मराठी गोष्टी

नेत्रदानाची गोष्ट

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर काही जाहिराती नेहमी लागायच्या. एका जाहिरातीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन होते आणि दुसऱ्या जाहिरातीत ऐश्वर्या राय होती. ह्या जाहिरातीतून ते नेत्रदानाचं महत्व सांगायचे, आणि मग आम्ही नेत्रदानासाठी नाव नोंदवलं आहे, तुम्हीसुद्धा नोंदवा असं आव्हान करायचे.

आज हे नेत्रदान कसं सुरु झालं याची गोष्ट जाणून घेऊया.

काही जणांना दुर्दैवाने जन्मतः डोळे नसतात, किंवा काही जणांचे अपघाताने किंवा आणखी कोणत्या समस्येने डोळे निकामी होतात. असे लोकसुद्धा आपल्या मेहनतीने, चिकाटीने डोळस लोकांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत स्वाभिमानाने जगात असतात.

पण त्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिसत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना त्रास होतो. आता हळूहळू अंध आणि अपंग व्यक्तींनासुद्धा वावरता यावं यादृष्टीने खास सोयी सुविधांचा विचार होत असला तरी त्याआधी असं काही नव्हतं.

अशा अडचणींसोबतच ते अनेक साध्या साध्या आनंदांना मुकतात जे आपण डोळस माणसे फार गृहीत धरतो. देवाने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. आपण कुठे सहलीला जातो तेव्हा तिथले डोंगर, दऱ्या, हिरवळ, नदी, सुंदर प्राणी पक्षी इत्यादी गोष्टींचा आनंद आपण मुख्यतः डोळ्यांनी घेतो. फार दूर कशाला, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा अनेकदा अतिशय सुंदर रंगांची उधळण होते. ह्या गोष्टींचा आनंद त्यांना घेता येत नाही. त्यांना अशा गोष्टी वर्णनानेच माहित असतात.

त्यामुळेच अशा लोकांना दृष्टी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न वर्षानुवर्षे होत आले. गेल्या एक दोन शतकात तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत गेली. अठराव्या शतकात दृष्टी मिळवण्यासाठी माणसांचे, तसेच काही प्राण्यांचे डोळे वापरून सुद्धा प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना यश मिळाले नाही.

अशा प्रकारची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली ती झेक रिपब्लिकमधल्या डॉ. एडवर्ड झिर्म यांनी. ते एक नेत्रतज्ञ होते.

त्यांच्याकडे एकदा एक ऍलॉईस ग्लोगर नावाचा शेतमजूर आला. त्या मजुरांचे डोळे चुनखडीचे काम करताना निकामी झाले होते. त्याच्यावर उपचार चालू असतानाच डॉक्टरांकडे एक दुसरा रुग्ण आला.

कार्ल ब्राऊर नावाच्या एका ११ वर्षाच्या डोळ्यात जखम झाली होती. त्याच्या डोळ्यात काही धातूचे कण घुसून फार इजा झाली होती. त्याचे डोळे वाचवणे शक्य नव्हते, पण त्याच्या डोळ्यातल्या कॉर्नियाचा वापर करून त्या मजुराची दृष्टी परत मिळवण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी कार्लच्या वडिलांना ह्याची कल्पना दिली. त्यांनी मोठ्या मनाने ह्याला परवानगी दिली.

तेव्हा सूक्ष्मनिरीक्षक, टाके घालण्याची प्रक्रिया, त्यासाठी आणि शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फारशी प्रगती झाली नव्हती. डोळ्यासारखा नाजूक अवयवाची शस्त्रक्रिया करून त्यांना जोडणे जवळपास अशक्य काम होते. त्या मजुराची शस्त्रक्रिया करताना अशाच अडचणी उद्भवल्या, पण त्याला एक डोळा तरी देणे शक्य झाले. ह्यामुळे तो पुन्हा कामावर जाऊ शकला.

पुढे या तंत्रज्ञानात आणखी प्रगती झाली. डॉ. रेमन कास्ट्रावोजो, डॉ. व्लादिमिर फिलातोव अशा डॉक्टरांनी सुद्धा पुढे आपापल्या ठिकाणी डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

ह्या शस्त्रक्रियेमुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळून त्यांना आयुष्याचा नव्याने अनुभव घेता यायला लागला. त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून यायला लागला. ह्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत जाऊ लागले.

त्यामुळे डोळे देणारे आणि त्याचा लाभ घेणारे यात एक सुसूत्रता यावी, ज्यांना डोळे देण्याची इच्छा आहे त्यांचे मृत्यूनंतर तातडीने डोळे जतन करण्याची सुविधा, ते गरजू व्यक्तीपर्यंत वेळेत पोहचवण्याची सुविधा असे या संबंधित सर्व काम सुरळीतपणे व्हावे यासाठी आय बँक म्हणजे नेत्र पेढी उभारावी अशी संकल्पना पुढे आली.

१९४४ मध्ये न्यूयॉर्क येथे डॉ. पॅटन यांच्या पुढाकाराने, वेल्स येथे १९५५ मध्ये डॉ. थॉमस यांच्या पुढाकाराने अशा नेत्रपेढया उभ्या राहिल्या. हळू हळू जगभरात अशा पेढ्या सुरु झाल्या. आपल्याकडे अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांनी स्वतः आपले नाव नोंदवून याबद्दल माहितीचा प्रसार केल्यामुळे जनजागृती झाली.

१० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिन म्हणून साजरा होतो. दृष्टी नसलेल्याला दृष्टी मिळणे हि एक फार अमूल्य भेट आहे, कदाचित याची आपल्याला कल्पना करवणार नाही. पण सर्वांनी याचा विचार करावा आणि जमल्यास एखाद्या नेत्रपेढीत आपले नाव नोंदवावे.

यानिमित्ताने एक म्हण थोडीशी बदलून लिहितो:

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
इतरांनी एक दिवस
देणाऱ्याचा दृष्टिकोन घ्यावा

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version