जगभरच्या इतिहासात भरपूर युद्धे झाली आहेत. युद्धे हि नेहमीच रक्तरंजित असतात. लढणाऱ्या दोन्ही बाजूंकडे प्रचंड जैवहानी होते. बरेच सैनिक जखमी होतात, कायमचे हात पाय गमावुन बसतात. विसाव्या शतकात राजेशाह्या कमी होऊन आधुनिक राष्ट्रे अस्तित्वात आली. तरीही दुसऱ्या महायुद्धापर्यंत युद्धाचे प्रमाण भरपुर होते. त्या महायुद्धात जो विनाश झाला त्यानंतर राष्ट्रांमध्ये जरा संयम वाढला आणि प्रत्यक्ष युद्धांचे प्रमाण थोडे कमी झाले.
महाभारतात धर्मयुद्धाचे जे वर्णन आहे त्यात कौरव पांडव दोघांनी युद्धभूमीचे काही नियम आखले होते. सूर्य मावळल्यावर युद्ध थांबवले जाई, योद्ध्यांना आराम करायला वेळ मिळत असे. जायबंदी झालेल्यांचे उपचार आणि गतप्राण झालेल्यांचे अंतिम संस्कार होत असत. पण असे नियमबद्ध युद्ध फक्त पुस्तकातच पाहायला मिळते.
प्रत्यक्षात युद्धात लढणाऱ्या सैनिकांचे, आणि जिथे युद्ध लढले जाई त्या आसपासच्या लोकांचे मात्र प्रचंड हाल होत. त्यात जखमी होणाऱ्या सैनिकांवर उपचार करण्यासाठीही काही चांगली व्यवस्था नसे.
१९व्या १८५९ साली शतकात हेनरी ड्युनान्ट ह्या उद्योजकाने आपल्या व्यावसायिक कामासंदर्भात फ्रांसच्या सम्राटाला भेटण्यासाठी सोलफेरीनोला भेट दिली. तेव्हा तिथे युद्ध चालु होते. त्याच दिवशी तिथे भयानक लढाई झाली आणि हजारोच्या संख्येने सैनिक मारले गेले आणि जखमी झाले.
त्यांचे उपचार करायला तिथे कुठलीही व्यवस्था नव्हती. ड्युनान्ट हे पाहुन फार अस्वस्थ झाले. त्यांनी आसपासच्या गावांमधुन लोकांना गोळा करून तिथे मदत कार्य आयोजित केले. स्वतःच्या खर्चाने सामुग्री आणली. आणि मदत करणाऱ्या लोकांना दोन्ही बाजूच्या सैनिकांना भेदभाव न करता मदत करण्यास उद्युक्त केले.
तिथुन परत आल्यावरही त्यांच्या डोक्यातुन तो विषय गेला नाही. युद्धामध्ये दोन्हीकडच्या सैनिकांना मदत करण्यासाठी एक तटस्थ संस्था असावी असे त्यांना वाटू लागली. त्यांनी याच विषयावर पुस्तकही लिहिले. या संस्थेच्या कार्यकर्त्यांना जर दोन्ही बाजूंनी अभय मिळाले तर ते जखमी सैनिकांची चांगली सेवा करू शकतील असे त्यांनी मांडले.
गुस्ताव्ह मॉयनिर यांच्या वाचनात हे पुस्तक आल्यावर त्यांनी त्या कल्पनेत रस घेतला. त्यांनी हा विषय आपल्या जिनेव्हा जनकल्याण संस्थेच्या () सभेत मांडला. ते तिथे अध्यक्ष होते.
ह्या प्रयत्नांतून “रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय समिती” स्थापन झाली. त्यांच्या विचारांना वाढत पाठिंबा मिळायला लागला. स्विस सरकारने तेव्हाच्या युरोपीय राष्ट्रे, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको येथल्या सरकारांच्या/ राजांच्या प्रतिनिधींना जिनेव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी बोलावले.
येथे १२ साम्राज्य/ देशांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारावर सही केली. या कराराला मानणाऱ्या देशांमध्ये रेड क्रॉसचे कार्य सुरु झाले. प्रत्येक देशामध्ये तिथली स्थानिक रेड क्रॉस सोसायटी आणि त्यावर देखरेख करणारी आंतरराष्ट्रीय समिती असे ह्या संघटनेचे स्वरूप होते.
त्यानंतर होणाऱ्या युद्धांमध्ये रेड क्रॉसचे तटस्थ आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य पाहुन अजुन अजुन देश ह्या चळवळीत सामील व्हायला लागले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमध्ये रेड क्रॉसने खुप भरीव कार्य केले. लाखो सैनिकांना उपचार दिले, युद्धकैद्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले, त्यांना घरच्यांशी संपर्क साधायला मदत केली. त्यांना अमानवी वागणुक मिळु नये यासाठी प्रयत्न केले.
याच चळवळीमुळे वेळोवेळी जिनेव्हामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा होऊन युद्धजन्य परिस्थितीमध्ये पाळायच्या नियमांवर चर्चा आणि सामंजस्य करार होऊन मार्गदर्शक तत्वे आखली गेली. आपला पायलट अभिनंदन जेव्हा पाकिस्तानात अडकला होता तेव्हा त्याला सोडवण्याची मागणी याच तत्वावर आधारित होती.
रेड क्रॉस म्हणजे लाल रंगाचे अधिक (+) सारखे चिन्ह हे सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना ओळखण्यासाठी वापरले जावे हे रेड क्रॉस पहिल्या परिषदेत झालेल्या ठरावांपैकी एक होते. त्यामुळेच आता सर्वत्र डॉक्टर, हॉस्पिटल, क्लिनिक इत्यादी ठिकाणी ह्या चिन्हाचा वापर दिसुन येतो.
आज जवळजवळ सर्व देशांमध्ये रेड क्रॉसचे कार्य पसरले आहे, आणि लाखो कार्यकर्ते त्याचे सदस्य आहेत.
रेड क्रॉस समितीला आजवर ३ वेळा नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला, आणि रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनान्ट यांनाही वैयक्तिक नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ पासुन “८ मे” हा दिवस “आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन” म्हणुन पाळला जातो.
मुळात युद्ध होणे हीच विनाशाची नांदी असते. पण युद्धे आजवर होती आली आणि होत राहणार हे दुःखद सत्य स्वीकारून त्यातल्या त्यात लढणाऱ्या शुर सैनिकांना वेळेवर योग्य मदत, उपचार आणि सन्मान मिळावा यासाठी एका माणसाच्या स्वप्नांतून उभे राहिलेले हे भव्यदिव्य कार्य प्रशंसनीय आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take