एकदा इंद्रदेव एका गावातील शेतकऱ्यांवर नाराज झाले. त्यांनी तिथे पाऊस पाडणे बंद केले आणि सांगुन टाकले कि आता १२ वर्षे पाऊस पडणार नाही, शेतकऱ्यांना पिके घेणे शक्य होणार नाही.
शेतकऱ्यांनी इंद्रदेवाची प्रार्थना केली, क्षमा मागितली आणि पुन्हा पावसाची कृपा करण्याची विनंती केली. इंद्राने त्यांना सांगितले कि आता महादेव जेव्हा डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस पडेल.
शेतकरी महादेवाकडे डमरू वाजवण्याची विनंती करण्यासाठी जायला निघाले. ते पोहोचण्याआधीच इंद्राने महादेवाकडे प्रकट होत १२ वर्षे डमरू न वाजवण्याची विनंती केली. महादेवाने मान्य केले.
शेतकरी पोहोचले तेव्हा महादेवाने त्यांना सांगितले कि आता १२ वर्षे ते डमरू वाजवणार नाहीत.
शेतकरी निराश होऊन परतले. त्यांनी आहे ते अन्नधान्य पुरवून पुरवून वापरायला सुरु केले. काही जण दुसऱ्या गावी गेले.
त्यांच्यातला एक शेतकरी मात्र नित्यनेमाने आपली शेतातली नांगरणी, पेरणी सारखी सर्व कामे करत होता. त्याला इतरांनी वेड्यात काढले.
अशी २-३ वर्षे गेली. तो शेतकरी तरीही आपली कामे करत राहिला. शेवटी इतरांनी त्याला विचारले कि अरे बाबा पाऊस तर पडणार नाही तर तू का आपले श्रम वाया घालवतो आहेस?
तो म्हणाला कि १२ वर्षे जर मी काहीच काम केले नाही तर मला माझ्या शेतकामाचा विसर पडेल. १२ वर्षांनी जेव्हा इंद्रदेव पुन्हा पाऊस पाडतील तेव्हा मला काहीच काम नीट जमणार नाही. माझे शेतही खराब होईल.
महादेव आणि पार्वती त्रिकालदर्शी होते. त्यांनी हा संवाद ऐकला. पार्वती महादेवाला म्हणाल्या “त्याचं म्हणणं खरं आहे. सराव फार महत्वाचा आहे. तुम्ही १२ वर्षे डमरू वाजवणार नाही म्हणालात, पण १२ वर्षांनी तुम्हाला डमरू वाजवताच आला नाही तर?”
महादेवांनी पार्वतीचे म्हणणे ऐकुन सहज डमरू हातात घेतला आणि थोडासा वाजवला. इंद्रदेवाच्या शब्दामुळे लगेच त्या गावात पाऊस पडायला लागला. महादेवांनी अनवधानाने डमरू वाजवला होता, पण गावात पाऊस सुरु झाल्याचे पाहुन त्यांना आनंद झाला आणि ते मनसोक्त डमरू वाजवायला लागले. इतक्या दिवसांनी डमरू ऐकून पार्वती देवी सुद्धा खुश झाल्या.
गावात पाऊस पाहुन सर्वांना आनंद झाला. पण त्या पावसाने त्या वर्षी फक्त त्या शेतकऱ्यालाच छान फायदा झाला ज्याने आपला सराव चालु ठेवला होता. इतर लोकांच्या शेतात काहीच न कसल्यामुळे फक्त गवत उगवले.
लगेच फळ मिळो ना मिळो, सराव फार महत्वाचा आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take