Site icon मराठी गोष्टी

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

axe, timber, wood

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा. 

एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. 

तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. विहीर फार खोल होती. त्याला त्याच्या तळाशी जाऊन कुऱ्हाड काढता येणे शक्य नव्हते. आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते. 

त्याच्याजवळ एकच कुऱ्हाड होती. तीच पाण्यात पडल्यामुळे त्याच्याकडे आता लाकूड तोडण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नव्हते. आता आपल्या कुटुंबाला खाण्यापिण्यासाठी अन्न, पैसे कसे मिळवावेत याचा विचार करून तो खुप दुःखी झाला आणि रडु लागला. 

त्याचं रडणं ऐकुन एक परी प्रकट झाली. तिने लाकूडतोड्याला तो का रडतो आहे हे विचारले. लाकूडतोड्याने त्याची परिस्थिती सांगितली. 

परीने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. तिने विहिरीत उडी मारली आणि जादूने एक चांदीची कुऱ्हाड घेऊन वर आली. लाकुडतोड्या म्हणाला हि माझी कुऱ्हाड नाही.

परीने पुन्हा उडी मारली आणि यावेळेस सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर आली. लाकूडतोड्याने ती कुऱ्हाड सुद्धा आपली नाही असे सांगितले. 

परीने पुन्हा उडी मारली आणि यावेळी मात्र लाकूडतोड्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन वर आली. लाकूडतोड्याने हीच माझी कुऱ्हाड असे सांगुन ती घेतली आणि परीचे आभार मानले. 

लाकूडतोड्याने आपल्या खऱ्या कुऱ्हाडीपेक्षा अनेकपटीने किंमती असलेल्या सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी समोर असुन सुद्धा खोटेपणा केला नाही, प्रामाणिकपणे आपली असलेलीच कुऱ्हाड घेतली. त्याच्या प्रामाणिकपणावर परी खुश झाली आणि त्याला बक्षीस म्हणुन त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुऱ्हाडी दिल्या. 

लाकूडतोड्या खुप खुश झाला आणि त्या कुऱ्हाडी घेऊन आनंदाने आपल्या घरी गेला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramMessageShare
Exit mobile version