मराठी गोष्टी

वडापाव

वडापाव हे महाराष्ट्रातले सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फुड आहे. (रस्त्यावरचे पदार्थ म्हटलं तर शब्दशः अर्थ तोच असला तरी तेवढा बरा वाटत नाही. पथपदार्थ म्हणावे का?). 

वडापाव असे नुसते नाव घेतले तरी माझ्या (आणि अनेकांच्या) तोंडाला पाणी सुटते. वडापाव वाल्याची गाडी डोळ्यासमोर येते. एक मोट्ठी काळी कढई, त्यात भरपूर तेल, एका ताटात बटाट्याचे भरपूर गोळे गोल किंवा चपट्या आकारात तयार करून ठेवलेले असतात, एका पातेल्यात पातळ केलेले पीठ आणि कोपऱ्यात भरपूर पावाच्या लाद्या. 

तो माणुस एक एक गोळा पिठात बुडवुन असे भरपूर गोळे तेलात सोडतो आणि मग आपल्या झारीने त्या वड्यांना तेलातुन फिरवतो. पाहता पाहता त्या पिवळ्या पिठाचा रंग बदलत गडद होत जातो आणि त्याला एक केशरी छटा येते. 

गाडीवाल्याच्या अवतीभवती सगळे ग्राहक आशाळभूत नजरेने हि प्रक्रिया पाहत असतात, आणि कधी एकदा तो वडा कढईच्या बाहेर येऊन पावाच्या पोटात घुसून आपल्या हातात येतो याची वाट पाहत असतात. एक दोन घोट पाणी प्यावं इतकं तोंडाला पाणी आतापर्यंत सुटलेलं असतं. मला आत्ता हे लिहीत असतानाच तशी अवस्था झाली आहे. 

आपला आवडता वडापाव हा तसा बऱ्याच अलीकडचा पदार्थ आहे. ह्याची सुरुवात मुंबईत झाली. मुंबईत अनेक दशकांपासुन आयुष्य एकदम धावपळीचं असतं. लोक दूरवरून लोकल ट्रेन, बेस्टच्या बसेस, आधीच्या काळी ट्राममध्ये टप्पे खात प्रवास करत आपल्या कार्यालयात जातात आणि तसाच प्रवास करत परत येतात. 

त्यामुळे तिथे झटपट खाता येईल अशा पदार्थांना बरीच मागणी असते. आधीच्या काळात मुख्यतः कोकणातुन आणि बाकी बऱ्याच ठिकाणांहून आलेले गिरणी कामगार यांची संख्या बरीच होती. हे गरीब घरचे कष्टकरी लोक अतिशय काटकसरीने आपले आयुष्य जगत असत. 

बटाट्याचा वडा आणि बेकरीत बनलेला पाव यांना एकत्र करून वडा पाव हा पदार्थ बनला. असं म्हणतात कि कल्याणमध्ये वझे कुटुंबाने या पदार्थाची सुरुवात केली. आपल्या घरात वडे तळून ते घराच्या खिडकीतुन लोकांना वडापाव द्यायचे. त्यामुळे खिडकी वडा या नावाने त्यांचा वडापाव प्रसिद्ध होता. आजही त्यांच्या खिडकी वडा याच नावाने बऱ्याच शाखा (पुण्यातही) आहेत. 

अतिशय स्वस्त आणि चविष्ट असल्यामुळे हा पदार्थ लगेच लोकप्रिय झाला. अगदी थोडं काहीतरी खायला हवं असेल तर, किंवा नाश्त्याला, किंवा २-३ खाल्ले तर अगदी भरपेट असा कुठल्याही निमित्ताने वडापाव खाता येतो. 

पुढे गिरण्या बंद पडल्या, मराठी माणसांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. मुंबईत तेव्हा दाक्षिणात्य लोक उडपी सेंटर, इडली वड्याच्या गाड्या चालवायचे. तसंच मराठी तरुणांनीही उद्योजकता अंगी बाणवावी म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तरुणांना रिकामे बसण्यापेक्षा वडापावच्या गाड्या चालवायला प्रोत्साहन दिले. 

शिवसेनेचा वडापावशी संबंध हा असा अगदी जुना. मुंबईतल्या मराठी माणसांचा पदार्थ म्हणुन वडापाव प्रसिद्ध आहे. शिवसेनेने वडापाव संमेलने भरवुन त्याचा आणखी प्रचार केला. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने “शिव वडा पाव” या नावाने एक ब्रँड निर्माण करायलाही प्रयत्न केला. 

स्वस्तात मस्त म्हणुन सुरु झालेल्या वडापावने रस्त्यावरच्या गाद्यांपासून मोठ्या हॉटेलांमध्येही स्थान मिळवले. गोली, जम्बोकिंग, छोटु अशा खास वडापावच्या चेनसुद्धा सुरु झाल्या. त्यामध्ये आता चीझ, शेझवान अशा अनेक प्रकारांमध्ये वडापाव मिळायला लागला. 

मुंबई परिसरामध्ये विलेपार्ले, दादर, कल्याण, ठाणे याठिकाणी अनेक जुनी आणि प्रसिद्ध वडापाव केंद्रे आहेत. तसेच महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांमध्ये तिथले स्थानिक आणि लाडके वडापाव केंद्र आहेत. 

वडापावबद्दल इतकं लिहुन आता वडापाव खाण्याची अतिशय तीव्र इच्छा होतेय, तर एक वडापाव खाऊनच येतो. तुम्हालाही वाचुन असंच होत असेल तर तुम्हीही खाऊन या, आणि वडापाव खात खात आणखी गोष्टी वाचा. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version