Site icon मराठी गोष्टी

झाशीची राणी लक्ष्मीबाई

झाशीची राणी हि आता आपल्या भाषेत एक म्हण असल्यासारखी झाली आहे. एखाद्या लढाऊ स्वभावाच्या खमक्या मुलीचे किंवा स्त्रीचे वर्णन करताना आपण म्हणतो “ती तर अगदी झाशीची राणीच आहे”. किंवा हिंदीतसुद्धा एखादी मुलगी जरा धिटाई दाखवत असेल तर म्हणतात “बडी आई झांसीकी रानी”.

अशी आपल्या रोजच्या बोलीभाषेत जाऊन बसलेली कोण आहे हि झाशीची राणी? आज जाणून घेऊया तिच्याबद्दल.

जवळपास २०० वर्षांपूर्वी म्हणजे १८२८ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी वाराणसीत पेशव्यांसाठी काम करणाऱ्या मोरोपंत तांबे आणि त्यांची पत्नी भागीरथी यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्या मुलीचे नाव त्यांनी ठेवले मनिकर्णिका. असे मोठे भारदस्त नाव असल्यामुळे तिचे घरचे नाव पडले मनु.

त्याकाळात ब्रिटिश भारतात आपले हात पाय पसरत होते. आधी त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला. मग व्यापाराची रक्षा म्हणून थोडं सैन्य आणलं आणि काही प्रदेश बळकावले. मग हळू हळू स्थानिक राजकारणात लक्ष घालत इथल्या राजांना एकमेकांशी लढण्यात मदत करू लागले. आपलं सैन्य प्रचंड वाढवलं आणि राजांना तुम्ही फक्त राज्य करा, सैन्याची काळजी आम्ही घेतो असं आमिष दाखवून त्यांची शक्ती कमी केली.

ब्रिटिशांनी पेशवे बाजीराव द्वितीय यांना हरवून त्यांचे राज्य खालसा केले होते. त्यांना महाराष्ट्रापासून दूर उत्तर प्रदेशातल्या बिठूर येथे हलवले आणि निवृत्तीवेतन द्यायला सुरु केले. त्यामुळे तांबे कुटुंब आपल्या मालकासोबत तिथे राहायला गेले.

मनिकर्णिका पेशव्यांची सुद्धा लाडकी होती. ते तिला प्रेमाने छबिली म्हणत. मनिकर्णिका, पेशव्यांचे दत्तक चिरंजीव नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे बाल सवंगडी होते.

तेव्हा मुलींना फारसे शिकवण्याची पद्धत नव्हती. पण असे सर्व संकेत मनिकर्णिका लहानपणापासूनच तोडत होती. ती अत्यंत हुशार होती. लिहिणे, वाचणे, घोडेस्वारी, ती फार जलद शिकली. ती लहानपणी चक्क मल्लखांब सुद्धा खेळत असे.

त्याकाळी मुलींचे लग्न फार लवकर लावून देत असत. त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षीच १८४२ मध्ये मनिकर्णिका आणि झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांचा विवाह झाला. लग्नानंतर तिचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले.

गंगाधरराव राणीपेक्षा वयाने फार मोठे होते. पण तेव्हा नवरा बायकोमधल्या वयाच्या अंतराचाही फार विचार करत नसत. राजघराण्यात लग्न झाले हि महत्वाची गोष्ट होती.

त्या दोघांना काही वर्षांनी दामोदर नावाचा एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने तो अगदी चार महिन्याचा असतानाच देवाघरी गेला. त्यानंतर दोन वर्षांनी गंगाधरराव आजारी पडले. १८५३ मध्ये आपल्या मृत्युशय्येवर असताना त्यांनी आपल्या चुलत भावाचा मुलगा आनंद याला दत्तक घेतले.

आपल्या पहिल्या मुलाची आठवण म्हणून दत्तक घेतल्यानंतर आनंदचे नाव सुद्धा दामोदर ठेवण्यात आले. हा दत्तकविधी झाला तेव्हा ब्रिटिशांचा राजकीय अधिकारी हजर होता. त्याला गंगाधररावांनी आपल्यानंतर दामोदरला माझा वारस समजावे आणि तो लहान असल्यामुळे सर्व राज्यकारभार राणी लक्ष्मीबाईकडे सोपवावा असे सांगितले होते.

वयाने फार लहान असूनही राणी लक्ष्मीबाईंनी राजाचा विश्वास जिंकला होता. त्यांना तिच्यावर पूर्ण विश्वास होता. स्त्रियांच्या हाती कोणीही फारसे अधिकार देत नसत पण गंगाधररावांनी आपल्या पश्चात सर्व कारभार राणीने करावा असे सांगून ठेवले होते.

