
एका जंगलात एक सिंह राहत होता.
तो आता म्हातारा झाला होता.
त्याच्यात जंगलात हिंडून चपळाईने सावज पकडुन शिकार करण्याची आता शक्ति उरलेली नव्हती.
त्याने एक युक्ती वापरली.
तो आपल्या अंधाऱ्या गुहेत बसुन राहत असे.
बाहेर कोण्या प्राण्याची चाहुल लागली कि तो आवाज देत असे
“कोण आहे रे तिकडे, या जरा भेटायला. हल्ली मला बरं वाटत नाही. माझ्यात बाहेर फिरण्याची शक्ति नाही. एकटाच बसुन असतो. जरा गप्पा मारून बरं वाटेल.”
असं केविलवाण्या आवाजात त्याने बोलावण्याचा प्रयत्न केला कि येणारे जाणारे प्राणी दया येऊन त्याला भेटायला गुहेत जात असत.
त्यांनी गुहेत पाऊल ठेवले कि मात्र सिंह झडप घालुन त्यांना मारून खात असे.
असे सिंहाचे काही दिवस बरे गेले.
एक दिवस गुहे बाहेरून कोल्हा जात होता.
सिंहाने नेहमीप्रमाणे हाक मारली. कोल्हाही थांबला.
सिंहाने आपली व्यथा त्याच्यासमोर मांडली आणि भेटायला बोलावले.
कोल्हाही गुहेकडे जायला वळला पण समोर बघुन थबकला.
सिंहाने पुन्हा बोलावले “ये कि रे कोल्ह्या, घाबरू नकोस. मी फक्त थोडा वेळ गप्पा मारायला बोलावतोय.”
कोल्हा म्हणाला “ते ठीक आहे महाराज. पण मला फक्त गुहेत जाणाऱ्या पावलांच्या खुणा दिसत आहेत. गुहेतुन बाहेर येणारी एकही खुण दिसत नाही. तेव्हा मी इथुनच निघालेला बरा”.
असं म्हणुन तो चतुर कोल्हा आपला जीव वाचवत त्वरेने तिथुन पसार झाला.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take