शीर्षक वाचुन कदाचित तुम्हाला वाटेल कि हि एखाद्या मॅच फिक्सिंगची गोष्ट असु शकते. पण तसं नाही. हि एक खरी घडलेली गोष्ट आहे. एक खेळाडु जाणुन बुजुन शर्यत हरला, तरीही त्याचं सर्वांनी कौतुक केलं. का?
झालं असं कि स्पेनमध्ये एक क्रॉस कंट्री शर्यत होती. या शर्यतीत भाग घेण्यासाठी परदेशातुन खेळाडु आले होते.
एबल मुटाई नावाचा एक केनियाचा खेळाडु या शर्यतीत आघाडीवर होता. त्याच्या मागे काही अंतरावर इव्हान फ़र्नांदेझ अनाया नावाचा खेळाडु पळत होता.
अंतिम रेषा जवळ आली आणि एबल हि शर्यत जिंकत आला होता, पण त्याचा अंतिम रेषेच्या काही मीटर अलीकडेच गैरसमज झाला कि त्याने शर्यत पार केली आणि तो जिंकला. या गैरसमजामुळे तो तिथेच थांबला.
तिथले प्रेक्षक त्याला ओरडून ओरडुन पुढे जा असे सांगत होते पण त्याला स्पॅनिश भाषा येत नसल्यामुळे त्याला त्यांचे म्हणणे समजत नव्हते आणि तो गोंधळला.
तेवढ्यात इव्हान त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्याला हा गोंधळ लक्षात आला. काही सेकंदात तो एबलच्या गोंधळाचा फायदा घेऊन ती शर्यत जिंकु शकला असता. पण हे त्याच्या मनाला पटले नाही.
त्याने एबलला पुढे जायला सांगितले आणि स्वतः त्याच्या मागे राहुन शर्यत संपवली.
शर्यत संपल्यावर एबलने इव्हानचे आभार मानले.
जेव्हा इव्हानला याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला “एबल माझ्या बराच पुढे होता. त्याच्या आणि माझ्यात जे अंतर निर्माण झालं होतं, ते जर तो गोंधळुन थांबला असता, तर मला पार करता येणं शक्यच नव्हतं. तोच जिंकला असता आणि त्यानेच जिंकायला हवं होतं. त्याचा गैरफायदा घेऊन मी जिंकलो असतो तर मला काही समाधान लाभलं नसतं आणि माझ्या देशवासियांनासुद्धा आवडलं नसतं.”
जिंकण्यासाठी उत्तेजक पदार्थ घेणे, बेईमानी करणे, खोटे बोलणे अशा बातम्या आपण वाचत राहतो. पण अशी गोष्ट वाचल्यावर दिसुन येते कि जिंकणे हेच सर्वकाही नसते, त्यापलीकडेही काही असते. काहीही करून जिंकण्यापेक्षा योग्य मार्गाने जिंकणे जास्त महत्वाचे याची जाणीव असणारे लोक या जगात आहेत.
इव्हान शर्यत हरला पण त्याने आपली खिलाडुवृत्ती दाखवुन सर्वांची मने जिंकली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take