मराठी गोष्टी

देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच

बिरबलाची देवावर खुप श्रद्धा होती. त्याचा असा ठाम विश्वास होता कि देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. आणि काहीही झालं, अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो “देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच” असं म्हणुन शांत राहायचा. 

अकबर आणि त्याच्या दरबारातल्या सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडुन खुपदा ऐकलं होतं. एक दिवस एक सरदार दरबारात येऊन सर्वांसमोर बिरबलाला म्हणाला, “बिरबलजी, तुम्ही नेहमी म्हणत राहता, देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. पण आज माझ्यासोबत असं काही झालंय कि तुम्ही हे म्हणुच शकणार नाही.” 

अकबराने उत्सुकतेने विचारलं, “असं काय झालंय, सरदारजी?”

तो म्हणाला “आज मी जनावरांसाठी पेंढा चिरत असताना चुकुन माझं एक बोट कापलं गेलं. मला अत्यंत वेदना झाल्या. आता मला सांगा, देव चांगल्यासाठी म्हणुन उगाचच एखाद्याला इतक्या त्रासात का टाकेल? आताही तुम्ही असंच म्हणाल का कि देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच?”

बिरबल म्हणाला “नक्कीच. मला असंच वाटतं. देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच.” 

सरदार चिडला. “म्हणजे माझं एक बोट जाणं, हि गोष्ट तुम्हाला चांगली वाटते?”

अकबरही म्हणाला. “बिरबल, आज मात्र मला तुझं म्हणणं पटलं नाही. देवावर श्रद्धा मला समजते. पण प्रत्येक वेळी त्याची स्तुतीच का करावी? जेव्हा एखादा माणुस विनाकारण एखाद्या वेदनादायक परिस्थितीमध्ये असतो तरी ते चांगल्यासाठीच समजुन देवाची स्तुती कशाला?”

बिरबलाने उत्तर दिले. “देवाच्या मनात काय चाललंय ते आपल्याला समजु शकत नाही. पण विनाकारण तो काही करत नाही. त्याने घडवलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्व आपल्याला लगेच समजु शकत नाही. यांचं बोट कापलं जाणं चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही, पण देवाची यातही काही चांगली योजना असेल, जी कदाचित वेळ आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही.”

असेच काही महिने गेले. तो सरदार एका दूरच्या मोहिमेवर असताना जंगलात साथीदारांसोबत शिकारीला गेला. पण सावजाच्या मागे मागे जात तो बाकी लोकांपासुन दूर गेला आणि एका जंगली जमातीच्या तावडीत सापडला. 

हि जमात नरभक्षक होती. त्यांनी त्या सरदाराला बळी देऊन खायला त्याला बांधुन त्यांच्या वस्तीवर नेले. पण तिथे त्यांच्या पुजाऱ्याने ह्या सरदाराला बळी द्यायला नकार दिला. तो म्हणाला “ह्याचे हात पहा. ह्याचं एक बोट तुटलंय. अशा अपुर्ण माणसाचा बळी दिला तर आपला देव आपल्यावर कोपेल. ह्याला सोडुन द्या.”

हे ऐकुन त्या लोकांनी त्याला सोडुन दिलं, आणि तो पुन्हा आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचला. त्याने देवाचे आभार मानले. 

मोहिमेवरून जेव्हा तो पुन्हा राजधानीत परतला, तेव्हा त्याने येऊन दरबारात हि हकीकत सांगितली. आणि म्हणाला “बिरबलजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. माझं बोट कापलं तेव्हा मला हे मुळीच पटलं नाही, आणि मी तुमच्यावर उगाचच चिडलो. त्याबद्दल मला क्षमा करा. पण माझं बोट कापलं गेलं म्हणुनच माझा जीव वाचला. आता मलासुद्धा पटलं, देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच.”

आता अकबरासकट दरबारातल्या सर्वांनाच हे पटलं होतं. देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version