसात झाले, आणि लगेच पांढरी दाढी असलेल्या एका वृद्ध माणसात झाले.
वजिराने हा चमत्कार राजाला जाऊन सांगितला. त्याने उडेरोलालला मारण्यासाठी सैन्य पाठवले. त्या सैन्याचा मार्ग पाण्याच्या मोठ्या लाटांनी अडवला. राजाच्या महालालाही आग लागली. स्वतः राजा क्षमा मागण्यासाठी गेला.
झुलेलाल प्रकट झाले आणि त्यांनी राजाला माफ केले. त्याने सर्वांना सांगितले, ज्याला ईश्वर म्हणतात किंवा अल्लाह म्हणतात शेवटी तो देव एकच आहे. तर कशाला तुम्ही त्याला दुसऱ्या प्रकारे पुजणाऱ्या लोकांना त्रास देता?
राजाचे मनपरिवर्तन झाले आणि तो स्वतः झुलेलालचा भक्त बनला. सोबतच अनेक मुस्लिम त्यांचे भक्त बनले.
हिंदु (मुख्यतः सिंधी) झुलेलाल यांना जल देवता, वरुणाचा अवतार, उडेरोलाल अशा नावांनी पूजतात. तर सुफी परंपरेत त्यांनाच जिंदा पीर, दर्याशाह अशा नावांनी पूजतात.
त्यांच्या जन्मदिवसाला चेती चांद, म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस सिंधी लोक उत्साहाने साजरे करतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take