मराठी गोष्टी

एकीचे बळ

एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते. 

तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं, कोणी कमी काम केलं, कोणी जास्त काम केलं अशा क्षुल्लक गोष्टींवरून भांडत राहायचे आणि काम बाजुला राहायचं. गावातली मंडळी त्यांना फार नावे ठेवत असत. 

तो माणुस आता म्हातारा होत आला होता. त्याला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती. आपल्यानंतर यांच्यात काहीच सलोखा राहणार नाही, बाकी लोक त्याचा फायदा घेतील अशी त्याला फार भीती वाटत असे. 

एक दिवस त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावुन सांगायचे ठरवले. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले, आणि रानात जाऊन सरपणासाठी म्हणुन वाळलेल्या लाकडी काटक्या आणायला सांगितले. 

ते सर्व रानात जाऊन आले आणि बऱ्याच काटक्या गोळा करून आले. पुन्हा कोणी जास्त आणल्या यावरून त्यांची स्पर्धा सुरु झाली. 

त्यांचे वडील म्हणाले, “पोरांनो जरा इकडे लक्ष द्या. प्रत्येकाने एक एक काडी उचला आणि तोडुन दाखवा.” 

मुलांनी क्षणार्धात एकेक काड्या घेऊन काडकन तोडुन टाकल्या.

वडील म्हणाले “शाब्बास. आता या तुम्ही आणलेल्या काटक्यांची घट्ट मोळी बांधा आणि तिला तोडून दाखवा.”

मुलांनी घट्ट बांधलेली मोळी तोडण्याचा प्रयत्न करून पाहिला. प्रचंड जोर लावुनही एकालाही मोळी तोडता आली नाही. 

वडील गालातल्या गालात हसत होते. त्यांनी सांगितले “पाहिलंत मुलांनो? एक एक काडी तोडायला काही बळ लागत नाही. पण हेच जर काही काड्या एकत्र आल्या आणि त्यांना घट्ट बांधले कि कोणालाही तोडता येत नाही.”

“तुम्हा भावांचे पण असेच आहे. तुम्ही एकमेकांशी भांडुन एकेकटेच राहायला लागलात तर कोणीही बाहेरचा येऊन तुम्हाला त्रास देऊ शकेल. पण तेच जर तुम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलात, आधार दिलात, तर तुमच्या एकीच्या शक्तीला कोणी तोडू शकणार नाही.”

“आपली माणसे हि एकमेकांना आधार देण्यासाठीच असतात. क्षुल्लक कारणांवरून भांडत बसायला नाही. आता मी म्हातारा झालो. माझ्यानंतर तुम्हीच एकमेकांसाठी असणार. तेव्हा आता फुटकळ भांडणे सोडा. एकमेकांना मदत करायला शिका.”

त्यादिवशी मुलांनाही जाणीव झाली आणि त्यांनी विनाकारण भांडणे सोडुन दिले. एकमेकांची मदत करत खेळीमेळीने राहण्यात जो आनंद असतो तो त्यांनाही अनुभवायला मिळाला. त्यांच्या वडिलांनी उरलेले आयुष्य समाधानाने घालवले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version