एक मुलगा फार चिडचिडा होता. तो सतत कशावर तरी चिडायचा. कोणी काही म्हटले कि, मनासारखे नाही झाले कि, कोणी काम सांगितले कि असे कशावरही चिडायचा. आणि चिडला कि घरात आदळ आपट करायचा, मोठ्याने ओरडायचा.
त्याच्या वडिलांना त्याची हि सवय कशी मोडावी हे कळत नव्हते. त्यांनी एक दिवस एक उपाय करून बघायचे ठरवले.
त्यांनी आपल्या मुलाला अंगणात नेले. एक भिंत दाखवली आणि एक हाथोडी आणि खिळ्यांची थैली दिली. त्याला सांगितले की जेव्हा राग येईल तेव्हा दुसरे काही आपटण्याऐवजी या भिंतीसमोर येऊन एक खिळा ठोकायचा.
काही तरी नवीन असल्यामुळे मुलगा तयार झाला. तो चिडल्यावर उत्साहात येऊन भिंतीवर खिळे ठोकायला लागला.
त्याने असे बरेच खिळे ठोकले. पण हळू हळू त्याला खिळे ठोकण्याचा कंटाळा यायला लागला. तो काही न करता शांत राहायला लागला. त्याचा राग जरा कमी झाला.
काही दिवसांनी त्याने आपल्या बाबांना सांगितले कि मी आता आदळआपट सुद्धा करत नाही आणि खिळेही ठोकत नाही. वडिलांना आनंद झाला.
त्यांनी त्याला नवीन कामगिरी दिली. त्याला सांगितले कि आता तू ज्या ज्या व्यक्तीवर चिडचिड केली होतीस त्यांना आठव आणि त्यांना कधी गरज पडली कि मदत कर, त्यांना आनंद होईल असे काही तरी कर. असं काही केलंस किंवा कुठलंही चांगलं काम केलंस तर या भिंतीवरचा एक खिळा येऊन काढत जा.
हे काम मुलाने आनंदाने सुरु केले. दुसऱ्यांची मदत करून त्यांना छान वाटेल असे काही करून त्यालाही आनंद व्हायचा. आणि त्याची खुण म्हणून खिळा काढला कि अजून छान वाटायचं.
काही दिवसांनी त्याचे सगळे खिळे काढून झाले. त्याने वडिलांना ती रिकामी झालेली भिंत दाखवली.
वडिलांना आता मुलामध्ये झालेला बदल बघून फार अभिमान वाटलं आणि आनंद झाला.
त्यांनी मुलाला अजून एक उपदेश केला. “जेव्हा आपण रागावतो आणि रागाच्या भरात कोणाशी वाईट वागतो तेव्हा आपण त्यांच्या मनाला दुखावतो. ते खिळा ठोकण्यासारखं आहे. आणि पुढे आपण कधी त्यांच्याशी चांगलं वागून संबंध सुधारू शकतो. ते खिळा काढण्यासारखं आहे. पण अशी संधी आपल्याला मिळतेच असं नाही. काही लोक आपल्यापासून कायमचे दुरावू शकतात. आणि जरी तो खिळा काढला तरी बघ भिंतीवर त्या खिळ्याचं छिद्र तसंच आहे. हि भिंत तर आपण सहज नीट करू शकतो. पण लोकांशी वाईट वागून आपण जे मनावर ओरखडे उमटतात ते लक्षात राहतातच. नंतर चांगले वागूनही ते पुसले जाईलच असं नसतं. हे नेहमी लक्षात ठेव.
अयोग्य गोष्टीवर राग आलाच पाहिजे, पण आपण कधीही रागाच्या भरात अविचारीपणे न वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take