मराठी गोष्टी

महर्षी दधिची आणि इंद्रवज्र

महर्षी दधीची हे ऋषी अथर्वन आणि त्यांची पत्नी चित्ती यांचे पुत्र होते. असे म्हणतात कि या अथर्वन ऋषींनी अथर्ववेद निर्माण केला. 

दधीची हे अत्यंत हुशार आणि देवभक्त होते. त्यांनी शास्त्रांचे अध्ययन करून प्रचंड ज्ञान मिळवले होते. 

एकदा ते क्षुप राजाने आयोजित केलेल्या वादविवादात पराभुत झाले. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी शिवाचे तप आरंभ केले. 

अनेक वर्षे तप केल्यानंतर शंकराने प्रसन्न होऊन त्यांना असा वर दिला: 

दधीची आनंदित झाले आणि आपल्या आश्रमात परतले. त्यानंतर पुन्हा कधीही वादविवादात ते पराभुत झाले नाहीत. 

काही वर्षांनी एक वृत्र नावाचा राक्षस लोकांना आणि देवांना त्रास देऊ लागला. नद्यांचे पाणी अडवुन सर्वांचं जगणं कठीण करू लागला. 

इंद्र हा पर्जन्यदेव (पावसाचा देव) आहे , त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त करणे त्याला भाग होते. त्याने वृत्राशी युद्ध सुरु केले पण तो त्याला मारू शकला नाही. 

याचे कारण म्हणजे वृत्र राक्षसाला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते कि त्याला लोखंड, लाकुड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही. सर्व शस्त्रांमध्ये यापैकी कशाचातरी वापर आवश्यक असतोच त्यामुळे त्याला मारणे अशक्यप्राय झाले होते. 

तेव्हा भगवान विष्णूंनी इंद्राला दधीची ऋषींची आणि त्यांना मिळालेल्या महादेवाच्या आशीर्वादाची आठवण करून दिली. 

देवांनी दधीची ऋषींना भेटुन त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. दधीची ऋषींनी ताबडतोब हे जाणले कि त्यांनी प्राण त्यागुन देवांना आपली हाडे दिली नाहीत तर वृत्र राक्षसाला मारता येणार नाही आणि सर्व सृष्टी धोक्यात येईल. 

जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला प्राण लगेच त्यागला. मग देवांनी त्यांची हाडे वापरून इंद्रासाठी एक नवे वज्र आणि इतर शक्तिशाली शस्त्रे बनवली. 

ह्याच वज्राचा वापर करून इंद्राने वृत्र राक्षसाचा वध केला आणि सृष्टीवरचे संकट दूर केले. 


महर्षी दधीची यांचे शरीर आणि हाडे एवढी मजबुत होण्यामागे अजून एक कथा आहे: 

एकदा देवांनी आपली दिव्य शस्त्रे कोणा चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडु नयेत यामुळे महर्षी दधीची यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिल्या. 

महर्षी दधीची हे एक दिव्य पुरुष असल्यामुळे त्यांच्या आश्रमात जाऊन हि शस्त्रे घेण्याची कोणाची हिंमत झाली नसती. 

देवांना बराच काळ कुठले युद्ध न झाल्यामुळे त्यांची गरजच पडली नाही त्यामुळे ते ती नेण्यासाठी आलेच नाहीत. अनेक वर्षे ती शस्त्रे सांभाळुन महर्षी थकले होते. त्यांनी मंत्रोच्चारण करून ती पाण्यात विरघळवली आणि ते पाणी पिऊन टाकलं. त्यामुळे ती सर्व शक्ती त्यांच्या शरीरात आणि हाडांमध्ये एकटवली. 

वृत्र राक्षसाला हरवण्यासाठी देवांना त्या शस्त्रांची गरज पडली तेव्हा ते पुन्हा आश्रमात आले. महर्षी दधीचिंनी मग आपले प्राण त्यागुन देवांना आपली हाडे उपलब्ध करून दिली. 


महर्षी दधीची यांनी आपले प्राण त्यागले तेव्हा त्यांची पत्नी गभस्तिनी (दुसरे नाव स्वरचा) आश्रमात उपस्थित नव्हत्या आणि गरोदर होत्या. त्या परत आल्या आणि त्यांना झालेला प्रकार कळला तेव्हा त्यांना दुःख सहन झाले नाही. 

त्यांनी एका पिंपळाच्या वृक्षाखाली एका मुलाला जन्म दिला आणि त्यांनीही हे जग सोडले आणि स्वर्गात आपल्या पतीजवळ गेल्या. 

त्या मुलाचे नाव पिंपळाच्या झाडावरून पिप्पलाद पडले आणि तोही पुढे प्रसिद्ध ऋषी बनला.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version