एक मायडस नावाचा राजा होता. देवाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एखादे वरदान मागायला सांगितले.
मायडस खुश झाला. त्याला काय मागावे याचा विचार करताना एक कल्पना सुचली. त्याला सोने खुप आवडत असे. त्याला आता आपल्याला खुप सोने मिळवुन आपला खजिना भरण्याची संधी आहे असे वाटले. त्याने देवाला मागितले कि “मला अशी शक्ती दे कि मी ज्याला हात लावेल ते सोन्याचे होऊन जाईल.”
देवाने हसुन त्याला तशी शक्ती दिली.
मायडसने आपली शक्ती वापरून बघावी म्हणुन एक दगड हातात घेतला. तो दगड क्षणार्धात सोन्याचा झाला. राजाला अत्यंत आनंद झाला. त्याने दिसेल त्या वस्तूला हात लावुन तिला सोन्याची करायला सुरु केले.
आपल्या प्रजेला आपली नवी शक्ती दाखवुन खुश करावे म्हणुन तो आपल्या आवडत्या घोड्यावर बसुन बाहेर जायला निघाला तेव्हा तो घोडाही सोन्याचा झाला. राजाला जरा वाईट वाटले.
तो घोड्यावरून उतरून परत राजवाड्यात निघाला. वाटेत चुकून त्याचा हात गुलाबाच्या झाडाला लागला, ते झाड आणि सर्व गुलाब सोन्याचे झाले.
त्याला भुक लागली होती. तो येऊन टेबलवर बसला तेव्हा त्याच्या स्पर्शाने टेबल खुर्ची, ताट वाटी सर्व सोन्याचे झाले. त्याने ब्रेडचा तुकडा मोडताना तो ब्रेडही सोन्याचा झाला. त्याने पाणी प्यायला ग्लास हातात घेतला तेव्हा तो ग्लास आणि त्यातले पाणीही सोन्याचे झाले. राजाला आता वैताग यायला लागला होता.
तेवढ्यात त्याची लाडकी मुलगी पळत त्याच्याकडे आली. तिने तिच्या बाबांना सांगितले कि तिचे आवडते गुलाबाचे झाड सोन्याचे झाले आहे आणि आता त्याला मुळीच सुगंध येत नाही. बोलत बोलत ती बाबाला बिलगली. मायडसचा स्पर्श होताच ती मुलगी पण एक सोन्याचा पुतळा बनली.
राजाचे आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होते. त्याला आता खुप दुःख झाले. आपण हे देवाला काय मागुन बसलो याचा त्याला पश्चाताप झाला. त्याने मनात देवाची प्रार्थना करून क्षमा मागितली आणि देवाला आपले वरदान परत घेऊन पुन्हा सगळे पूर्ववत करायला सांगितले.
देवाने त्याला क्षमा केली आणि त्याच्या स्पर्शाने सोने बनलेले पुन्हा सर्व आधीसारखे झाले. राजाने प्रेमाने आपल्या मुलीला मिठीत घेतले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take