मराठी गोष्टी

कोंबड्याची शान

एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडुन सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. 

दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खुप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशहा अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले. 

थोड्याच वेळात बिरबल आला. अकबराने सर्वांना उद्देशुन सांगितले “मंडळी, आज मला एक विचित्र स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला असं दिसलं कि इथल्या जवळच्या तलावात तुम्हा सर्वांना अंडी सापडली, आणि त्यापैकी एक अंडं सोन्याचं होतं. मला वाटतं आपण त्याचा शोध घेतला पाहिजे.” 

सर्व तलावाजवळ गेले. एक एक करून प्रत्येकजण तलावात डुबकी मारे, आणि आपल्या अंगरख्यात लपवलेले अकबराने दिलेले अंडे बाहेर काढुन पुन्हा पाण्यावर येई. 

असे करत बिरबलाची पाळी आली. त्याला लोक म्हणाले, जा बिरबलजी, तुम्हीच खाविंदांचे खास आहेत, कदाचित ते सोन्याचे अंडे तुम्हालाच सापडेल. 

बिरबलाला हा प्रकारावर संशय येत होता. पण बादशहाचा आदेश कोणी टाळू शकत नव्हते. बिरबलही तलावात गेला आणि पाण्याखाली डुबकी मारून इकडे तिकडे पाहिले. एकही अंडे त्याला दिसले नाही. तेव्हा आपली फजिती करण्याचा बेत त्याच्या लक्षात आला. 

तो पाण्याबाहेर आला आणि कुक कुक कुक असा आवाज काढत इकडे तिकडे फिरू लागला. 

अकबराने विचारले “बिरबल हा काय प्रकार आहे? अंडं कुठे आहे? आणि हे असले आवाज का काढतो आहेस तू?”

बिरबल म्हणाला “खाविंद, बाकी सर्व कोंबड्या आहेत म्हणुन त्यांना अंडी देता आली. मी कोंबडा आहे. मी अंडं देऊ शकत नाही, म्हणुन मी कोंबड्याच्या आवाज काढतोय.”

आपली फजिती करण्याचा बेत बिरबलाने अशा प्रकारे उलटवला याचे अकबराला कौतुक वाटले, आणि त्याच्या विनोदबुद्धीवर हसु आले. पण बिरबलाची फजिती करता करता आपणच कोंबड्या झाल्यामुळे दरबारी लोक मात्र निराश झाले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version