मराठी गोष्टी

समुद्र मंथन

देव आणि असुरांमध्ये अनेकदा संघर्ष होत असे. सतत ते एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असत. अनेक असुर अमर होण्यासाठी तपश्चर्या करून वरदान मागत असत. पण असा वरदान कोणीही देऊ शकत नसल्याने मग ते एखादी अमोघ शक्ती, किंवा अस्त्र असे काही तरी प्राप्त करून घेत असत. 

एकदा असुरांनी देवतांना पराजित करून सर्व लोकांवर राज्य प्रस्थापित केले. देवांनी भगवान विष्णु यांची भेट घेऊन साहाय्य मागितले. भगवंतांनी सांगितले कि आता असुरांवर वरचढ होण्यासाठी देवतांना अमृत पिऊन अमर व्हावे लागेल. 

समुद्रामध्ये अनेक विलक्षण दिव्य रत्ने (म्हणजे फक्त हिरे मोती नाही, कुठल्याही असाधारण गोष्टीला आपल्याकडे रत्न म्हटले जाऊ शकते. जसे कि भारतरत्न) होती जी आजवर कोणाला मिळाली नव्हती. त्यातच अमृतही होते. पण समुद्रात दडलेली हि रत्ने बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी समुद्राचे मंथन करणे म्हणजे जसे आपण दही घुसळतो तसे करणे आवश्यक होते. 

हे एकट्या देवांना शक्य नव्हते. त्यामुळे भगवंतांनी त्यांना असुरांनाही यात सामील करायला सांगितले. असुरांना अमृत मिळाले असते तर अवघड झाले असते. कारण असुर प्रबळ झाले कि त्यांच्या राजवटीत अनेक अत्याचार होत असत. भगवंतांनी आश्वासन दिले कि ते असे होऊ देणार नाहीत. 

देवांनी असुरांना मदत मागितली. अमृताच्या आशेने असुरही तयार झाले. एवढ्या मोठ्या समुद्राचे मंथन करायला रवी म्हणुन मंदार पर्वत वापरायचे ठरले. आणि त्याला दोरखंड म्हणुन नागराज वासुकी हा महाकाय सर्प तयार झाला. मंदार पर्वत समुद्रात स्थिर राहावा म्हणून भगवान विष्णूंनी महाकाय कासवाचे रूप घेतले. यालाच कूर्म अवतार म्हणतात. कासवाच्या भक्कम कवचावर पर्वत स्थिर झाला. वासुकीने त्या पर्वताला वेटोळा घातला. 

देव वासुकीच्या मस्तकाच्या बाजूला गेले. वासुकीच्या शेपटाच्या बाजुला जाणे असुरांना अपमानकारक वाटले. त्यांनी आम्हीच मस्तकाच्या बाजूने जाणार असे सांगितले. भगवंतांनी असे होईल असे आधीच देवांना सांगितले होते. देव लगेच तयार झाले आणि शेपटाच्या बाजुने गेले. 

जेव्हा दोन्ही बाजूंनी देव आणि असुरांनी वासुकीला ओढत मंदार पर्वताला घुसळणे सुरु केले तेव्हा त्या ताणामुळे वासुकीच्या तोंडातुन फुत्कार निघायला लागले, ते अर्थातच विषारी होते. त्यामुळे असुर मृत्युमुखी पडायला लागले, पण त्यांनी हट्टाने ती बाजु मागुन घेतली असल्यामुळे त्यांना आता काही म्हणता येत नव्हते, अमृत मिळवण्यासाठी त्यांनी घुसळणे चालुच ठेवले. 

समुद्रातुन एक एक दिव्य रत्ने निघायला लागली. कामधेनु गाय, प्राजक्ताचे झाड (कल्पवृक्ष), ऐरावत, कौस्तुभ मणी अशी दिव्य रत्ने बाहेर यायला लागली. देवी लक्ष्मी हि समुद्राची कन्या होती, ती हि या मंथनातुन बाहेर आली आणि भगवान विष्णूंना वरले. 

त्यातुनच “हलाहल” नावाचे महाभयंकर विष निघाले. ते बाहेर येताच अनेक जण मृत्युमुखी पडायला लागले. सृष्टीचा विनाश झाला असता. भगवान शंकरांनी तात्काळ ते विष घेतले आणि स्वतः प्याले. ते पिऊन त्यांनाही अनेक वेदना व्हायला लागल्या. देवी शक्ती म्हणजेच पार्वतीने त्यांच्या गळ्यावर हात ठेवुन आपल्या शक्तीने त्याचा प्रसार रोखला. 

महादेवांचा गळा या प्रकारामुळे निळा पडला. त्यामुळेच त्यांचे नीलकंठ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांना त्या विषामुळे फार आग व्हायला लागली. त्यांना थंड वाटावे म्हणुन त्यांनी गळ्याभोवती नाग गुंडाळले, आणि शीतल समजला जाणारा चंद्र डोक्यावर परिधान केला. त्यामुळे त्यांना जरा आराम वाटला. 

समुद्र मंथन पुन्हा सुरु झाले आणि शेवटी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. हा कलश समोर येताच देव आणि असुरांमध्ये तो हिसकावुन अमृत पिण्यासाठी भांडणे सुरु झाली. 

भगवान विष्णूंनी एका अतिसुंदर स्त्रीचे रूप घेतले. तिचे नाव होते मोहिनी. ती प्रकट झाली आणि सर्वांचे लक्ष विचलित झाले. तिने भांडणाचे कारण विचारले आणि कारण समजल्यावर मी अमृताचे सामान वाटप करेन असे सांगुन कलश स्वतःकडे घेतला. 

मोहिनी अत्यंत चतुराईने फक्त देवांना अमृताचे घोट प्यायला देऊ लागली आणि असुरांकडे देताना मात्र अमृताऐवजी फक्त पाणी देऊ लागली. तिच्या रूपाने सर्व मोहित झालेले असल्यामुळे कोणालाही हे लक्षात येत नव्हते. असुरांपैकी फक्त एकाला यात काहीतरी गडबड असल्याची शंका आली आणि तो देवांच्या बाजूला गेला. 

मोहिनीने त्याला अमृत दिले आणि त्याने तो घोट घेतला पण तेवढ्यात देवांना तो खरा असुर असल्याचे लक्षात आले आणि ते ओरडले. त्याचा घोट खाली उतारण्याआधीच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला पण उशीर झाला होता. त्याचे शरीर अमर झाले होते. ते दोन्ही तुकडे अमर होते. त्याचं मस्तक राहु झालं आणि शरीर केतु झालं. 

अमृत पिऊन अमर झालेल्या देवतांनी पुन्हा असुरांवर विजय मिळवला.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version