१ मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणुन जास्त ओळखला जात असला, तरीही कामगार दिन सुद्धा याच दिवशी असतो.
औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, उत्पादन, औद्योगिक विकास खुप वाढला. पण या उद्योगांमध्ये कामगारांचे खुप शोषण होत असे. त्यांचे राहणीमान फार खालावलेले होते. कामाच्या तासांवर कुठलेही बंधन नाही, पगार अतिशय कमी, अन्न, शिक्षण या सगळ्यांची मारामार.
हि स्थिती बदलावी म्हणुन कामगार लढा देत होते. आंदोलन करत होते. युरोप आणि अमेरिका खंडात विविध ठिकाणी हे आंदोलन चालु होते.
अमेरिकेत १ मे १९८६ पासुन कामगार संघटनांनी कामाची मर्यादा ८ तासांवर आणण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन चालु केले. या आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागले. शिकागोमध्ये आंदोलनाच्या वेळी पोलीस कारवाई करून आंदोलकांना पांगवत असताना कोणा अज्ञात इसमाने पोलिसांच्या दिशेने डायनामाईटचा बॉम्ब फेकला. मग पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या धुमश्चक्रीमध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक मारले गेले आणि मोठ्या संख्येने जखमी झाले.
पॅरिस येथे “सेकंड इंटरनॅशनल” या संस्थेतर्फे १८९० पासुन १-मे या दिवशी शिकागोच्या आंदोलनाची स्मृती म्हणुन कामगार दिवस पाळला जाऊ लागला. जगभरात अनेक समाजवादी, साम्यवादी कामगार संघटना आणि पक्षांकडुन याचे पालन सुरु झाले. या दिवशी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा, निदर्शने करण्याचा, मागण्या जगासमोर आणण्याचा प्रघात पडला.
भारतात १९२३ मध्ये लेबर किसान पक्षातर्फे पहिल्यांदा १-मे रोजी कामगार दिवस पाळला गेला आणि देशभरात अनेक इतर संघटनांनी तो पाळायला सुरु केले.
१-मे हा जगभरात भारत पकडुन बरेच देश “कामगार दिवस” म्हणुन पाळतात. पण काही देशांमध्ये या तारखे ऐवजी दुसऱ्या तारखांनाही कामगार दिवस पाळला जातो.
तारीख काहीही असली तरी समाजाच्या खालच्या आर्थिक पातळीवर काम करणाऱ्या कामगारांच्या कष्टाचा सन्मान, त्यांचे जीवनमान उंचावे या दिशेने प्रयत्न अशा दृष्टीने कामगार दिवस महत्वाचा आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take