मराठी गोष्टी

कालिया मर्दन

कृष्ण गोकुळात लहानाचा मोठा असताना अनेकदा यमुनेच्या काठी आपल्या गोपाळ मित्रांसोबत खेळायला जात असे. 

एकदा गोकुळाजवळ यमुनेमध्ये कालिया नावाचा भयानक नाग आपल्या बायकांसहित रहायला आला. 

त्याने यमुनेचे पाणी विषारी करून सोडले. 

तो अतिविशाल पाच पाच फणे असलेला भयंकर नाग होता. 

खरेतर त्याचे ठिकाण एका दूरवर बेटावर होते. 

पण अशा नागांना विष्णुचे वाहन असलेला गरुड पक्षी मारत असे. 

गरुडाला एका स्त्रीच्या शापामुळे वृंदावन भागात प्रवेश नव्हता. 

त्यामुळे त्यांच्यापासून सुटका होईल या विचाराने कालियाने वृंदावनाजवळ यमुनेत मुक्काम केला होता. 

पण तो नुसता राहिला नाही, त्याने आसपासच्या लोकांना मारून दहशत पसरवली. 

यमुनेचे पाणी इतके विषारी झाले कि तिथे इतर सर्व प्राण्यांना राहणे मुश्किल झाले, गुरांना जनावरांना पाणी पिणेही अशक्य झाले. 

कृष्णाला आतापर्यंत मारायला अनेक दानवांनी प्रयत्न केला असल्यामुळे यशोदामाईने त्याला यमुनेत जाऊ नकोस असे सांगितले होते. 

कालियाची दुष्कीर्ती कृष्णाच्या कानावर आलीच होती. 

त्याचा कसा बंदोबस्त करावा याचा विचार कृष्ण करत होता. 

एक दिवस मित्रांसोबत विटी दांडु खेळता खेळता कृष्णाला एक कल्पना सुचली. 

त्याने दांडु घेऊन विटी इतक्या जोरात उडवली कि ती यमुनेत जाऊन पडली. 

मग ती विटी काढायच्या बहाण्याने कृष्ण यमुनेजवळ गेला आणि नदीत उडी टाकली. 

इतर मुले घाबरली. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. 

यशोदा, नंद आणि इतर मोठी माणसे धावत पळत यमुनेच्या काठी आली. 

कृष्णाने कालिया असलेल्या यमुनेत उडी मारली हे ऐकून यशोदेला चक्करच आली. 

सगळे चिंताक्रांत होते. 

तिकडे कृष्णाने यमुनेत उडी मारल्यावर कालिया आश्चर्यचकित झाला होता. 

हा कोण धीट पोरगा आपल्या भागात यायचं धाडस दाखवतोय, त्याला धडा शिकवु अशा विचाराने तो कृष्णाजवळ आला आणि त्याला वेटोळं घालुन नदीच्या बुडाशी घेऊन गेला. 

कृष्णाने आपल्या योगशक्तीने आपला आकार वाढवायला सुरु केले. त्याचा आकार एवढा वाढत गेला कि कालियाच्या अंगावर भरपूर ताण पडला आणि शेवटी त्याची पकड सुटली आणि कृष्ण मोकळा झाला. 

मग कृष्णाने कालियाच्या शेपटीला पकडुन त्याला गरगर फिरवले. कालियाला भोवळ आली. 

कृष्ण कालियाला पकडुन वर घेऊन गेला. 

कालियाचे पाचही फणे नदीच्या वर दिसु लागले. 

कृष्णाने आपले मुळ रूप धारण केले आणि कालियाच्या डोक्यावर चढला. 

कृष्ण चक्क कालियाच्या डोक्यावर नाचायला लागला. त्याच्या सगळ्या फण्यांवर तो आलटून पालटून दणदण उड्या मारत नाचत होता. 

कृष्णाचा तो अद्भुत नाच बघुन सगळे गोकुळवासी आनंदाने नाचायला लागले. 

कालिया अगदी शक्तिहीन झाला होता. त्याच्या तोंडातुन आता रक्त यायला लागलं. आता तो अगदी मारायला टेकला होता. 

त्याच्या बायका कृष्णाजवळ आल्या आणि आपल्या नवऱ्याला मारू नये अशी कृष्णाला कळकळीने विनंती केली. 

कृष्णाने त्यांच्या प्रार्थनेला मान देत कालियाला जीवदान दिले. त्याला दूर निघुन जायला सांगितले आणि पुन्हा कोणालाही विनाकारण त्रास न देण्याचे वचन घेतले. त्याला गरुडापासून अभय दिले म्हणजे तो कोठेही मुक्तपणे राहु शकेल. त्याने जाण्याआधी यमुनेचे पाणी विषमुक्त करून दिले. 

कालियाच्या दहशतीपासून मुक्त झाल्यामुळे सर्व गोकुळवासियांनी जल्लोष केला. 

हा प्रसंग कालिया मर्दन किंवा कालिया दमन म्हणुन ओळखला जातो. हा दिवस नागपंचमीचा होता. 

कालियासारखे दुष्ट नाग प्रसिद्ध असले तरी एरवी नाग देवांना प्रिय असतात. 

वासुकी नावाच्या नागाने देव आणि असुरांना समुद्रातून अमृत काढायला समुद्रमंथनात मदत केली होती. 

त्याच मंथनात महादेवाला हलाहल विष पिल्यामुळे भयंकर त्रास झाला, घशात जळजळ व्हायला लागली तेव्हा त्याने थंडावा मिळावा म्हणुन डोक्यावर चंद्र आणि गळ्याभोवती नाग धारण केला. 

विष्णु सदैव क्षीरसागरात शेषनाग या नागराजाने स्वतः वेटोळे घालुन तयार केलेल्या शेषशय्येवर विराजमान असतात. रामायणातले लक्ष्मण आणि महाभारतातले बलराम हे शेषनागाचेच अवतार मानले जातात. 

त्यामुळे नाग हिंदूंना पूजनीय आहेत. नागपंचमीला नागांची पूजा होते.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version