मराठी गोष्टी

लोभी मगर आणि चतुर माकड

एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते. 

एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनारी आलं. त्याला किनाऱ्यावरच्या जांभळाच्या झाडावर माकड बसलेलं दिसलं. माकड मजेत जांभुळ खात होतं. 

खुप भुक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणालं “अरे हे काय खात आहेस तु? बघायला छान वाटतंय, थोडं मला पण दे कि.”

माकडाने थोडे जांभुळ तोडून दिले. ते मगराला खुप आवडले. मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्यावर फळ खाण्यासाठी येऊ लागले. 

माकड वेगवेगळी फळे आणुन त्यास खायला देऊ लागले. त्यांची छान मैत्री झाली. 

एक दिवस मगर काही फळे आपल्या बायकोसाठी घेऊन घरी गेले. ती फळे खाऊन ती सुद्धा खुश झाली. पण तिच्या मनात एक विचार आला. 

हि फळे इतकी गोड आहेत, आणि ते माकड तर दर रोज अशी भरपुर फळे खात असेल. मग त्या माकडाचे काळीज तर किती गोड असेल. 

तिला ते काळीज खाण्याची इच्छा झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला माकडाचे काळीज आणुन द्यायचा आग्रह केला. 

दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेले आणि सांगितले कि त्याच्या बायकोला माकडाने दिलेली फळे खुप आवडली. आणि तिने त्याला घरी जेवायला बोलावले आहे. ते ऐकुन माकड जायला तयार झाले. मगर माकडाला आपल्या पाठीवर बसवुन नदीतुन निघाले. 

माकडाने गप्पा मारता मारता विचारले कि “अरे मित्रा, माझ्यासाठी काय जेवायला बनवणार आहेत वहिनी?”

तेव्हा मगर म्हणाले कि “अरे तिचा तुझंच काळीज खाण्याचा विचार आहे. तिला फळे खाऊन वाटलं कि तू तर रोज इतकी गोड फळे खातोस. मग तुझं काळीज किती गोड असेल?”

माकड घाबरले. पण तसे काही न दाखवता ते म्हणाले “अरेच्चा! तु मला आधी का नाही सांगितलेस कि वहिनींना माझे काळीज हवे आहे. मी तर ते झाडावर काढुन ठेवले आहे. चल आपण परत झाडावर जाऊन घेऊन येऊया.”

ते परत फिरले. किनाऱ्यावर पोचताच माकडाने जोरात उड्या मारत झाड गाठले आणि वर चढुन म्हणाले. 

“मी तुला इतके दिवस फळे खाऊ घातली आणि तु मलाच मारून काळीज खायला निघालास. अरे मूर्खां काळीज कोणी काढुन ठेवत असतं का? आता जा, तुला माझं काळीजही मिळणार नाही आणि फळेही मिळणार नाहीत.”

मगर निराश होऊन परत गेले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version