मराठी गोष्टी

महात्मा बसवेश्वर

महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील महान कन्नड कवी आणि तत्वज्ञ होते. त्यांनी लिंग, जन्म, जात याच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाचा विरोध करत वीरशैव लिंगायत समाजाची सुरुवात केली ज्यात सर्वांचे भक्तीद्वारे शिवाशी थेट नाते जोडले गेले. 

त्यांचा जन्म एका कन्नड ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी अनेक वर्षे धर्म आणि शास्त्रांचा अभ्यास केला. तेव्हा संस्कृतमध्ये असलेले साहित्य सर्वसामान्यांना सहज उपलब्ध नव्हते. धर्म, आचरण यावर ब्राह्मणांचा पगडा होता. स्त्रियांना आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या लोकांना भेदभावाचा सामना करावा लागत असे. 

त्यामुळे बसवेश्वरांनी आपले साहित्य कन्नड मधेच रचले जेणेकरून सर्वसामान्यांना ते सहज समजावे आणि कोणावर अवलंबुन राहावे लागु नये. 

त्यांचे वडील राजदरबारी मंत्री होते. त्यांनी स्वतः कोषागारात काम सुरु करून पुढे मुख्यमंत्री होण्यापर्यंत प्रगती केली. या उच्चपदावरून काम करत असताना त्यांनी सामाजिक सुधारणांवर भर दिला. त्यांनी “अनुभव मंडप” नावाचा उपक्रम सुरु केला. यात सर्व जातीच्या, वर्णाच्या स्त्री आणि पुरुष दोघांना मुक्त प्रवेश असे आणि सर्वांसोबत तत्वज्ञान, शास्त्र, आयुष्यातले प्रश्न यावर चर्चा होत असे. 

शैव पंथाचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी शिवाला प्रमुख दैवत मानुन सर्व अनुयायांना शिवभक्ती करण्यास प्रेरित केले. सदैव आपल्या भक्तीची आठवण म्हणुन शिवाचे एक प्रतीक असलेले लिंग सर्वांना गळ्यात बांधण्यास दिले. या प्रतिकामुळे आणि शिवभक्तीमुळे लिंगायत हे या समाजाचे नाव झाले. 

त्यांनी भक्त आणि देव यामध्ये कुठल्याही मंदिर, रूढी परंपरा यांचा अडथळा येऊ नये म्हणुन शरीर हेच एक मंदिर आहे, आणि माणसाने सदैव देवाची भक्ती करत आपला उद्धार करावा अशी शिकवण दिली. कुठल्याही भेदभावाला थारा न देता एक भक्त थेट आपल्या देवाशी नाते जोडु शकतो असा महत्वाचा संदेश त्यांनी दिला. 

त्यांचे अनुयायी आजही मोठ्या संख्येने कर्नाटक आणि इतर प्रदेशात आहेत. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version