मराठी गोष्टी

गुढी पाडवा

आजकालच्या जगात इंग्रजी कालगणना म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांचा वापर प्रचलित आहे. हि कालगणना सौर वर्ष (पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला लागणारा कालावधी) यावर आधारित आहे. 

परंतु भारतात फार पुर्वीपासुन चंद्रावर आधारित (चंद्राच्या कलांवर आधारित महिने) कालगणना अस्तित्वात होती. उत्तरेपासुन दक्षिणेपर्यंत विविध भाषा, संस्कृती, राज्ये असल्यामुळे कालगणनेच्या थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात असत. 

महाराष्ट्रात “शालिवाहन शक” हि कालगणना वापरली जाते. या पद्धतीनुसार चैत्र ते फाल्गुन असे बारा महिने असतात. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढी पाडवा साजरा केला जातो. 

पाडवा म्हणजे प्रतिपदा, किंवा पहिला दिवस. जसं ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला “न्यू इअर” म्हणुन साजरे होतात, तसंच गुढीपाडवा हि मराठी नववर्षाची सुरुवात असते. पण त्या व्यतिरिक्त या सणाशी निगडित काही कथा आहेत. 

कथा

कालगणना

शालिवाहन नावाच्या राजाने आक्रमण करणाऱ्या शकांचा पराभव केला. यानिमित्ताने त्याने “शालिवाहन शक” या नावाने नविन कालगणना सुरु केली. हा शालिवाहन राजा खरा होता कि नाही याबद्दल अनेक मते आहेत. याचा संबंध वेगवेगळ्या ठिकाणी विक्रमादित्य, सातवाहन, भोज अशा लोकांशी जोडला जातो. काहींच्या मते सातवाहन राजांपैकीच एकाने शालिवाहन हे बिरुद धारण केले असावे. 

इसवी सन ७८ मध्ये ही कालगणना सुरु झाली. त्यामुळे यातील वर्षांचे आकडे इसवी सनापेक्षा ७८ ने लहान असतात. २०२१ मध्ये गुढीपाडवापासुन जे वर्ष सुरु होईल ते १९४३ वे असेल. 

जसे इंग्रजी वर्षांना इसवी सन आणि पुढे वर्षाचा आकडा, उदा. “इसवी सन २०२१” असे लिहायची पद्धत आहे, तसे ह्या कालगणनेत वर्षांनी “शालिवाहन शके १९४३” किंवा थोडक्यात फक्त “शके १९४३” असे लिहायची पद्धत आहे. 

निर्मिती

असे म्हणतात कि ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. गुढीपाडव्यापासुन सुरु होणार चैत्र महिना वसंत ऋतूमध्ये होतो. या ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. 

उन्हाळ्यात पुढच्या हंगामासाठी शेतीमध्ये तयारीची कामे सुरु होतात. त्यामुळे हा दिवस काही नवीन सुरु करण्यासाठी शुभ मानला जातो. 

अत्यंत महत्वाच्या आणि शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस आहे.

श्रीराम 

प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीतामातेस मुक्त केले. ते सर्व अयोध्येत परतले आणि श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. श्रीराम वनवासात असताना त्यांचा लहान भाऊ सिंहासनावर त्यांच्या पादुका ठेवुन त्यांच्याच नावे कारभार चालवत होता. सर्वजण कधी एकदा श्रीराम स्वतः येऊन सिंहासनारूढ होऊन राज्यकारभार हाती घेतील याची वाट बघत होते. 

तो दिवस उजाडला तेव्हा अत्यंत उत्साहाने अयोध्येतील जनतेने गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, तोरणे लावुन आपला आनंद व्यक्त केला. रामाचे राज्य आदर्श म्हणुन ओळखले जाते, रामराज्य हा शब्द उत्तम राज्यव्यवस्था, न्यायी कारभार यासाठी ओळखला जातो. 

इतर नावे

दक्षिण भारतात याच सणाला युगादी किंवा उगादी असेही म्हणतात. युगादी म्हणजे युग+आदी, युगाचा प्रारंभ. काही ठिकाणी नवीन वर्ष काही दिवस उशिरा सुरु होते. 

उत्तर भारतात विक्रम संवत हि कालगणना जास्त वापरली जाते, त्यात नवीन वर्ष दिवाळीतल्या पाडव्याला सुरु होते. 

साजरा करण्याची पद्धत 

गुढी पाडवा ह्या शब्दात जी गुढी आहे ती उभारणे हे या सणाचे मुख्य वैशिष्टय आहे. म्हणजे एका काठीला साडी अथवा रेशमी वस्त्र बांधतात. त्यावर तांब्या किंवा फुलपात्र उलटे ठेवुन घालतात. हे गुढीचे मुळ स्वरूप. गुढीला गच्चीवर, किंवा फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये अथवा खिडकीमध्ये दर्शनी भागात (पडणार नाही अशा पद्धतीने) उभारतात. 

तिला फुलांचा आणि गाठ्यांचा हार घालतात, आंब्याची पाने बांधतात. हळद कुंकू, फुले वाहुन, तिच्यासमोर दिवा उदबत्ती लावुन आणि रांगोळी काढुन तिची पूजा करतात. 

ह्यादिवशी कडुनिंबाची चटणी केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच कडवटपणा निघुन जावा आणि उरलेले वर्ष गोड जावे असा याचा प्रतीकात्मक अर्थ आहे. कडुनिंब आरोग्याला चांगले असते आणि ऋषी मुनी पूर्वीच्या काळी कडुनिंब खाऊनच तेजस्वी राहत असत असे म्हणतात. 

अनेकांच्या घरी गुढीपाडव्यापासुनच आंबा आणुन खाण्यास सुरुवात होते. आमरस असो वा नसो, पण गुढीपाडव्याला गोडाधोडाचे चविष्ट जेवण तर असतेच. 

तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे वाचत असाल तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!!

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version