मराठी गोष्टी

पहिला श्लोक

महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी म्हटले जाते. म्हणजे प्रथम कवी. ते यासाठी कि रामायण हे संस्कृत वाङ्मयातले पहिले काव्य मानले जाते. त्याचे रचनाकार वाल्मिकी असल्यामुळे ते प्रथम कवी. 

परंतु रामायण हे एक महाकाव्य असले तरीही त्या आधी वाल्मिकींनी एक श्लोक रचला होता. 

त्याची गोष्ट अशी कि एकदा वाल्मिकी नदीतीरी स्नानासाठी चालले होते. त्यांचा शिष्य त्यांचे सामान घेऊन त्यांच्यासोबत येत होता. 

नदीचे पाणी फार नितळ होते. ते पाहुन वाल्मिकींचे मन प्रसन्न झाले. ते शिष्याला म्हणाले पहा एखाद्या पवित्र हृदयी माणसाच्या मनासारखे हे पाणी स्वच्छ आहे. इथेच थांबुया. 

तिथेच एक क्रौन्च पक्ष्याची जोडी होती. ते एकमेकांशी खेळण्यात मग्न होते. त्यांचे एकमेकांशी प्रेमाने खेळणे पाहुन वाल्मिकींना अजुन छान वाटले. 

दुर्दैवाने तेवढ्यात एक बाण येऊन त्या पक्ष्याला लागला आणि तो तिथेच मरुन पडला. त्याच्या जोडीदाराने दुःखाने जोरजोरात आक्रोश केला. दुःख सहन करून तीही लगेच गतप्राण झाली. 

एका शिकाऱ्याने एका पक्ष्याची शिकार केली आणि त्या दुःखाने आणखी एका पक्ष्याचा जीव गेला. 

वाल्मिकीसुद्धा हे पाहुन अत्यंत दुःखी झाले. सहज स्फूर्तीने त्यांच्या तोंडुन त्यांच्या भावना काव्याच्या स्वरूपात बाहेर पडल्या: 

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्॥’

हे निषादा (शिकारी) तु विनाकारण प्रेमात मग्न असणाऱ्या निरपराध पक्ष्यांचा जीव घेतलास. तुला कधीही सुख मिळणार नाही. 

हा आपोआप रचला गेलेला श्लोक संस्कृतमधील पहिला श्लोक समजला जातो. 

पुढे मग ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकी यांनी याच वृत्तात रामायण रचुन प्रभु श्रीरामांची जीवनकथा जगासमोर मांडली. हे महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. समाजमनावर याचा प्रचंड पगडा आहे. कित्येक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. अनेक संतांनी आपल्या परीने हि कथा आपापल्या भाषेत सांगितली आहे. सगळ्यांच्या मूळ आधार वाल्मिकी रामायण हेच आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version