You are currently viewing भगवान परशुराम

भगवान परशुराम

जेव्हा जेव्हा मानवांवर, धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेऊन प्रकट होतो असे श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितले. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते. पुराणांमध्ये विष्णूंनी वेगवेगळी रूपे घेऊन आपल्या लीला दाखवल्या आहेत. त्यापैकी दहा अवतार म्हणजे दशावतार हे प्रमुख समजतात. भगवान विष्णूंच्या दशावतारामध्ये परशुराम हा सहावा मानला जातो. 

ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. त्यांच्या आईने भगवान विष्णु आणि भगवान रुद्र या दोघांची उपासना केली होती. त्यामुळे त्यांना रुद्रावतार सुद्धा समजले जाते. त्यांच्या क्रोधाची दहशत होती. 

त्यांचे मुळ नाव फक्त राम किंवा भृगु कुळात जन्म झाल्यामुळे भार्गवराम असे होते. पण पुढे त्यांचे आवडते अस्त्र परशु हे त्यांच्या नावात जोडले गेले आणि ते परशुराम या नावाने प्रसिद्ध झाले. 

प्राचीन काळी वर्णव्यवस्था पाळली जात असे. राज्य सांभाळणे, त्याची रक्षा करण्यासाठी लढणे अशी कामे क्षत्रिय करत. देवाची पुजाअर्चा, यज्ञादी विधी, शास्त्रांचा अभ्यास आणि प्रसार, राज्यकर्त्यांना मार्गदर्शन, राजपुत्रांचे प्रशिक्षण अशी कामे ब्राह्मण करत. 

त्यामुळे ब्राह्मणही अभ्यासासाठी शस्त्र शिकत असले तरीही त्यांनी ते वापरून कोणाशी लढण्याची रीत नव्हती. परशुरामही सर्व अस्त्रे शिकले होते आणि त्यात पारंगत होते. 

त्यांच्या आश्रमात एक सुरभि नावाची एक दिव्य गाय होती. ती मागेल ती इच्छा पूर्ण करून सर्व वस्तु समोर हजर करायची. एकदा परशुराम बाहेर गेलेले असताना राजा कार्तवीर्य अर्जुन आपल्या लवाजम्यासकट त्या आश्रमात आला. त्याने जमदग्नी ऋषींची भेट घेतली. 

जमदग्नी ऋषींनी सुरभिच्या साहाय्याने सहज सर्वांचा पाहुणचार केला. ती दिव्य गाय बघुन राजाला ती आपल्या जवळ असावी असा मोह झाला. त्याने ऋषींना ती मागितली. पण ऋषींनी नकार दिला. त्यांना ती देवाच्या कृपेने मिळाली होती. एका आश्रमात राहणाऱ्या ऋषीने दिलेला नकार राजाला सहन झाला नाही. त्याने बळजबरी ती गाय आपल्या ताब्यात घेतली आणि गेला. 

परशुराम परत आले तेव्हा हे कळल्यावर ते संतप्त झाले. त्यांनी राजाला युद्धाचे आव्हान दिले आणि त्याचा वध केला, आणि ती गाय सोडवुन पुन्हा आश्रमात आले. पण त्यांच्या वडिलांना हे आवडले नाही. एका ब्राह्मणाने शस्त्र घेऊन राजाशी युद्ध करून त्याला मारणे चुकीचे आहे असे त्यांनी परशुरामाला सांगितले आणि प्रायश्चित्त घेण्याचा उपदेश केला. 

परशुराम तपश्चर्येला गेले. ते प्रायश्चित्त पूर्ण करून परत आले तेव्हा त्यांच्या माघारी राजाच्या मुलांनी त्यांच्या वडिलांना सूड घेण्यासाठी मारून टाकल्याचे समजले. परशुरामांनी पुन्हा त्या सर्वांशी युद्ध केले आणि युद्धात सहभागी झालेल्या सर्व क्षत्रियांचा वध केला. 

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे म्हणतात. आपल्या पुराणांमध्ये अनेकदा अतिशयोक्ती असते. वेगवेगळ्या पुराणात तीच कथा वेगळ्या रूपात वेगळ्या तपशीलांसकट असते. त्यामुळे कधी कधी मूळ कथेचा गाभा हरवु शकतो. 

माझ्या मते या कथेचा अर्थ हा आहे कि त्याकाळी जे समाजाचे संकेत होते त्यानुसार राजाची भूमिका हि रक्षणकर्त्याची असायला हवी. राजाने आपल्या प्रजेचे रक्षण करावे आणि त्यासाठी प्रजा राजाला मान देते, कर देते, राजाला आपल्या या सेवेसाठी सर्व मानमरातब आणि ऐश्वर्य मिळते. 

राजा कार्तवीर्य अर्जुनाने या कर्तव्याच्या विरुद्ध जाऊन आपल्या अहंकारात आपली नसलेली वस्तु बलपूर्वक काबीज केली. ऋषीमुनींचा मान राखण्याची परंपरा असताना त्यांचा अपमान केला. आणि त्याची शिक्षा म्हणुन त्याचा परशुरामाशी युद्धात वध झाला. 

त्याच्या मुलांनी आपल्या वडिलांकडुन झालेली चुक समजून न घेता अशा जमदग्नी ऋषींना मारले ज्यांनी राजाने गाय बळजबरी नेऊनही त्याच्याशी युद्ध केले नाही आणि उलट त्याच्याशी आपल्या धर्माविरुद्ध जाऊन युद्ध केल्याबद्दल प्रायश्चित्त करायला सांगितले. परशुरामाने त्यांचाही संहार केला. 

सूडबुद्धीने या गोष्टीशी संबंध नसलेल्या क्षत्रियांना देव का मारेल? २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय झाली असेल तर पुन्हा क्षत्रिय आले कुठून? 

मला वाटते या पुढे परशुरामांनी आयुष्यभर जिथे जिथे क्षत्रिय आपल्या कर्तव्याला जागत नसतील, प्रजेवर अन्याय करत असतील त्यांच्याशी लढाई केली असेल. 

ते काही सर्व क्षत्रियांचे शत्रू नव्हते. परशुराम हे चिरंजीव मानले जातात. त्यांच्याशी निगडित कथा रामायण आणि महाभारत या दोन्हीत आहे. ते रामाच्या आधीचे अवतार आहेत. 

रामायणात त्यांचे शिवधनुष्य जनक राजाकडे संभाळून ठेवले होते. सीतेच्या स्वयंवरात रामाने ते धनुष्य तोडल्यावर परशुराम तिथे आले. रामाला पाहुन त्यांनी राम आणि सीतेला आशीर्वादच दिले. 

महाभारतात पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण हे महावीर त्यांचे शिष्य होते. 

यावरून दिसुन येते कि त्यांचे क्षत्रियांशी शत्रुत्व नव्हते आणि काही क्षत्रियांशी मैत्रीचे, गुरुशिष्यांचे संबंध होते. 

परशुरामांनीच आपला परशु समुद्राच्या दिशेने फेकुन समुद्राला मागे सरकवले आणि कोकणाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ अशा किनारपट्टीच्या भागात परशुरामांना यासाठी पुजले जाते. त्यांनी परशु फेकला ती जागा साल्हेर किल्ल्यावर असल्याची मान्यता आहे. तेथे परशुरामाचे मंदिरसुद्धा आहे. 

चिरंजीव असलेले विष्णुचे ते एकमेव अवतार. असे म्हणतात कि ते आपले अवतार कार्य संपले असल्यामुळे तपश्चर्येत मग्न असतात. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा