Site icon मराठी गोष्टी

सोमवारची (खुलभर दुधाची) कहाणी

परमेश्वरा ! सोमवारा, तुमची कहाणी ऐका.

आटपाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता. त्याच्या मनात आलं, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. पण हे कसं घडेल, याबद्दल त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. 

दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. 

राजाची आज्ञा. सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. गावचे दूध गाभान्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही.

पण दुपारी चमत्कार झाला. एका म्हातारीने घरचं कामकाज आटपलं. मुला-बाळाना खाऊ घातलं. लेकी-सुनांना न्हाऊ घातलं. गायी-वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा शांत केला. 

आपल्या जिवाचं सार्थक व्हावे म्हणून गंध, फूल, अक्षता, बेल आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोड दूध नैवेद्याला ठेवलं. 

देवाची प्रार्थना केली, “जय शंभो! महादेवा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभान्यात घातलं; पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी भक्तिभावाने अर्पण करते.” असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली.

इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरवान पाहिलं, राजाला कळवलं; परंतु काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. 

राजानं म्हातारीला विचारलं. अभय देताच तिनं कारण सांगितलं. 

“तुझ्या आज्ञेनं काय झालं ? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही. म्हणून गाभारा भरत नाही.”

“यावर काय युक्ती करावी ?” 

“मुला-वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा; म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल.” 

राजानं गावात दवंडी पिटवली.

चवथ्या सोमवारी राजान पूजा केली. मुला-बाळाना, गायी-वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात, तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. 

म्हातारीला इनाम दिलं. लेकी-सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखा समाधानानं नांदू लागली. 

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Exit mobile version