पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अठराव्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१-मे-१७२५ रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडजवळील चोंडी गावात झाला.
त्याकाळात मुलींना शिकवण्याची रीत नव्हती. परंतु अहिल्याबाईंच्या वडिलांनी मात्र त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. त्यांना लहानपणापासुन देवाधर्माची आवड होती. एकदा त्या आठ वर्षाच्या असताना मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेलेल्या होत्या.
गावातुन मराठा साम्राज्याचे मातब्बर सरदार मल्हारराव होळकर यांची स्वारी पुण्याकडे चालली होती. मल्हाररावांनी लहान अहिल्येला मंदिरात पाहिले आणि त्यांचा सुसंस्कृतपणा पाहुन आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी पसंत केले. त्याकाळी फार कमी वयात लग्ने करत असत.
१७३३ साली अहिल्याबाई होळकर घराण्याची सुन बनल्या. त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्येसुद्धा झाली. पण दुर्दैवाने त्यांचे पती खंडेराव यांना १७५४ साली राजस्थानातील एका लढाईत वीरमरण आले. त्याकाळी अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर चितेत प्रवेश करून सती जात असत. पण अहिल्याबाईंना मल्हाररावांनी सती जाण्यापासुन रोखले.
अहिल्याबाई फार हुशार होत्या. त्या मल्हाररावांकडुन कारभार शिकु लागल्या, त्यात लक्ष घालु लागल्या. काही वर्षांनी मल्हाररावांनासुद्धा देवाज्ञा झाली. तेव्हा अहिल्याबाई यांचा मुलगा मालेराव त्यांच्या गादीवर बसला. मालेराव यांचे मानसिक संतुलन नीट नव्हते. त्यामुळे कारभार त्यांच्या नावाने अहिल्याबाईच चालवत होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांना दुःखाचा दुसरा झटका बसला. मल्हाररावस काही महिन्यातच मालेरावसुद्धा देवाघरी गेले.
एका बाईने राज्यकारभार करण्यास काही जण विरोध करत होते. परंतु अहिल्याबाईंना मल्हाररावांचे दत्तक पुत्र तुकोजीराव यांचा पाठिंबा होता. तुकोजी हेच होळकरांच्या सैन्याचे प्रमुख होते. अहिल्याबाईंनी मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशव्यांना आपल्याला कारभार करू द्यावा अशी विनंती केली आणि ती मान्य झाली.
तिथुन पुढे ३० वर्षे अहिल्याबाईंनी अतिशय उत्तम कारभार केला. त्यांची राज्यावर छान पकड होती. त्यांनी इंदोर शहराचा उत्तम विकास केला, एक महत्वाचे केंद्र बनवले. तसेच त्यांची राजधानी जवळच महेश्वर येथे होती तिथेही विकास केला. त्यांचे आपल्या प्रजेवर प्रेम होते. त्यांनी प्रजेची उत्तम काळजी घेतली, शेती आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले.
जेव्हा लढाईचे प्रसंग आले तेव्हा अहिल्याबाई स्वतः रणांगणात उतरून नेतृत्व करत आणि सैन्याला प्रोत्साहन देत असत. हत्तीवरच्या अंबारीत धनुष्य बाण घेऊन बसलेली त्यांची स्वारी सर्व सैनिकांना प्रेरणा देत असे.
अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतात आणि देशभर अनेक रस्ते बांधले, धर्मशाळा बांधल्या, मंदिरे बांधली. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नदीवर घाट बांधले. काशीमध्ये औरंगजेबाने पडलेले विश्वेश्वराचे मंदिर त्याच जागेच्या बाजूला पुन्हा बांधले. त्यांनी बद्रीनाथ ते कर्नाटकपर्यंत सर्वत्र धार्मिक स्थळांच्या विकासाला सढळ हस्ते मदत केली.
त्यांच्या काळात इंदोर आणि प्रांताचा उत्तम विकास झाला, प्रजेची भरभराट झाली, कलाकारांना उत्तेजन मिळाले. प्रजेकडून त्यांना अतिशय आदर आणि सन्मान मिळाला. त्यांचा वयाच्या ७०व्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ रोजी मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चातही त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात संतांसारखेच आदराचे आणि श्रद्धेचे स्थान मिळवले. त्यांनी घालून दिलेला कारभाराचा आदर्श आजही लोकांच्या स्मरणात आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take