मराठी गोष्टी

डॉ. हेडगेवार

२०२१ मध्ये हे लघुचरित्र लिहीत असताना भारतात “भारतीय जनता पक्षाचे” बहुमताने निवडुन आलेले सरकार गेल्या जवळपास ७ वर्षांपासुन आहे. नरेंद्र मोदी हे त्या सरकारचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन घोषित झाल्यापासुन गेली काही वर्षे भा.ज.पाने बरीच प्रगती केली आहे, विस्तार केला आहे, अनेक राज्यात त्यांची सरकारे आहेत. 

भारतीय जनता पक्ष ज्या “संघ परिवारा”ची राजकीय आघाडी म्हणुन ओळखला जातो त्या संघ परिवाराची मुळ संस्था म्हणजे “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”. RSS किंवा संघ हे या संघटनेचे प्रचलित असलेले संक्षिप्त स्वरूप. 

या राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थापक म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी. डॉ. हेडगेवार या नावाने ते जास्त ओळखले जातात. 

डॉ. हेडगेवार यांचा जन्म १-एप्रिल-१८८९ रोजी नागपुर येथे झाला. बळीरामपंत हेडगेवार आणि रेवतीबाई हे त्यांचे आई वडील. दुर्दैवाने डॉक्टर १३ वर्षाचे असतानाच त्यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला. त्यांच्या काकांनी पुढे त्यांना शिकवले आणि वाढवले. 

शाळेत असताना “वंदे मातरम” गायल्यामुळे त्यांना काढुन टाकण्यात आले. मग पुढचे शिक्षण त्यांनी राष्ट्रीय विद्यालयातुन केले. त्यांनी कलकत्त्याहून वैद्यकीय शिक्षण घेतले. 

कलकत्त्यात असताना ते अनुशीलन समितीत सामील झाले आणि बंगालच्या क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क आला. बंकिंमचंद्र चॅटर्जी, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर अशा जहाल नेत्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. 

ते सुरुवातीला काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस जेव्हा तुर्कस्तानचा पराभव होऊन तिथली खिलाफत संपुष्टात आली तेव्हा त्याविरुद्ध भारतातल्या मुस्लिमांनी आंदोलन केले. गांधीजींनी त्यालाच प्रोत्साहन देत त्यासोबत असहकार आंदोलन सुरु केले. 

मुस्लिमांचा भारतीय स्वातंत्र्याऐवजी तुर्कस्तानच्या खिलाफतीमध्ये असलेला जास्त रस, काँग्रेसचे त्यालाच बढावा देणारे राजकारण अशा गोष्टी न पटल्यामुळे हेडगेवार कॉंग्रेसपासून दूर गेले. 

त्यांच्यावर सावरकरांच्या हिंदुत्वावरच्या लेखनाचा आणि विचारसरणीचा प्रभाव पडला होता. त्यांना लयाला गेलेल्या हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून, हिंदूंना जागृत आणि संघटित करूनच सशक्त राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल असे वाटत होते. त्यांच्यासाठी हिंदु संस्कृती आणि अस्मिता हीच राष्ट्रीय अस्मिता होती. त्यामुळे त्यांनी १९२५ मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” हि संघटना सुरु केली. 

या संघटनेच्या सभासदांना स्वयंसेवक म्हणतात. आज हि जगातली सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली संघटना आहे. सुरुवातीला बाळासाहेब देवरस, गोळवलकर, बाबासाहेब आपटे असे स्वयंसेवक त्यांना सामील झाले. हळूहळू नागपुर शहर, आजूबाजूची गाव शहरे, मग प्रांत असा संघ वाढत गेला. 

हिंदु संस्कृतीबद्दल जागृती, हिंदूंचे संघटन, शारिरीक कसरती असे कार्यक्रम तेव्हा संघांकडून राबवले जात होते. पुढे त्यांनी महिलांसाठी राष्ट्रीय सेविका समिती स्थापन करायला प्रोत्साहन दिले. 

डॉ. हेडगेवारांनी जागोजागी फिरून लोकांना मार्गदर्शन केले, आपल्या सोबत जोडले, संघ कार्यात सामील केले, त्यांना संघ अजुन वाढवायला प्रोत्साहन दिले. 

पुढे वयोमानाने त्यांचे आरोग्य खालावले. २१-जून-१९४० रोजी नागपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.  

डॉक्टर हेडगेवारांची अशी इच्छा होती कि संघाने राजकारणात पडु नये. ती एक राष्ट्राच्या चरित्र निर्माणासाठी कार्य करणारी संस्था असावी. आपल्या वैयक्तिक पातळीवर त्यांनी पुढेही स्वातंत्र्य चळवळीमध्ये, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला आणि इतरांनाही त्यांच्या वैयक्तिक मतानुसार अशा गोष्टीत सहभागी होण्यास अटकाव केला नाही. पण एक संघटना म्हणुन संघ प्रत्यक्ष ह्यात पडला नाही. 

त्यामुळेच संघ आजही प्रत्यक्ष राजकारणात नसतो. पण संघाशी निगडित वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्था आहेत. संघ परिवार हि त्यांची सामूहिक ओळख आहे. ह्या परिवारातल्या संघटनांचा व्याप खुप मोठा आहे. पण तो काही एका दिवसात उभा राहिलेला नाही. 

ह्या वटवृक्षाच्या पायाशी डॉ हेडगेवार, त्यांचे विचार आणि त्यांनी प्रेरित केलेल्या अनेक स्वयंसेवकांच्या पिढ्या आहेत. अनेक प्रकारे विरोध होत असतानाही त्यांनी डॉ. हेडगेवारांनी पेटवलेली ज्योत तेवत ठेवली, तिला विझु दिले नाही. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version