मराठी गोष्टी

शेंगांची टरफले

लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. 

एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. 

मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या. 

त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटुन खाल्ल्या. 

टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. 

ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. 

शेंगा काढल्या कि त्यांनी टरफले वाट्टेल तिथे टाकल्या. 

बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली. 

मधली सुट्टी संपल्यावर पुढच्या तासाला गुरुजी वर्गात आले. 

वर्गात झालेला कचरा पाहुन ते संतापले. 

त्यांनी कोणी शेंगा खाल्ल्या हे विचारले. 

अशा वेळेस मुलं पाळतात त्या परंपरेनुसार सगळे गप्प राहिले. 

गुरुजींना हे अपेक्षित होतंच, त्यांनी शिक्षा सुनावली. “ठीक आहे, कोणी खाल्ल्या शेंगा हे सांगणार नसाल तर सर्वांनी त्या उचला आणि वर्ग साफ करा. ताबडतोब कामाला लागा.” 

मुले कामाला लागली. 

टिळक मात्र आपल्या जागेवर शांत बसुन होते. 

गुरुजींनी त्यांना ते का सफाई करत नाहीत याचा जाब विचारला. 

ते म्हणाले “गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि कचराही केला नाही. त्यामुळे मी टरफले उचलणार नाही.”

“असं होय, मग मी मघाशी विचारले कोणी खाल्ल्या शेंगा तेव्हा बरा शांत बसलास. सांग कोणी खाल्ल्या शेंगा?”

“मला चहाडी करायची नव्हती गुरुजी, त्यामुळे मी शांत राहिलो. पण मी शेंगा खाल्ल्या नाहीत एवढं मात्र सांगतो.” 

“वा रे वा. कोणी खाल्ल्या ते सांगणार नाही पण मी सर्वांना दिलेली शिक्षाही पाळणार नाही. एक तर कोणी शेंगा खाल्ल्या ते सांग, नाही तर टरफले उचल नाही तर चालता हो वर्गातुन.”

टिळकांनी आपलं दप्तर आवरलं आणि वर्गातुन बाहेर निघुन गेले. 

त्यांनी आपल्या मित्रांची चहाडीही केली नाही पण न केलेल्या चुकीची शिक्षाही भोगली नाही. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version