मराठी गोष्टी

अकबराचे स्वप्न

एकदा बादशहा अकबराला एक विचित्र स्वप्न पडले.  स्वप्नात त्याचे सर्व दात पडले, फक्त एकच शिल्लक राहिला. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न दरबारात विचारायचे ठरवले. 

हि गोष्ट दरबारात सांगितल्यावर, दरबारी लोकांच्या सांगण्यावरून अकबराने एका ज्योतिष्याला दरबारात बोलावुन घेतले. त्याला ते स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. 

ज्योतिष्याने स्वप्नावर विचार केला आणि सांगितले “हे एक अशुभ स्वप्न आहे. तुमचे सर्व दात पडले आणि एकच दात शिल्लक राहिला, म्हणजे त्या दातांसारखे तुमचे सर्व नातेवाईक आणि आप्तजण हळु हळु मरत जातील, आणि त्या शेवटी राहिलेल्या दातासारखे तुम्ही एकटेच जिवंत राहाल.” 

अकबर हे ऐकुन चिडला. त्याने त्या ज्योतिष्याला १०० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली. 

त्या ज्योतिष्याच्या म्हणण्यावर विचार करत अकबर दुःखी झाला. त्याने बिरबलाला विचारले. “बिरबल, तुला काय वाटते, काय असेल या स्वप्नाचा अर्थ?”

बिरबल म्हणाला “जहाँपनाह, मला वाटतं, ह्या स्वप्नाचा अर्थ खुप चांगला आहे. तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे कि तुम्ही तुमच्या सर्व परिवारात सर्वात दीर्घायुषी असाल.” 

अकबर हे ऐकुन आनंदी झाला आणि त्याने बिरबलाला बक्षीस म्हणुन मोहरांची एक थैली दिली. 

बाहेर आल्यावर बिरबलाला तो ज्योतिषी भेटला आणि म्हणाला “बिरबलजी, तुम्ही आणि मी सांगितलेला अर्थ एकच होता, तरीही मला फटके आणि तुम्हाला बक्षीस हा कोणता न्याय आहे?”

बिरबल म्हणाला, “मी तुम्ही सांगितलेलाच अर्थ फक्त चांगल्या भाषेत सांगितला. गोष्ट तीच असली तरी ती मांडण्यामध्ये फरक असतो. तीच गोष्ट ऐकणाऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सांगितली तर चांगलं असतं.” 

ज्योतिष्याच्या जखमा पाहुन बिरबलाला वाईट वाटले. त्याने बक्षीस म्हणुन मिळालेले पैसे ज्योतिष्याला देत सांगितले “शेवटी मी तुम्ही सांगितलेला अर्थच वापरून सांगितला, त्यामुळे हि घ्या तुमची बिदागी. आता जरा आपल्या जखमांवर इलाज करून घ्या.”

ज्योतिष्याने ते पैसे आणि बिरबलाने दिलेली शिकवण याबद्दल बिरबलाचे आभार मानले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version