मराठी गोष्टी

पिझ्झा

पिझ्झा हा जगभरातला लोकांचा आवडता पदार्थ आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये आता तो विकला जातो. तुम्ही परदेशी प्रवास करत असाल आणि तुम्हाला तिथले पदार्थ माहित नसतील किंवा खावेसे वाटत नसतील तर कुठेतरी तुम्हाला पिझ्झा तरी जवळपास नक्कीच मिळुन जाईल. 

पिझ्झा आता भारतातसुद्धा भरपूर शहरांमध्ये आणि घरांमध्ये पोहोचला आहे. काही वर्षांपूर्वी मात्र त्याचं नावीन्य फार होतं. मी औरंगाबादला शाळेत असताना एक नविन हॉटेल सुरु झालं होतं, तिथे पिझ्झा मिळायचा. तिथे बाबा आम्हाला घेऊन गेले होते. माझ्या वर्गात मीच पिझ्झा पहिल्यांदा खाल्ला होता आणि नंतर माझ्या मित्रांना त्याबद्दल रंगवुन सांगितल्याचं सुद्धा मला आठवतं. 

तेव्हा हॉटेलात जाणं आज इतकं सर्रास होत नव्हतं. पिझ्झा पहिल्यांदा खाल्ल्यानंतर आम्ही अधुन मधुन कधी हॉटेलमध्ये गेलो किंवा प्रवासाला गेलो कि मी आधी पिझ्झा आहे का हेच बघायचो. नंतर असे अनेक हॉटेल पिझ्झा विकायला लागले. बेकरीमध्ये पिझ्झा बेस सहज मिळायला लागले आणि आम्ही घरीसुद्धा गॅसवरती पिझ्झा बनवायला लागलो. 

आता डॉमिनोज, पिझ्झा हट यासारखे ब्रँड जगभरात पसरल्यामुळे पिझ्झा खाणं, घरी मागवणं हे आता सामान्य झालं आहे. 

हा पिझ्झा मूळचा इटलीचा पदार्थ आहे. बरेच पदार्थ वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या पद्धतीने अनेक शतकांपासुन वेगवेगळ्या संस्कृतीत खाल्ले जातात. पिझ्झाचंही तसंच आहे. मध्यपूर्वेच्या, ग्रीस आणि युरोपच्या इतिहासात सपाट ब्रेड वर इतर पदार्थ टाकुन खाल्ल्याचे बरेच उल्लेख आहेत. 

आता जे पिझ्झाचं स्वरूप आणि नाव आहे ते मात्र इटलीमधून आलेलं आहे. तिथला पारंपरिक पिझ्झा हा नेपल्स या गावचा असल्याचं मानतात. सपाट ब्रेडवर चीझ, टमाटे आणि इतर पदार्थांचे “टॉपिंग” करून ते लाकडी ओव्हनमध्ये उच्च तापमानात ठेवुन गरमागरम वाढतात. 

तिथल्या पिझ्झाचे तुकडे (स्लाईसेस) करून देत नाहीत, ते खाणार्याने स्वतः काटा चमच्याने करून खायचे असतात. पण बाकी ठिकाणी मात्र त्याच्या आकारामुळे हाताने सहज खाता येईल असे तुकडे करून देण्याची पद्धत आहे. 

आधी पिझ्झा हा सामान्य वर्गीयांसाठी असलेला खुल्या हॉटेलांमधुन विकला जाणारा पदार्थ होता. 

एकदा नेपल्स गावी “राणी मार्गारिटा” भेट देणार होती. तिच्यासाठी राफेल एस्पोसितो याला पिझ्झा बनवुन देण्यासाठी बोलावण्यात आले. त्याने तीन प्रकारे पिझ्झा बनवुन दिले. त्यातल्या इटलीच्या झेंड्याचे रंग असलेला, म्हणजे लाल (टमाटे), पांढरा (मोझरेला चीझ), हिरवा (तुळसीची पाने) राणीला विशेष आवडला. 

मग त्या पिझ्झाला “पिझ्झा मार्गारिटा” असे राणीचे नाव देण्यात आले. हि दंतकथा असली तरी नेपल्सच्या त्या हॉटेलात राणीच्या कार्यालयाकडून आलेले प्रशस्तीपत्र आजही जपुन ठेवलेले आहे. 

तर अशाप्रकारे पिझ्झाला राजमान्यतासुद्धा मिळाली. इटलीच्या इंग्लंड, अमेरिका येथे स्थलांतरित झालेल्या लोकांनी तिचे पिझ्झा विकायला सुरुवात केली. हळूहळू युरोप अमेरिका येथे लोकप्रिय होत जगभर पिझ्झा पसरला. 

आता “पिझ्झा पार्टी” हा पार्टी देण्याचा एक खास प्रकार बनला आहे. एखादी फुटबॉल किंवा क्रिकेटची मॅच, घरीच एखादा चित्रपट सर्वांनी मिळुन बघण्यासाठी, ऑफिसातही महिन्यातुन एकदा आपल्या टीमसोबत छान वेळ घालवण्यासाठी किंवा एखादा मोठा टप्पा पार केल्यावर साजरे करण्यासाठी भरपूर पिझ्झा मागवुन त्याच्या स्लाइसेसचा शीतपेयांसोबत आनंदे घेणे हि आता सामान्य बाब झालेली आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version