मराठी गोष्टी

राजद्रोहाचा खटला

भारतीय काँग्रेसच्या स्थापनेपासुन टिळकांच्या काळापर्यंत जे नेते झाले ते मवाळ नेते होते. त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. ब्रिटिशांच्या स्वतःच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये जसा कायद्यावर आधारित शिस्तीचा कारभार चालायचा, त्याच पद्धतीने अर्जविनंत्या करून, भारतातल्या शासनपद्धतीमध्ये सुधारणा करण्यावर त्यांचा भर असायचा. 

लोकमान्य टिळक हे भारताचे प्रमुख जहालमतवादी नेते होते. टिळक हे स्वराज्यासाठी प्रचंड आग्रही होते. मवाळमतवादी नेत्यांसारखं थोड्याशा सुधारणांवर समाधान मानुन राहणारे नव्हते. स्वराज्य हाच त्यांचा ध्यास होता. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.” हे त्यांचे प्रचंड गाजलेले वाक्य आहे. 

त्यांच्या काळात सामान्य लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता नव्हती. ते अशा गोष्टींबद्दल उदासीन होते. ब्रिटिशांनी चालवलेल्या शाळा कॉलेजांमध्ये फक्त त्यांना ज्या पद्धतीचे नोकर हवे होते तसे शिक्षण मिळत होते. 

लोकांमध्ये राष्ट्रीय विचार राष्ट्रीय भावना निर्माण व्हाव्यात म्हणुन टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिक्षण संस्था सुरु केल्या. केसरी (मराठीत) मराठा (इंग्रजीत) हे वृत्तपत्र सुरु केले. ह्या वृत्तपत्रातुन ते जनजागृतीचे, लोकांना आपल्या देशाबद्दल अभिमान जगवण्याचे, स्वराज्याची इच्छा चेतवण्याचे काम करत होते. 

लोकांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन चळवळी करू नयेत म्हणुन ब्रिटिश दक्ष होते. त्यावर उपाय म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करून त्यांनी लोकांना संघटित करायला सुरुवात केली. त्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत स्वराज्याचे विचार पोहोचवणे सुरु केले. 

स्वराज्यासाठी कुठल्याही मार्ग अवलंबायला टिळकांची हरकत नव्हती. त्यामुळे ते सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक तरुण क्रांतिकारी संघटनांमध्ये सहभागी होत होते. सावरकर बंधु हे त्यापैकीच एक. असे तरुण बॉम्ब बनवणे, हत्यारे जमवणे असे उद्योग करत होते. 

अशा क्रांतिकारक संघटनांमध्ये मराठी आणि बंगाली तरुण तेव्हा आघाडीवर होते. ह्यातुन काही सशस्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोट घडले. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जीव गेला. ब्रिटिशांनी पुढचा धोका ओळखुन हि चळवळ दडपायचे ठरवले. सगळीकडे अटकसत्र सुरु झाले. अनेक लोकांना अटक झाली, त्यांच्यावर खटले चालवले गेले, काही पकडलेल्या क्रांतीकारकांना फासावर चढवले गेले. 

टिळक आपल्या लेखांमधुन क्रांतीकारकांना पाठिंबा देत होते आणि स्वराज्याची मागणी करत होते. टिळकांप्रमाणेच शिवराम परांजपेसुद्धा “काळ” हे वृत्तपत्र चालवत होते आणि तशाच विचारांची मांडणी करत होते. आता ह्या दोघांना अटक होणार याचा लोकांना अंदाज आलाच होता. 

शिवरामपंतांच्या अटकेची बातमी टिळकांना नाशिकला असताना समजली. त्यांनी मुंबईत जाऊन परांजप्यांच्या खटल्यामध्ये बचावासाठी व्यवस्था केली. खटला सुरु होईपर्यंत ते आपली कामे उरकायला पुण्याला आले. खटल्याच्या वेळी परत मुंबईला जायला निघाले तेव्हा तिथे त्यांनाही अटक होण्याची दाट शक्यता होती. 

त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मुंबईत जाणे टाळावे असे सुचवल्यावर ते म्हणाले होते “ब्रिटिशांनी सगळा देशच बंदी बनवुन ठेवला आहे. अशात त्यांनी मला तुरुंगात टाकले तर फक्त मोठ्या खोलीतुन छोट्या खोलीत बंदिस्त होणे एवढाच काय तो फरक.” 

मुंबईत परांजप्याच्या खटल्याचे कामकाज सुरु झाले आणि टिळकांच्या अटकेचे वॉरंट निघाले. वारंटवर सह्या झाल्या कि काही वेळातच टिळकांकडे हि बातमी पोहोचली होती. तेव्हा ते “ज्या दुर्बल राष्ट्रात प्रतिकार करण्याचे सामर्थ्यच नाही त्या राष्ट्राच्या नेत्याला अशी बातमी आधीच कळुन काय फायदा?” असे म्हणुन शांतपणे झोपी गेले. 

त्यांना अटक करून त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवले गेले. तेव्हा तिथे सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर हेही अटकेत होते. टिळकांना पाहुन त्यांना वाईट वाटले. ते म्हणाले “बळवंतराव, आता तुम्हीही बंदी झाल्यावर महाराष्ट्राचे कसे व्हावे?”

टिळकांनी अगदी स्थितप्रज्ञाप्रमाणे उत्तर दिले. “बाबाराव, महाराष्ट्राची काळजी नको. महाराष्ट्र जर जिवंत असेल तर एका माणुस कमी झाल्यामुळे तो मरणार नाही. आणि जर तो मेलेलाच असेल तर एका माणसाने तो जिवंतही होणार नाही. तेव्हा चिंता कसली करायची?”

त्यांना अटक होऊन त्यांच्यावरसुद्धा खटला सुरु झाला. सरकारविरुद्ध चिथावणी देणे, भारतीय आणि ब्रिटिशांमध्ये वैमनस्य निर्माण करणे अशा पद्धतीचे राजद्रोहाचे आरोप त्यांच्यावर लावले गेले. ह्या खटल्यात चक्क मुहम्मद अली जिना हे त्यांचे वकील होते. 

ब्रिटिशांना आपल्या न्यायव्यवस्थेवर फार अहंकार होता. ह्या खटल्याचा निकाल मात्र आधीच ठरलेला होता. कोणीही कसाही बचाव केला तरी त्याचा काही फायदा नव्हता. टिळकांनी ह्या खटल्याकडेही आपले विचार सर्वत्र पोहचवण्याची संधी म्हणूनच पाहिले. खटल्याच्या ६ दिवसात त्यांनी तब्बल २१ तास आपल्या बचावाचे भाषण करून एक विक्रम रचला. 

शेवटी ते दोषी ठरलेच. न्यायाधीशांनी त्यांना भारतापासून फार दूर असलेल्या मंडालेच्या तुरुंगात ६ वर्षांचा कारावास आणि १००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. त्यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे का असे त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेत.

“मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्युरींचा निर्णय काहीही असला तरी माझ्या लेखी मी निर्दोषच आहे. कायद्याचे नियंत्रण करणाऱ्या या न्यायपीठाहूनही मोठ्या अशा काही शक्ती अस्तित्वात आहेत. कदाचित दैवाचीच अशी इच्छा असेल कि माझ्या मुक्तीपेक्षा माझ्या बंदिवासाने माझे कार्य पुढे जावे.” 

टिळकांना झालेल्या ह्या कठोर शिक्षेमुळे ब्रिटिशांवर चौफेर टीका झाली. लोकांमध्ये अजुन असंतोष वाढला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version