मराठी गोष्टी

या, साई

चांदभाई नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याचा प्रवासात घोडा हरवला. तो कुठेच सापडत नव्हता. तो घोडा शोधत असताना एका झाडाखाली बसलेला फकीर त्याला दिसला. त्या फकिराने कफनी घातली होती आणि डोक्यावरसुद्धा एक वस्त्र बांधले होते. 

चांदभाईने त्या फकिराला आपला घोडा हरवल्याचे सांगितले आणि असा घोडा कुठे पाहिला आहे का हे विचारले. त्या फकिराने हाताने एका दिशेला इशारा करून तिकडे पाहायला सांगितले. 

चांदभाई त्या दिशेने गेला आणि त्याला काही वेळातच त्याचा घोडा सापडला. तो आनंदित होऊन त्या फकीराकडे आला. तो फकीर साधासुधा नसुन कुठला तरी विलक्षण अवलिया आहे हे चांदभाईने ओळखले. 

चांदभाईने त्याला आपल्यासोबत चलण्याची विनंती केली. फकीरबाबा तयार झाले. चांदभाई आणि त्याचे सोबती शिर्डीला एका लग्नाला चालले होते. 

ते शिर्डीत पोहोचले आणि एका खंडोबा मंदिराजवळ आले. त्या मंदिराच्या पुजाऱ्याने म्हणजे म्हाळसापतीने त्यांना आणि आणि सोबत असलेल्या फकिराला पाहिले. त्यांना बघुन म्हाळसापती अंतःप्रेरणेने स्वागत करत म्हणाले “या, साई”. 

साई हे स्वामीसारखेच आदरार्थी संबोधन आहे. म्हाळसापतीनंतर सगळे त्या फकिराला साई आणि नंतर साईबाबा म्हणायला लागले. 

साईबाबांनी पुढे शिर्डी गावातच दीर्घकाळ वास्तव्य केले. म्हाळसापती हे त्यांच्या प्रमुख भक्तांपैकी एक होते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version