दत्तकविधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गंगाधरराव वारले. त्यांच्या पश्चात ब्रिटिशांनी राणीला अवमानकारक वागणूक दिली. तिचा आणि दामोदरचा झाशीच्या राज्यावरचा हक्क डावलत त्यांना झाशी सोडून जायला सांगितले आणि निवृत्तीवेतन स्वीकारण्यास सांगितले.

हे सांगायला आलेल्या ब्रिटिशांसमोर राणी “मेरी झांसी नाही दूंगी” असे गर्जली होती. म्हणजेच “मी माझी झाशी अजिबात देणार नाही”. भारताच्या इतिहासात अजरामर झालेले हे वाक्य आहे. सर्व भारतात सत्ता पसरलेल्या ब्रिटिशांसारख्या बलाढ्य शत्रूला असे ठणकावून सांगण्याची हिम्मत एका राणीने दाखवली होती.

ब्रिटिशांशी खुले युद्ध पुकारण्याआधी सामोपचाराने हा प्रश्न सोडवायचा राणीचा प्रयत्न चालू होता. पण लवकरच १८५७ मध्ये ब्रिटिशांच्या चाकरीतल्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले. मीरत येथे हे बंड सुरु झाले आणि इतरत्र पसरू लागले. ब्रिटिश प्रशासन हे बंड हाताळण्यात व्यस्त झाले.

तेव्हा स्वतःच्या सुरक्षेसाठी असे ब्रिटिशांना सांगून राणीने थोडी सैन्याची तुकडी जमवली. काही दिवसातच बंडखोर सैनिकांची एक तुकडी झाशीवर चालून आली. तिथे ब्रिटिशांचे मोठे सैन्य नव्हते. अगदी मोजके ब्रिटिश लोक तिथे राहत होते. ह्या बंडखोर सैनिकांनी तिथे असलेल्या सर्व ब्रिटिश लोकांची कत्तल केली. स्त्रिया आणि मुले यांची सुद्धा. आणि लुटपाट सुरु केली.

राणीने त्या सैनिकांना मोठी खंडणी देऊन तिथून घालवले. दुसरे कोणी नसल्यामुळे त्यांनी कारभार हाती घेतला. ब्रिटिशांना त्यांनी झालेल्या घटनेबद्दल कळवले आणि तिथे सुरक्षेसाठी सैन्य पाठवायला सांगितले. ब्रिटिशांनी त्यांना आपण येईपर्यंत कारभार सांभाळायला सांगितले.

पुढे ब्रिटिशांचा राणीनेच ते हत्याकांड घडवून आणले असल्याचा समज झाला. त्यापुढे राणीच्या पत्रव्यव्हाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आसपासच्या दोन संस्थानिकांनी झाशीवर हल्ला करून ती बळकावण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांकडून कोणतीही मदत आली नाही. राणीने स्वतः आपल्या सैनिकांसह या हल्ल्याला परतवले.

ब्रिटिशांच्याच भारतीय सैनिकांकडून सुरु झालेले बंड उत्तर भारतात पसरत होते. ब्रिटिशांच्या अवमानकारक वागणुकीमुळे नाराज असलेल्या राजे आणि संस्थानिक यांचाही बंडाला पाठिंबा मिळत होता.

राणीने आपले सैन्य वाढवायला सुरुवात केली. झाशीची सुरक्षा वाढवली. आपल्या सल्लागारांशी केलेल्या मसलतीनुसार आता स्वतंत्र होण्याचा आणि त्यासाठी लढण्याचा निर्धार केला.

शेवटी काही महिन्यांनी जेव्हा ब्रिटिश आपले सैन्य घेऊन झाशीला पोहोचले तेव्हा झाशीची किल्ला लढण्यासाठी सज्ज होता. राणीने ब्रिटिशांना झाशी हवाली करण्यास नकार दिला आणि लढाई सुरु झाली.

दोन्ही बाजूनी मोठा तोफा आणि बंदुकांचा मारा झाला. ब्रिटिशांच्या तोफेने झालेले नुकसान झाशीचे सैनिक आणि लोक त्वरेने बांधून काढत होते. काही दिवस हि लढाई चालली.

राणीकडून तात्या टोपेंना मदतीला येण्याचा विनंतीवजा संदेश गेला होता. ते आपले सैन्य घेऊन आलेही होते पण ब्रिटिशांचे सैन्य भरपूर असल्यामुळे त्यांनी तात्या टोपे झाशीच्या येण्या आधीच त्यांच्याशी एक तुकडी लढली आणि दुसऱ्या भागाने झाशीतली लढाई चालू ठेवली. त्यामुळे तात्या टोपेंना झाशीच्या येऊन मदत करता आली नाही.

