एक होता ससा. पांढरा शुभ्र आणि पळायला एकदम जोरात. त्याला आपल्या रूपावर आणि गतीवर फार गर्व होता. तो इतर प्राण्यांना नावे ठेवत असे.
तो कासवाला भेटला की फार चिडवत असे. काय ते तुझं तोंड, कसले ते वाकडे तिकडे हात पाय, आणि काय ते कडक कवच घेऊन फिरतोस. फार सुस्त आहेस तु. किती हळु चालतोस? चल शर्यत लावुया का?
तो येता जाता कासवाला चिडवत असे, चल शर्यत लावुया का?
कासव सश्याकडे दुर्लक्ष करत असे. पण असे खूपदा झाल्यावर शेवटी कासव वैतागले. आणि शर्यत लावुया का विचारल्यावर हो म्हणाले.
कासवाला वाटले आपण हरणार तर आहोतच पण एकदाची ती शर्यत केली तर हा गप्प तरी बसेल.
शर्यतीचा मार्ग ठरला. दोघेही सुरुवातीच्या जागेवर आले. सशाने पुन्हा कासवाला चिडवायला त्याला आधीच निघायला सांगितले, तो म्हणाला तु जा थोडं पुढे, मी तर मागुन सुरुवात करून सुद्धा पुढे जाईन.
कासव हळु हळु पुढे निघाले. काही वेळात ससा पळत निघाला आणि कासवाला चिडवत पुढे गेला.
शर्यत ज्या डोंगराच्या पायथ्याशी संपणार होती त्याच्या जवळ ससा जाऊन पोहोचला सुद्धा. पण त्याने शर्यत संपवली नाही. त्याला कासवासमोर ती त्याला चिडवत पूर्ण करायची होती.
तो तिथेच थांबला, थोडं गवत खाल्लं, तलावात पाणी पिलं. कासवाचा काही पत्ता नव्हता. ससा कंटाळला. त्याने विचार केला कासवाला अजून खूप वेळ लागेल तोपर्यंत जरा आराम करावा. तो झाडाखाली पहुडला. आणि त्याला गाढ झोप लागली.
कासव हळूहळू चालत होते. त्याने ठरवले होते की शर्यत पूर्ण करायचीच. काही वेळातच ते सश्यापर्यंत पोहोचले. तोपर्यंत सश्याला गाढ झोप लागली होती. कासव तसेच हळुहळु पुढे निघाले.
कासव अंतिम रेषेजवळ पोहचत असताना सश्याला जाग आणि समोर कासवाला पाहुन तो धावत सुटला. त्याने पूर्ण जीव लावुन वेग पकडला पण एव्हाना फार उशीर झाला होता. कासव अंतिम रेषेवर पोहचुन शर्यत जिंकले होते.
त्यापुढे सशाने कधीही कोणाला चिडवले नाही. उलट काही जण त्यालाच कासवाकडून शर्यत हरणारा ससा म्हणुन चिडवायचे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take