You are currently viewing हिरकणी

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड. 

आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या विविध वस्तु विकायला आणत असत. 

या गडाच्या सुरक्षेसाठी सुद्धा कडेकोट बंदोबस्त होता. सूर्यास्तानंतर गडाच्या आत बाहेर जायला कोणालाच परवानगी नव्हती. 

रायगडाखालच्या गावात एक सामान्य घरातली हिरकणी नावाची बाई होती. ती आपल्या गोठ्यातले दुध घेऊन गडावर विकायला जायची. तिच्या घरी तान्हुले बाळ होते, पण पोटापाण्याची गरज म्हणुन ती त्याला घरी ठेवुन गडावर जाऊन यायची. 

एक दिवस गडबड झाली. तिला दुध विकता विकता उशीर झाला आणि सूर्यास्त झाला. तिच्या हे लक्षात येताच तो धावत पळत गडाच्या दरवाजाकडे गेली. पण तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते. तिने तिथल्या शिपायांना घरी जाऊन देण्याची विनंती केली. घरची परिस्थिती सांगितली. शिपायांना ते समजत असले तरीही नियमात कोणालाही सुट नव्हती. त्यांनी तिला रात्री गडावरच आसरा घ्यायला सांगितले आणि सकाळ होताच घरी जाता येईल असे आश्वासन दिले. 

हिरकणी तिथुन परतली पण तिला बिलकुल शांत बसवत नव्हते. आपल्या बाळाच्या आठवणीने ती फार व्याकुळ होत होती. बाळाच्या आईला बाळाला सोडणे फार अवघड असते पण पोटापाण्यासाठी तिने हृदयावर दगड ठेवुन गडावर हा व्यवसाय सुरु केला होता. पण आता तिला बाळाचा विरह बिलकुल सहन होत नव्हता. रात्रीचे बाळ आपल्याशिवाय कसे झोपेल, आपली वाट बघत ते किती हवालदिल होईल हा विचार करून तिच्या काळजाची घालमेल होत होती. 

हिरकणी त्याच परिसरातली असल्यामुळे तिला तो डोंगर चांगलाच माहित होता. बाकी वाटा तटबंदीमुळे बंद असल्या तरी किल्ल्यावरून खाली जायला एक वाट होती. तिथे फार तीव्र चढ उतार असल्यामुळे तिथुन हल्ला होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे तिथे काही अडसर बांधलेला नव्हता. तिला वाट माहित असली तरी आता अंधार पडल्यावर ती उतरणे जवळपास अशक्य होते. 

तरीही तिने ती जोखीम पत्करायची ठरवले. काहीही करून तिला आपल्या बाळापर्यंत पोहचायचे होते. तिने मोठ्या धीराने ती अवघड वाट धरली आणि गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचली आणि आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर आपल्याला झालेला आनंद पाहिला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले. 

दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध घेऊन ती गडावर आली तेव्हा शिपायांना फार आश्चर्य वाटले. कारण त्यांनी तिला सांगितल्याप्रमाणे सकाळी गडाबाहेर जाताना पाहिले नव्हते. कोणी शिपायांना न कळता गडाच्या बाहेर जाणे हा सुरक्षेच्या दृष्टीने धोका होता. त्यांना तिची चौकशी करणे भाग होते. 

त्यांनी तिला अटक करून महाराजांसमोर हजर केले. महाराज आपल्या रयतेसाठी अत्यंत प्रेमळ आणि कनवाळु होते. महाराज स्वतः मातोश्री जिजाबाईसारख्या महान मातेच्या संस्कारांमुळे घडले होते, त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते. त्यामुळेच त्यांना हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचे कौतुक वाटले, पण त्याच बरोबर त्यांनी गडाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी स्वतः हिरकणीसोबत जाऊन तो मार्ग बघितला. 

तिथे एक बुरुज बांधला, त्या बुरुजाचे नाव सुद्धा हिरकणी बुरुज ठेवले. त्यांनी हिरकणीचा सत्कार केला.  

हिरकणी तेव्हापासुन मातृत्वाचे एक उत्तम उदाहरण बनली. 

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने हिरकणीच्या सन्मानार्थ आधीच्या एशियाड म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या निम आराम बसेस च्या श्रेणीला हिरकणीचे नाव दिले. तसेच एसटीच्या बस स्थानकांवर मातांना आपल्या बाळांना दूध पाजता यावे, त्यांची काळजी घेता यावी म्हणुन कक्ष सुरु केले, त्यांनाही हिरकणी कक्ष असे नाव दिले. हिरकणीच्या कथेवर आधारित एक मराठी चित्रपटसुद्धा येऊन गेला. 

आपल्या मुलांसाठी सर्वकाही झोकुन देणाऱ्या हिरकणी आणि सर्व मातांना नमन!!!

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा