Site icon मराठी गोष्टी

अन्नपूर्णा देवीची कहाणी

काशी नगरीत रघुनाथ म्हणून एक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांच्या बायकोचे नाव होते सुनंदा. त्यांच्या घरात गरीबी होती. 

एके दिवशी बायकोने खूप अपमान केल्यामुळे त्यांनी शंकरांची तपश्चर्या करावयास सुरुवात केली. शंकरांनी दृष्टांत दिला – “तू पूर्व दिशेला जा. तिथे तुझे मनोरथ पूर्ण होतील.”

त्याप्रमाणे रघुनाथ पूर्व दिशेला गेले. तेथे त्याला काही स्त्रिया व्रत करताना दिसल्या. त्या वेळी त्यांनी विचारलं, “आपण हे काय करत आहात ?” 

त्या स्त्रिया म्हणाल्या, “आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा. उपवास करावा. देवासमोर दिवा ठेवावा. “

रघुनाथ म्हणू लागले, “मी तर गरीब आहे. मला खाण्यासाठी अन्नसुद्धा नाही. माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. आपण मला व्रताचे सूत द्याल का ?” 

त्या महिला म्हणाल्या, “आम्ही तुला सूत देऊ; पण त्याचा अपमान होता कामा नये. कारण हे पवित्र सूत आहे.” रघुनाथाने ते मान्य केले व व्रताची सुरुवात केली. व्रत पूर्ण केले. 

अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली. ती म्हणाली, ‘तू सुखी होशील. सारे जग तुझी प्रशंसा करील. तुला काही कमी पडणार नाही.”

रघुनाथांचे दिवस बदलले. त्याच्या घरी संपत्तीचा ओघ सुरू झाला. त्याला पुत्रलाभ झाला. त्याचे बदललेले जीवन पाहून गावातील लोकांनीही व्रत आरंभिले. त्यांनी गावात अन्नपूर्णामातेचे मंदिर उभारले. अनेक लोक भक्तिभावाने अन्नपूर्णामातेची पूजा करू लागले.

Exit mobile version