गुरु हरगोविंद (पंजाबी उच्चार: हरगोबिंद) हे शीख धर्मातले सहावे गुरु होते. त्यांचा जन्म १९ जुन १५९५ रोजी गुरु कि वडाली येथे झाला. ते शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांचे पुत्र होते.
शिखांचा पंजाब आणि आसपासच्या प्रांतातला वाढत प्रभाव पाहुन मोगल बादशाह जहांगीर याने गुरु अर्जुनदेव यांना अटक केली. त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना छळ करून मृत्युदंड दिला.
अर्जुनदेव यांनी कारावासात असतानाच आपल्या मुलास म्हणजे हरगोविंद यांना ते फक्त ११ वर्षाचे असताना पुढचा गुरु म्हणुन नेमले. त्यासोबतच त्यांना आता स्वतः सुरक्षेसाठी शस्त्र हातात घेऊन नेहमी स्वतः जवळ शीख अंगरक्षक ठेवावेत असे सांगितले.
त्यानुसार गुरु हरगोविंद यांनी शीख समुदायात शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करण्यास सिद्ध होण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतः दोन तलवारी धारण केल्या. ह्या मिरी आणि पिरि शक्तीचे प्रतीक होत्या. मीर आणि पीर या शब्दावरून हे शब्द आले. मिरी म्हणजे भौतिक जगातली शक्ती, पिरि म्हणजे अध्यात्मिक जगातली शक्ती.
या दोन तलवारी प्रतीकात्मक होत्या. त्यांच्या अनुयायांनी भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे सामर्थ्य मिळवावे असा त्यांचा संदेश होता.
त्यांनी अमृतसरच्या हरमंदिर साहिब गुरुद्वाऱ्यासमोर अकाल तख्तची स्थापना केली. इथे बसुन ते न्याय निवाडे करायचे, लोकांचे प्रश्न सोडवायचे.
जहांगीराने त्यांनासुद्धा अटक करून काही वर्ष तुरुंगात ठेवले होते. त्यांना अटक करण्यासाठी गुरु अर्जुनदेवांना पकडले तेव्हा त्यांना केलेला दंड त्यांनी भरलाच नाही असा बहाणा केला होता. पण नंतर मात्र त्यांची सुटका झाली.
जहांगीरानंतर त्याच्या गादीवर आलेला शहाजहान यानेसुद्धा शिखांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्याने गुरूंना मारण्याऐवजी शीख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
गुरु हरगोविंद यांचा मुलगा बाबा गुरदित्ता यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे गुरु हरगोविंद यांचा नातु धिरमल याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याला जमिनींचे इनाम दिले. तोच पुढे गुरु होईल आणि मग शिखांना नियंत्रित करता येईल अशी त्याची अटकळ होती.
गुरु हरगोविंद यांनी मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरवले. त्यांनी धिरमल ऐवजी त्याचा धाकटा भाऊ हरराय याची पुढचा गुरु म्हणुन निवड केली.
२८ फेब्रुवारी १६४४ रोजी गुरु हरगोविंद यांचे निधन झाले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take