मराठी गोष्टी

टिळकांचे परममित्र

Image from https://www.paper-darts.com/the-soft-heart-of-the-british-empire/

हि गोष्ट आहे टिळकांच्या परममित्राची. दादासाहेब खापर्डे हे एक अमरावतीचे नावाजलेले वकील होते. आधी ते सरकारी नोकरीतही मोठ्या हुद्द्यावर होते. राजकारणाच्या निमित्तानेच त्यांची टिळकांशी भेट झाली आणि त्यांचे सूर जुळले. टिळकांच्या प्रत्येक उपक्रमात दादासाहेबांनी सहभाग घेतला, त्यांना साथ दिली आणि पाठिंबा दिला. 

राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना ६ वर्षांची कठोर शिक्षा झाली. हा खटला मुंबईत चालला होता. त्यामुळे टिळकांचे साथीदारही मुंबईत आलेले होते. दादासाहेबसुद्धा होतेच. टिळकांना फार कठोर शिक्षा झालेली आहे आणि ती शिक्षा कमी व्हायला व्हावी असे अनेकांचे मत होते. 

त्यासाठी भारतीय प्रशासनातल्या लोकांकडुन काही अपेक्षा नाही परंतु जर इंग्लंडमधल्या प्रशासनाकडे आपली बाजु मांडुन ते साधण्याचा प्रयत्न केला तर काही तरी होऊ शकेल अशी आशा लोकांना वाटली. दादासाहेब त्यासाठी इंग्लंडला निघाले. ते परस्पर मुंबईतूनच निघाले. तेव्हा परदेशात जायला सहसा मुंबईतुनच बोटीने लोक निघत असत. दादासाहेब वेळ वाया घालवायला नको म्हणुन अमरावतीला घरी न जाऊन येताच सरळ इंग्लंडला निघाले. 

त्या काळात प्रवासाला फार वेळ लागत असे. परदेशाच्या प्रवासात जाण्यायेण्यातच अनेक आठवडे जायचे. लंडनला पोहोचल्यावर दादासाहेबांचा मुक्काम चक्क दोन वर्षे लांबला. 

इंग्लंडचे तेव्हा जगातल्या अनेक देशांवर अधिपत्य होते. त्यातल्या एका गुलाम देशातला एक माणुस राजद्रोहाच्या आरोपात दोषी ठरलेल्या दुसऱ्या माणसाची शिक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करायला त्या साम्राज्याच्या राजधानीत आला होता. कोणी त्यांना सहजासहजी भाव देणार नव्हते. 

सरकारमध्ये अधिकार असणाऱ्या किंवा सरकारदरबारी वजन असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला भेटणे सोपे नव्हते. ब्रिटिश लोक आपल्या शिस्त, शिष्टाचार, पद्धतशीर राहणीमानासाठी ओळखले जातात. दादासाहेब स्वतः उच्चशिक्षित वकील असल्यामुळे त्यांना हे अवघड नव्हते. पण त्यांच्यापैकी कोणालाही भेटण्याची वेळ मिळवणे, त्यांची मर्जी संपादन करणे, त्यांना मेजवान्या देणे अशा प्रकारात फार वेळ जायचा. 

त्यांनी हार न मानता तब्बल दोन वर्षे प्रयत्न केले. या काळात त्यांना स्वतः अत्यंत काटकसरीने राहावे लागले. ते संपन्न घरातले असल्यामुळे त्यांना कधी खर्चाचा विचार करण्याची गरज नव्हती. ह्या दोन वर्षात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी पार बिघडली. घरचा कर्ता पुरुषच दोन वर्षे एवढ्या दूर होता. 

त्यांच्या माघारीच त्यांच्या आई आजारी पडल्या. हे दुखणं गंभीर होतं. आईचा आपल्या मुलात जीव अडकला होता. त्या डोळे उघडून आसपास दादासाहेबांना शोधात होत्या पण ते दिसत नव्हते. त्यांच्या कुटुंबाच्या हे लक्षात आले. त्यांनी दादासाहेबांचा एक फोटो आणुन दाखवला. आईंनी तो फोटो हातात घेतला, मुलाकडे पाहिलं, फोटोवरून हात फिरवला आणि प्राण सोडला. 

आजसारखे जलद संपर्काचे माध्यम नसल्यामुळे अशा बातम्यासुद्धा इकडुन तिकडे पोहचेपर्यंत बराच वेळ जायचा, आणि प्रवासही संथगती. 

दोन वर्षे धडपड करूनही काही होत नाही हे पाहुन शेवटी दादासाहेब इंग्लंडहून निघाले. तिथुन निघुन आपल्या घरी जाण्याआधी ते थेट तुरुंगात जाऊन टिळकांना भेटले. आपल्या धडपडीचा वृत्तांत सांगितला. 

टिळकांना आता तुरुंगात दोन वर्षे झाली होती. आपल्या प्रिय मित्राची हि काही तासांची भेट एखाद्या स्वप्नासारखी वाटली असे टिळक स्वतः म्हणाले होते. त्यांना दादासाहेबांच्या आईबद्दल कळले तेव्हा फार दुःख झाले. 

टिळकांना भेटल्यानंतर मगच दादासाहेब भारतात परतले आणि आपल्या घरी जाऊन एवढ्या कालखंडानंतर कुटुंबाला भेटले. आपल्या मित्रासाठी दादासाहेब खापर्डे आणि त्यांच्या कुटुंबाने विनातक्रार दोन वर्षे फार सोसले. 

साधी माणसे असोत कि लोकमान्य टिळकांसारखे महापुरुष असोत, आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांचं पाठबळ आपल्यासाठी फार महत्वाचं असतं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आपल्यासाठी आपल्यापरीने बरंच काही करत असतात. 

त्यातुन निष्पन्न काय होतं यावरून त्यांची किंमत करता येत नाही, पण आपल्यासाठी त्यांनी काय सोसलं आणि कोणत्या भावनेने सोसलं ह्याची जाणीव असणं महत्वाचं असतं. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version