उमाजी नाईक हे काहीसे दुर्लक्षित असे क्रांतिवीर आहेत. १८५७च्या उठावाच्या बरंच आधी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावुन लढा दिला होता.
ब्रिटिशांनी भारतात एकामागोमाग एक प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यांना मुख्य अडथळा होता तो मराठा साम्राज्याचा. दुसऱ्या बाजीरावाच्या कर्तृत्वहीन कारकिर्दीत हा अडथळा दूर झाला आणि ब्रिटिशांनी मराठा साम्राज्यसुद्धा बळकावलं.
ब्रिटिशांना मराठ्यांनी बराच दीर्घ काळ सत्तेपासुन दूर ठेवलं होतं आणि तीव्र लढा दिला होता त्यामुळे त्यांचा मराठा साम्राज्यावर फार राग होता. तो राग त्यांनी आपल्या गडकिल्ल्यांवर काढला. अनेक किल्ल्यांवर सगळ्या वास्तु दारुगोळ्याने उद्ध्वस्त करून टाकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन भारतात असल्यामुळे या किल्ल्यांच्या साहाय्याने कसा मराठी समाज लढा देतो हे त्यांना चांगलंच माहित होतं.
मराठा साम्राज्याचे अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यामुळे इथल्या समाजावर त्याचा परिणाम झाला. रामोशी समाज हा त्यापैकीच एक होता. रामोशी हा शब्द रामवंशी याचा अपभ्रंश असावा. हे लोक प्रभु रामाचे वंशज असल्याची मान्यता आहे.
त्यांचा मराठा साम्राज्यात आणि सैन्यात मोठा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध गुप्तहेर बहिर्जी नाईक हे याच समाजातले होते. त्या काळापासुन सैन्यामध्ये सरदार, किल्ल्याचे आणि परिसराचे राखणदार, सैनिक अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या हे लोक सांभाळत असत.
मराठा साम्राज्य आणि किल्ल्यांचे महत्व संपुष्टात आल्यामुळे रामोशी लोकांवर हलाखीची परिस्थिती आली. ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगार जमत असा शिक्का मारून सरकारी नोकऱ्या, सैन्यात सामावुन घेणे टाळले. त्यामुळे हा समाज असंतुष्ट होता.
याच समाजात ७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजी नाईक यांचा जन्म झाला. १८१८ मध्ये मराठा साम्राज्य संपले तेव्हापासुन ओढवलेली परिस्थिती त्यांनी जवळुन पाहिली होती. आपल्या लोकांचा होणार अपमान आणि परवड यामुळे ते पेटून उठले.
त्यांनी आपल्या लोकांना गोळा करून बिरीथांविरुद्ध उत्तेजित केले. हातात शस्त्र घेऊन ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी ब्रिटिशांच्या कचेऱ्या, तुकड्या, त्यांचा खजिना यावर हल्ला करत ब्रिटिशांचा राज्यकारभार अवघड करून ठेवला.
ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी त्यांनी स्वतःला राजा घोषित केले. एक जाहीरनामा काढुन लोकांना ब्रिटिशांना न जुमानण्याचे आणि दिसतील तेथे ब्रिटिशांना मारण्याचे आवाहन केले.
पुरंदर, सातारा, खोपोली, खंडाळा या परिसरात सतत फिरतीवर राहून त्यांनी ठिकठिकाणी ब्रिटिशांवर छापे मारले. त्यांच्या विरुद्ध जाऊन ब्रिटिशांना मदत करणाऱ्या लोकांनाही ते शिक्षा करीत असत.
ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी फितुरीमुळे उमाजी नाईक पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यात खटला चालवुन तिथेच त्यांना फाशी देण्यात आली.
या उठावाचा परिणाम म्हणुन पुढे ब्रिटिशांनी रामोश्यांना गुन्हेगार जमात म्हणणे बंद केले आणि नोकऱ्यांमध्येही संधी मिळु लागली.
एकोणीसाव्या शतकात स्वातंत्र्यलढ्याला मोठ्या प्रमाणावर जनाधार नव्हता. लोकांना वेगवेगळ्या राजे आणि सरदार यांच्या लढायांची सवय होती. ब्रिटिशांचे राज्य म्हणजे आपल्यावर परकी अंमल आहे त्यांची आपल्याप्रती वागणुक हीन आणि अन्यायकारक आहे हे लक्षात येऊन मोठ्या प्रमाणावर लोकांनी चळवळीत सामील व्हायला विसावे शतक उजाडावे लागले.
तोपर्यंत ठिकठिकाणी असे उठाव झाले पण शक्तीच्या विषम प्रमाणामुळे इंग्रजांनी ते ठेचुन काढले. तरी अशा बंडांना व्यर्थ समजता येत नाही. अशा स्वतःची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांमुळेच भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची मशाल तेवत राहिली.
जिथे राजे उमाजी नाईकांवर खटला ती मामलेदार कचेरी पुण्यात अजूनही आहे आणि तेथेच त्यांचे स्मारक आहे. मी नुकताच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तेथे आणि स्वातंत्र्यवीरांशी निगडित काही ठिकाणी सायकलवर भेट द्यायला गेलो होतो. त्या राईडचा हा व्हिडीओ:
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take