भारतीय कालगणना हि चंद्राच्या कलांनुसार आहे. त्यामुळे बहुतांश भारतीय सण हे त्यातल्या तिथीनुसार असल्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेशी तुलना करता तारखा बऱ्याच पुढे मागे होत असतात.
पण मकरसंक्रांती हा एक असा सण आहे जो दर वर्षी जानेवारीच्या मध्यावरच येतो. तारीख फार तर एक दिवस पुढे मागे येते. १४ किंवा १५ जानेवारीलाच हा सण येतो.
याचं कारण असं कि हा सण सूर्याच्या मार्गक्रमणावर आधारित आहे. इंग्रजी कालगणना हि सूर्याधारित असल्यामुळे इंग्रजी महिन्यांमध्ये सूर्याशी निगडित घटनांची तारीख तीच राहते.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्षाचा काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात झुकलेला असतो, आणि उरलेला वेळ दक्षिण गोलार्धात असतो. याला उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हणतात.
भारत देश हा उत्तर गोलार्धात येत असल्यामुळे, सूर्य उत्तरायणात असताना आपल्याला जास्त सूर्य प्रकाश मिळतो, दिवस जास्त वेळ असतो, अंधार आणि रात्र कमी वेळ असते, शेतीशी संबंधित अनेक महत्वाची कामे या कालावधीत होतात. त्यामुळे नेहमीच आपल्याकडे उत्तरायण हे जास्त शुभ मानतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य कर्क राशीतुन मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवशी उत्तरायण चालु होते. शुभ कालावधीचा पहिला दिवस म्हणुन या दिवसाला महत्व आहे.
कथा
एक पौराणिक कथा अशीही आहे कि या दिवशी देवीने संकरासुर नावाच्या राक्षसाला मारले. संकराचा अंत केला म्हणुन तिचे संक्रांतीदेवी असे नाव पडले.
दरवर्षी पंचांगात संक्रांति देवीचे वर्णन असते. ती अमुक वाहनावर आहे, या दिशेहून त्या दिशेकडे जात आहे, अशा प्रकारचे वर्णन असते. ती जिकडून येते तिकडे समृद्धी तर जिकडे जाते तिकडे विनाश होतो असेही मानले जाते.
एक दुःखद संदर्भ
महाराष्ट्राच्या इतिहासात एक भळभळती जखम म्हणजे, पानिपतचे तिसरे युद्ध. याच दिवशी पानिपतमध्ये पेशव्यांनी सदाशिवरावासोबत पाठवलेलं सैन्य आणि अहमदशाह अब्दालीच्या फौजा यांच्यात घनघोर युद्ध झालं. दोन्ही बाजुला प्रचंड संख्येने सैनिक मारले गेले.
या युद्धात दोन्ही बाजु पराक्रमाने लढल्या, परंतु सदाशिवराव, विश्वासराव, जनकोजी शिंदे असे महत्वाचे मोहरेच लढाईत गळुन पडल्याने उरलेल्या मराठी सैन्याने कच खाल्ली आणि पळ काढला. अहमदशाह अब्दाली या लढाईनंतर अफगाणिस्तानात परत फिरला. त्यामुळे याला अगदी निर्णायक युद्ध म्हणता येत नसले तरी मराठ्यांचे भयानक नुकसान झाले व मानहानी झाली. यातुन बाहेर पडणे मराठा साम्राज्याला बरेच अवघड गेले.
त्यामुळे मराठीमध्ये एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर संक्रांत आली असे नुकसान झाले किंवा संकट आले या अर्थाने म्हणतात.
इतर नावे
भारताच्या विविध भागांमध्ये हाच सण माघ बिहु, माघी, पोंगल अशा नावांने साजरा होतो. आणि इतर काही देशांमध्येही साजरा होतो.
साजरा करण्याची पद्धत
संक्रांतीच्या दिवशी लोक आप्तजनांच्या भेटी घेतात. मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. मोठ्यांकडून तिळगुळ घेतात किंवा एकमेकांना देतात आणि “तिळगुळ घ्या गोडगोड बोला” असे सांगतात. नात्यांमधील गोडवा वाढावा असा यामागचा उद्देश असतो.
आपल्या बहुतांश सणांना जे खास पदार्थ पारंपरिक रित्या बनतात, ते तो सण ज्या ऋतुत येतो त्यानुसार, किंवा ज्या देवतेबद्दल किंवा हेतूने तो सण साजरा होतो त्याच्याशी निगडित असतात. असंच संक्रांतीला तीळ, गुळ या दिवसात खायला चांगले असतात म्हणुन त्याचे तिळ गुळाची वडी, पोळी असे पदार्थ असतात.
तसंच या दिवसात (भोगीला) तीळ घालुन केलेली बाजरीची भाकरी, मुगाची किंवा बाजरी घालुन केलेली खिचडी सुद्धा खातात कारण बाजरी उष्ण असते आणि थंडीत त्याची गरज असते.
या दिवशी महिला मातीची मडकी घेऊन तीळ, शेंगा, उसाचे करवे, कापुस, हळद कुंकू भरून एकमेकींना वाण देतात. या मडक्यांना सुगड (सुघट याचा अपभ्रंश) असेही म्हणतात. विवाहानंतर पहिली संक्रांत असते तेव्हा दाम्पत्याला हलव्याचे दागिने घालतात.
संक्रांतीनंतर बायकांची हळदी कुंकवाची लगबग सुरु होते. आधीच्या काळी महिला सतत आपापल्या घरी संसारात व्यस्त असत, त्यांना बाहेर पडणे जमत नसे किंवा चालत नसे. त्यामुळे वर्षातुन काही वेळेस हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्यांना एकमेकांच्या घरी जाऊन मिसळता यावं म्हणुन अशी परंपरा पडली असं आज म्हटलं जातं.
हल्ली महिला बरीच तयारी करून हळदी कुंकवाचा बेत आखतात. कधी २-३ मैत्रिणी जमुनही असा बेत आखतात. येणाऱ्या सर्व महिलांना हळद कुंकू लावणे, त्यांना अत्तर लावणे, तिळगुळ / हलवा खायला देऊन त्यांना वाण म्हणुन छोटीशी वस्तु भेट म्हणुन देणे अशी पद्धत आहे.
हि वाणाची वस्तु छोटी तरीही उपयुक्त असावी, काहीतरी वेगळी असावी असा बऱ्याच महिलांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संक्रांत जवळ आली कि दुकानांमध्ये अशा देण्याजोग्या वस्तु भरपूर संख्येने आलेल्या दिसतात.
तुम्ही संक्रांतीच्या दिवशी किंवा त्या जवळपास हे वाचत असाल तर तुम्हाला संक्रांतीच्या खुप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take