शेवटी ब्रिटिशांनी सर्व बाजूंनी हल्ला चढवला. फितुरीमुळे त्यांना किल्ल्यात सुद्धा प्रवेश मिळाला. झाशीच्या लोकांनी राणीच्या नेतृत्वाखाली पराक्रमाची शर्थ केली. ब्रिटिशांना किल्ल्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लोकांशी लढावे लागले. ब्रिटिशांच्या संख्याबळ आणि अधिक सुसज्ज सैन्यापुढे राणीच्या सैन्याचा टिकाव लागणे अवघड होत होते.

राणीने झाशी सोडून तात्या टोपेंना सामील होऊन लढत राहण्याचे ठरवले. युद्ध चालू ठेवले तर पुन्हा नंतर झाशी काबीज करता येईल असा त्यांचा विचार होता.

राणीने स्वाराचा वेष धारण केला. आपल्या लहानग्या मुलाला म्हणजे दामोदरला पाठीवर बांधले. आपल्या लाडक्या बादल या घोड्यावर बसल्या. बादलवर स्वार होऊन तिने किल्ल्याच्या उंच भिंतीवरून खाली मैदानात अतिशय मोठी उडी मारली. बादल या उडीमुळे जखमी होऊन मरण पावला पण आपल्या मालकाला साथ देण्यापासून मागे हटला नाही.

राणीने दुसऱ्या घोड्यावर आपल्या इतर साथीदारांसोबत तेज गतीने काल्पी गाठले आणि तात्या टोपेंच्या दलात सहभागी झाली. ब्रिटिशांनी तिथेही हल्ला चढवला. त्यांनी काल्पी सोडून ग्वाल्हेर गाठले. ग्वाल्हेरचे राज्यकर्ते सिंधिया म्हणजेच शिंदे ब्रिटिश पक्षाशी इमानदार होते. ते ग्वाल्हेर सोडून दिल्लीला निघून गेले होते. त्यामुळे ग्वाल्हेरचा ताबा मिळवणे अवघड गेले नाही. इथे तात्या टोपे आणि राणीला नानासाहेब पेशवे सुद्धा येऊन मिळाले.

त्यांनी तिथे मराठा साम्राज्य पुन्हा स्थापन करून नानासाहेब पेशवेपदी विराजमान होत असल्याची घोषणा केली. ग्वाल्हेरचा किल्ला भक्कम होता. राणीने ब्रिटिशांच्या हल्ल्यासाठी सज्ज राहावे असे बाकीच्यांना सांगून पाहिले पण ते गाफील राहिले.

अखेर ब्रिटिशांचा हल्ला झालाच. राणीने स्वतः लढाईचे नेतृत्व केले आणि सैन्यात सहभागी होऊन शूरपणे लढल्या. ब्रिटिशांची याही लढाईत सरशी झाली.

राणी या लढाईत फार जखमी झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांचा १७ जून १८५८ रोजी मृत्यू झाला. ब्रिटिशांच्या हातात आपला मृतदेह पडून त्याची विटंबना होऊ नये अशी राणीची इच्छा होती. ग्वाल्हेरच्या स्थानिकांनीच तिचे अंतिम संस्कार केले.

राणी लक्ष्मीबाईने दाखवलेल्या शौर्याचे तिच्या शत्रूंनी म्हणजेच ब्रिटिशांनीसुद्धा कौतुक केले.

१८५७ चा उठावच एकंदर भारतीयांसाठी दुर्दैवी होता. हा उठाव यशस्वी झाला नाही. यातले सर्व नेते मृत्युमुखी पडले किंवा त्यांना अटक झाली. अनेक वर्षे ब्रिटिशांनीच सैन्य बाळगल्यामुळे स्थानिक राजांकडे तयारीचे सैन्य, पुरेसा शस्त्रसाठा, अनुभव, शिस्त या सर्वांची कमतरता होती. त्यामानाने ब्रिटिशांचे सैन्य आकाराने मोठे, सुसज्ज आणि अनुभवी होते.

तरीही स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवावर उदार होणाऱ्या या वीरांचे बलिदान सदैव पूज्य राहील. त्याकाळी स्त्रियांवर अनेक बंधने असूनही पद्धतीविरुद्ध जात राणी लक्ष्मीबाईने दाखवलेले शौर्य, नेतृत्व यामुळे त्या एक अजरामर भारतीय वीरांगना बनल्या.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version