मराठी गोष्टी

पोहे

पोहे हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. अनेकांचा नाश्त्याचा आवडता पदार्थ म्हणजे पोहे. बऱ्याच घरी हे नाश्त्यानिमित्त किंवा संध्याकाळी हमखास बनतातच. पण नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहणारे लोकसुद्धा सकाळी सकाळी ठेल्यांवर गाड्यांवर पोह्यांवर ताव मारतात. 

फोडणी घातलेले कांदेपोहे हे सर्वात जास्त बनत असले तरी दूध पोहे, दही पोहे, दडपे पोहे अशी पोह्यांची अनेक रूपेसुद्धा चवीत बदल म्हणुन छान लागतात.

मराठी लोकांमध्ये लग्नासाठी स्थळ बघायला गेल्यावर पोहे करणं हि एक वेगळीच परंपरा बनलेली आहे. 

ह्या पोह्याची अशी मूलकथा नसली तरी श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या एका कथेत मात्र पोह्यांचा उल्लेख आहे. 

सुदाम्याचे पोहे

श्रीकृष्ण आणि बलराम यांना सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिष्य म्हणुन पाठवलं होतं. तिथे त्यांचा सुदाम नावाचा एक गरीब ब्राह्मण मित्र होता. या मित्रांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. सुदामातर श्रीकृष्णाची भक्तीच करत असे. 

शिक्षण संपल्यावर ह्या मित्रांचे मार्ग वेगळे झाले. सुदामा आपल्या गावी गेला. श्रीकृष्ण बलराम मथुरेला आपल्या राज्यात गेले. 

श्रीकृष्णाने कंसाला मारले होते. कंसाचा सासरा जरासंध हा महाबलाढ्य राजा होता. तो आपल्या जावयाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वारंवार मथुरेवर हल्ला करत होता. त्याचे अनेक हल्ले परतवले तरी तो शांत बसत नव्हता. 

मथुरा जरासंधाच्या राज्याएवढे मोठे आणि बलवान नव्हते. ह्या लढायांमध्ये मथुरेचे आणखी नुकसान टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी सर्व यादवांना घेऊन दूर द्वारका नावाची नगरी वसवली. समुद्राजवळ असल्यामुळे तेथे व्यापार बहरला, द्वारका समृद्ध झाली. तिथल्या वैभवाची कीर्ती दूरवर पसरली. 

तिकडे सुदामा मात्र भिक्षा मागुन आपले आयुष्य जगत होता. त्याच्या बायको मुलांसोबत तो एका छोट्याशा झोपडीवजा कुटीत राहत होता. अनेकदा त्यांना पोटभर खाण्याइतके अन्नही मिळत नसे. 

आपल्या मुलांचे हाल त्यांना बघवत नव्हते. सुदामाच्या बायकोने सुदामाकडुन श्रीकृष्णांबद्दल खुपदा ऐकले होते. एकदा तिने सुदाम्याला श्रीकृष्णाला भेटुन त्याला आपली परिस्थिती सांगावी आणि काही त्यांच्याकडून काही मदत होईल का बघावे असे सुचवले. 

मित्रापुढे हात पसरण्याची सुदाम्याची इच्छा नव्हती. पण आपल्या मुलांकडे बघुन आणि श्रीकृष्णाची अनेक वर्षांनंतर भेट होईल या आनंदाने सुदामा द्वारकेला जायला तयार झाला. जाता जाता बायकोने त्याला रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणुन त्याला प्रवासातही खाता येतील आणि श्रीकृष्णालाही देता येतील अशा हेतूने पोहे एका कपड्यात बांधुन दिले. 

सुदामा पायी पायी प्रवास करत द्वारकेत पोहोचला आणि तिथले वैभव पाहुन हरखुन गेला. श्रीकृष्णाने त्याचे प्रेमाने स्वागत केले. गळाभेट घेतली. आपल्या सर्व परिवाराला भेटवले.

श्रीकृष्णाचा महाल, तिथले वैभव, दिवस रात्र पंचपक्वान्नांचा थाट पाहुन सुदामा भारावला होता. त्याला आपल्या मित्राचं सुख पाहुन आनंदही झाला. पण त्याला आपली परिस्थिती सांगावीशीही वाटली नाही आणि आपण आणलेली पोह्यांची साधीशी भेट द्यावीशी वाटली नाही. 

श्रीकृष्ण शेवटी देव होते, मनकवडे होते. त्यांनी सुदाम्याची परिस्थिती, येण्याचे कारण सर्व जाणले होते. पण त्यांनी तसे दाखवले नाही. गप्पा मारता मारता ते सुदाम्याला म्हणाले: 

“अरे सुदामा, तू तर माझ्यासाठी काही भेट आणली नाहीस. पण वहिनींनी माझ्यासाठी काही न काही नक्कीच पाठवले असेल.”

सुदाम्याने आढेवेढे घेतले. पण नाही नाही करता करता श्रीकृष्णांनी सुदाम्याजवळची पुरचुंडी ओढूनच घेतली. ती पुरचुंडी उघडून त्यातले पोहे बघुन श्रीकृष्ण खुप खुश झाले. त्यांनी आणि त्यांच्या राण्यांनी मिळुन खुप आनंदाने ते पोहे खाल्ले. 

आपली पोह्याची साधारण भेट राजमहालात राहणाऱ्या श्रीकृष्ण आणि त्यांच्या राण्यांनी इतक्या प्रेमाने, मानाने स्वीकारलेली पाहुन सुदामा अतिशय सद्गदित झाला. त्यांच्याकडून श्रीकृष्णाला काही मागणे झालेच नाही. 

काही दिवस राहुन श्रीकृष्णाचा निरोप घेऊन सुदामा परत आपल्या गावी निघाला. वाटेत तो आपल्या बायकोला आता काय सांगावे, रिकाम्या हाताने परत कसे जावे याचा विचार करायला लागला. श्रीकृष्णाने जशी हक्काने काय भेट आणली हे विचारले, आपल्याजवळून ओढून पोहे खाल्ले तसेच त्याने आपल्याला स्वतःहून काहीच भेट दिली नाही, जसे पोह्यांचे मनातले ओळखले तसे आपल्या गरजेचे का नाही ओळखले असे विचार सुदाम्याच्या मनात शिवुन गेले. 

तो परत आपल्या गावी पोहोचला तेव्हा त्याला गाव ओळखता आले नाही. सर्व झोपड्यांच्या जागी आता आलिशान बंगले दिसत होते. 

श्रीकृष्णांनी आपल्या मित्राची परिस्थिती ओळखुन द्वारकेची रचना करणाऱ्या देवांच्या शिल्पकार विश्वकर्म्याला सुदामा आणि परिवारासाठी आलिशान महाल बांधण्याचा आदेश दिला होता. सुदाम्याच्या पत्नीने आपल्याला आतापर्यंत मदत करणाऱ्या, संभाळून घेणाऱ्या सर्व शेजाऱ्यांनाही अशीच कृपा करावी मग आपल्याला घर द्यावे अशी विनंती केली, तीही मान्य झाली होती. 

सुदाम्याच्या परस्पर त्याच्या पोह्याच्या प्रत्येक दाण्याची अनेक पटींनी परतफेड श्रीकृष्णाने काही न बोलता प्रेमाने केली होती. आपल्या मनात आपल्या मित्राबद्दल असे क्षुद्र विचार काही क्षणांसाठी येऊन गेल्याचा सुदाम्याला पश्चाताप झाला. त्याने श्रीकृष्णाचे स्मरण करून त्याला नमसकार केला आणि आपल्या मित्राचे आभार मानले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version