आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याच्या चार राण्या होत्या.
त्याने प्रत्येकीला एकेक काम वाटून दिलं. पहिलीला दूध-दुभत्याचं, दुसरीला स्वयंपाकाचं, तिसरीला मुला-बाळाचं काम सांगितले व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं.
काही दिवस ठीक चाललं; पण पुढं-पुढं त्या एकमेकींच्या कामांवरून भांडण करू लागल्या. एके दिवशी हे राजाच्या कानी गेलं. राजा चिंतातुर झाला.
तसाच उठला व कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला. राजाला वसिष्ठांनी चिंतेचं कारण विचारलं. राजानं ते सांगितलं.
ते दोघे राणीच्या महाली गेले. चारही राण्यांना एके ठिकाणी बोलावलं व भांडण्याचं कारण विचारलं. ‘मीच का असं करावं?’ अशी चौधींनी कारणं सांगितली.
राजा म्हणाला, “मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात.”
तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं. भांडणाचं कारण शोधून काढलं.
नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले, “तुला दूध-दुभत्याचं काम का करायचं, ते ऐक. तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात चरत असे. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर दुपारी त्यावर तू दुधाच्या धारा धरून अभिषेक करत होतीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पूर्ण व्हावं, म्हणून शंकरानं ही आज्ञा केली. त्यानं तुला सांगितलं, नवरा हा शंकरच आहे, असं समजून तो सांगेल, तसं तू वाग. त्यातच तुझं कल्याण आहे. पुढे तू मोक्षाला जाशील.” असा ऋषीनं आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिले व ते सुखा-समाधानं राहू लागले.
ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले, “तू स्वयंपाकीण का व्हावेस, ते सांगतो, ऐक. आदल्या जन्मी तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागून निर्वाह करीत होतीस. दर सोमवारी उपवास करून पाच घरी कोरान्न मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत होतीस. ही भक्ती देवाला आवडली. तुझ्या भक्तीचं फळं म्हणून तू राजाची राणी झालीस. राजानं दिलेलं काम कर, सर्वांना जेवू घालून त्यांचा आत्मा शांत कर; म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. पतिसेवेने शंकरांची कृपा होईल व कैलास लाभेल.” आशीर्वाद मिळाला. राणी सुखा-समाधानानं वागू लागली.
ऋषी तिसऱ्या राणीला म्हणाले, “आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. तू दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकरांना अर्पण करीस; स्वत: मात्र उपास करीस. तुझ्या श्रद्धेमुळे तू राणी झालीस. तू दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली. मुले देवाघरची फुले. राजानं दिलेलं काम प्रेमानं कर. आनंदानं मुलांचा सांभाळ कर. सुखानं राहा. ह्यातच तुझं कल्याण आहे. तुला शंकर प्रसन्न होईल.” असा आशीर्वाद दिला. राणी सुखा-समाधानानं वागू लागली.
नंतर ऋषी चौथ्या राणीला म्हणाले, “आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळातून उडताना तू खाली असलेल्या शिवलिंगावर दोन प्रहर छाया धरलीस. शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले. तुला राणी बनवलं. त्यानं तुला वैभव दिलं. सुख दिलं. तसं तू राजाला सुखी कर, त्यातच तुझं कल्याण आहे.”
अशा प्रकारे ऋषींनी चारही राण्यांचं शंका-समाधान केलं आणि भांडण मिटवलं.
त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला. राजाला आनंदी करून आपण निघून केले. आपले कार्य राण्या प्रेमानं व आवडीनं करू लागल्या. आनंदाने वागू लागल्या. तसे तुम्ही वागा. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.